…तर तालिबानी पद्धतीप्रमाणे गद्दारांना 100 फटके अन् फाशी, कुणाल कामराला ‘थर्ड डिग्री’ देण्याची भाषा करणाऱ्यांना संजय राऊत यांनी फटकावलं
‘गद्दार’ गीत प्रचंड झोंबल्यामुळे शिंदे गटाच्या मंत्र्यांकडूनही दादागिरीची भाषा सुरू असून कुणाल कामराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देऊ, अशी उघड धमकीच कॅबिनेट मंत्री शंभुराज देसाई यांनी दिली होती. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या देशामध्ये व्यक्तीस्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. जर कुणी तुम्हाला दुखवणारे वक्तव्य केले असेल तर त्यासाठी कायदा आहे. पण एखादा मंत्रीच तर ‘थर्ड डिग्री’ द्यायच्या गोष्टी करत असेल तर महाराष्ट्रात तालिबानी राज्य सुरू आहे. कुणाल कामराला इस्लामी राष्ट्राप्रमाणे शिक्षा देत असाल तर गद्दारांना भर चौकात 100 फटके आणि फाशीच द्यायला हवी, असा घणाघात राऊत यांनी केला. ते शुक्रवारी सकाळी माध्यमांशी बोलत होते.
इस्लामी कायद्यानुसार गद्दारांना कोणती शिक्षा देतात हे तुम्ही अफगाणिस्तान, इराणमध्ये जाऊन बघा. गद्दाराला भर चौकात उघडे करून त्याच्या पार्श्वभागावर 100 फटके मारले जातात. त्यामुळे जर कुणाल कामराला तालिबानी पद्धतीने शिक्षा देणार असाल तर गद्दारांनाही इस्लामी पद्धतीने 100 फटके देऊन फासावर लटकवा. हे मंत्र्यांना मान्य असेल तर तसा प्रस्वाव देऊ आणि याची सुरुवात मंत्र्यांपासून करू, असे संजय राऊत म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, आमच्यावरही टीका करण्यात आली. फडणवीस यांच्याविषयीही आक्षेपार्ह वक्तव्य त्याकाळात होत होती. ती चुकीची होती, पण तरीही त्यांनी ती सहन केली. तुम्ही याला शब्दाच्या, लिखानाच्या रुपाने उत्तर देऊ शकता. कायदेशीर भाषेत प्रतिकार करू शकता. पूर्वायुष्यात आमच्याकडूनही या चुका झालेल्या आहेत, पण आता आम्हाला वाटते की कायद्याचे राज्य टिकवायचे असेल तर आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचा नियम पाळला पाहिजे.
माध्यमे नव्हे ही तर गिधाडे! सत्ताधाऱ्यांच्या शाखा बनलेल्या मेनस्ट्रीम मीडियावर कामराचा फटकारा
कुणाल कामराच्या शोवर महाराष्ट्र बंदी घालावी आणि त्याचे युट्यूब चॅनल तपासण्याची मागणी शिंदे गटाने केली. यावरही राऊत यांनी भाष्य केले. ते कोणतीही मागणी करू शकतात. रेड्याचे, बैलाचेही दूध काढू शकतात. पण या देशात अजूनही कायदा आहे. आमच्यासारख्या संघर्ष करणाऱ्या अनेकांनी या देशात स्वातंत्र्य टिकवले आहे. तुमच्यावर टिप्पणी केली म्हणून चॅनेल बंद करायचे, टायरमध्ये टाकून मारायचे म्हणत असाल तर सरकार बदलले आणि जे तुमच्या विरोधातील कार्यकर्ते आहेत त्यांनीही ही भूमिका घेतली तर देशात अराजक माजेल, असेही राऊत म्हणाले.
शिंदे गटाच्या लोकांना कदाचित माहिती नाही हा देश खूप मोठा आहे. त्यांना त्यांचा देश अमित शहांच्या पलीकडे दिसत नाही. जोपर्यंत शहांचे छत्र डोक्यावर आहे तोपर्यंत ही भाषा चालेल. पण राम, कृष्ण आले आणि गेले, तसे मोदी-शहाही जातील आणि येतील हे लक्षात घ्या, असा इशाराही राऊत यांनी दिला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List