खेड तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा, हंडाभर पाण्यासाठी महिलांना करावी लागतेय पायपीठ
उन्हाच्या तीव्रतेत वाढ झाली असून, मार्च महिन्यातच उष्णतेच्या लाटेसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. उन्हाच्या चटक्याबरोबरच पुणे जिल्ह्यातील काही ग्रामीण भागांत पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. पूर्व भागासह पश्चिम आदिवासी भागातील जलस्रोतांनी तळ गाठल्याने हंडाभर पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागत आहे. भीमाशंकर अभयारण्य परिसरातील खरपूड परिसरात परसूल खोपेवाडी गावात पाण्याची आणीबाणी लागू झाली असून, सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या विहिरीने तळ गाठल्याने गावातील प्रत्येक कुटुंबाला दररोज दोनच हंडे पाणी मिळत आहे. पाण्याचा तिसरा हंडा नेल्यास चक्क शंभर रुपये दंड आकारण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.
यंदा पावसाळ्यात भरपूर पाऊस होऊनदेखील जलस्रोतांमध्ये लवकर घट झाली आहे. त्यामुळे काही भागांत मार्च महिन्यातच तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. परसूल गावाला उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जाता कामा नये आणि सगळ्याच कुटुंबाना दररोज पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये यासाठी ग्रामस्थांनी एकत्र येऊन दोन हंड्यांच्यावर पाणी नेल्यास दंड आकारण्याबाबत निर्णय घेतला आहे. २०२३ मध्ये या गावासाठी जलजीवन मिशनअंतर्गत ४५ लाखांची नळपाणी पुरवठा योजनेची प्रत्यक्ष कामे सुरू होऊनही अद्यापही पूर्ण होऊ शकली नाहीत. या भागात पाझर तलाव असूनही पुरेसा जलउद्भव होऊ शकला नसल्याने या पाणीपुरवठा योजनेचे भवितव्य अंधारात आहे. ५० वर्षे गावाला जलजीवन मिशनअंतर्गत नळपाणी पुरवठा योजनेसाठी दुरुस्तीसाठी एक छदाम शासन देणार नाही हे सर्वश्रुत असतानाही ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे निकृष्ट दर्जाच्या योजना अधिकाऱ्यांच्या टक्केवारीमुळे अक्षरशः कार्यान्वित होण्याअगोदरच फेल होत असल्याने योजनेला घरघर लागल्याचे चित्र आहे. मुळात सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेमध्ये आवश्यक पुरेसा जलउद्भवाचा शोध घेऊन उद्भवाचे बळकटीकरण करून अंतर्गत पाणीपुरवठ्याची पाईपलाईन, पाण्याच्या टाक्यांची कामे सुरू करणे अपेक्षित आहे. मात्र, सर्वच नळपाणी पुरवठा योजनांची कामे पूर्ण झाल्यावर जलउद्भव शोध सुरू केल्याने खेड तालुक्यातील ‘हर घर नल योजना’ अखेरची घटका मोजण्याच्या मार्गावर आहे.
सह्याद्रीच्या डोंगररांगेतील आदिवासी वाड्यावस्त्यांमधील जलस्रोतांनी तळ गाठल्यामुळे जनावरांसाठी शेवाळलेले हिरवट दूषित पाण्यावर तहान भागवण्याची वेळ आली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List