प्रशासकीय राजवटीत होऊ दे खर्च, सव्वा किलोमीटर रस्त्यासाठी 82 कोटींचा चुराडा
टेल्को रस्त्यावरील भोसरीतील गवळी माथा ते इंद्रायणी चौकापर्यंतचा सव्वा किलोमीटरचा रस्ता महापालिका अद्ययावत पध्दतीने विकसित करणार आहे. दोन्ही बाजूने मार्गिका, वाहनतळ, सायकल ट्रॅक, हरितपट्टा, सेवा वाहिन्या, पदपथ, व्यायामशाळा, शौचालय उभारणार आहे. या कामासाठी तब्बल 81 कोटी 77 लाख 55 हजार 556 रुपये खर्च करण्यात येणार आहे. हे काम धनेश्वर कन्स्ट्रक्शनला देण्यास मान्यता दिली आहे. या कामासाठी महापालिका कर्ज काढणार असल्याने प्रशासकीय राजवटीत ऋण काढून सण साजरे करत असल्याची टीका होऊ लागली आहे.
प्रशासकीय राजवटीत विकासकामांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा चुराडा सुरू आहे. महापालिकेतर्फे दापोडी ते निगडी आणि पिंपरी ते दापोडी या मार्गावर अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार पदपथ व सायकल ट्रॅक तयार केले जात आहे. यासाठी सुमारे दीडशे कोटी रुपयांचा खर्च केला. एकीकडे महापालिकेचे उत्पन्न कमी होत असताना उत्पन्न आणि खर्चाचे नियोजन करणे गरजेचे आहे. अशात प्रशासन अर्बन स्ट्रीटसारखा संकल्पना राबवत आहे. त्यामुळे भविष्यात आर्थिक स्थिती नाजूक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शहरातील टेल्को रस्ता हा मुख्य रस्त्यांपैकी एक महत्त्वाचा रस्ता आहे. के. एस. बी. चौकापासून इंद्रायणीनगरपर्यंत हा रस्ता साडेआठ किलोमीटर अंतराचा आहे. त्यापैकी गवळी माथा ते इंद्रायणीनगर या सव्वा किलोमीटर अंतराच्या रस्त्याचा अद्ययावत पध्दतीने विकास करण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेने प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार म्हणून मॅप्स ग्लोबल सिव्हिल टेक प्रा. लि. यांची नियुक्ती केली. रस्त्याचे आवश्यक सर्वेक्षण आणि नकाशे तयार केले. या सर्वेक्षणात सद्यः स्थितीतील सहा पदरी रस्ता अपुरा पडत आहे. त्यामुळे वाहतूककोंडी होत असल्याचे दिसून आले. त्यासाठी हा सव्वा किलोमीटर अंतराचा रस्ता विकसित करण्याचे नियोजन केले.
त्यानुसार 90 कोटी 65 लाख 77 हजार 455 रुपयांची निविदा प्रसिध्द केली. केवळ दोन ठेकेदारांनी सहभाग घेतला. दोन वेळा निविदेला मुदतवाढ दिल्यानंतरही मे. धनेश्वर कन्स्ट्रक्शन आणि अजवाणी इन्फ्रास्ट्रक्चर या दोनच ठेकेदारांनी निविदा भरली. महापालिकेने धनेश्वर कन्स्ट्रक्शन प्रा.लि. या ठेकेदाराची निविदा स्वीकारली. त्यांच्याकडून 81 कोटी 77 लाख 55 हजार 556 रुपयांमध्ये काम करून घेण्यास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.
टेल्को रस्त्यावरील गवळीमाथा ते इंद्रायणीनगर चौकापर्यंतचा सव्वा किलोमीटर रस्ता अद्ययावत पध्दतीने विकसित करण्यात येणार आहे. त्यामध्ये स्थापत्य, पाणीपुरवठा, जलनिस्सारण, विद्युतची कामे केली जाणार आहेत. रस्त्याचे काम झाल्यानंतर वाहतूककोंडी सुटण्यास मदत होईल.
– प्रमोद ओंभासे, मुख्य अभियंता, स्थापत्य प्रकल्प विभाग.
कोणती कामे करणार
- सव्वा किलोमीटर अंतराच्या दोन्ही बाजूला एक-एक मार्गिका वाढविणार
- रस्ता आठ पदरी होणार
- मुख्य रस्त्यावर डांबरीकरणाचा थराने मजबुतीकरण
- रस्त्याच्या दोन्ही बाजूस 900 मिलीमीटर व्यासाची पावसाळी वाहिनी
- नवीन उंच दुभाजक बसविणार
- आवश्यक ठिकाणी सेवा रस्ता विकसित करणार
सायकल मार्गिका, हरितपट्टा
वाहनतळ, मल्टी युटिलायटी झोन, सायकल मार्गिका, हरितपट्टा, सेवा वाहिन्या, सेवा रस्ता, व्यायामशाळा, दोन ठिकाणी शौचालय उभारण्यात येणार आहे. उच्च व कमी दाबाच्या विद्युत वाहिन्या भूमिगत करणार. आकर्षक पथदिवे बसविणार, पाच जलवाहिन्या स्थलांतरित करणार. 300 मिलीमीटर व 450 मिलीमीटर व्यासाच्या नवीन जलनिस्सारण वाहिन्या टाकणार.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List