विभागीय रेल्वे व्यवस्थापकाला शिवसेनेने घातला घेराव, पुणे स्टेशनवर प्रवाशांना सुविधा पुरविण्याची मागणी
पुणे रेल्वे स्टेशनची परिस्थिती ‘आओ जाओ घर तुम्हारा’, अशी झालेली असून, प्रवाशांच्या सुरक्षेबाबत रेल्वे प्रशासन गंभीर नाही. याबाबत अनेकदा निवेदन देऊनही उपाययोजना झालेल्या नाहीत. तत्कालीन विभागीय व्यवस्थापक यांनी सीसीटीव्ही बसवण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण झालेले नसून, याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आक्रमक झाला आहे. गुरुवारी शिवसेनेने विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेशकुमार वर्मा यांना घेराव घालून उपाययोजना करण्याबाबत निवेदन दिले
यावेळी शहरप्रमुख संजय मोरे, विधानसभाप्रमुख उत्तम भुजबळ, विभागप्रमुख अनिल दामजी, अनिल परदेशी, रोहिणी कोल्हाळ, युवराज पारिख, गिरीश गायकवाड, नितीन थोपटे, शैलेश जगताप आदी उपस्थित होते.
पुणे रेल्वे स्टेशनवर रोज लाखो प्रवासी ये-जा करतात. मात्र, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तेथे पुरेसे सीसीटीव्ही नाहीत. सुरक्षारक्षक, प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्या याबाबत 23 मार्च 2023 रोजी शिवसेनेने निवेदन दिले होते. यावेळी प्रशासनाने शिवसेना पदाधिकाऱ्यांना आश्वासन देत सीसीटीव्ही बसवण्याची कार्यवाही लवकरात लवकर करण्यात येईल, असे सांगितले. मात्र, अद्यापि कार्यवाही झाली नाही. रेल्वे स्थानकावरील व्हीआयपी गेट, अम्ब्रेला गेट, ताडीवाला रोड गेट या ठिकाणी 24 तास आरपीएफ, जीआरपी नियुक्ती करावी, उत्तम दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, मेन गेटच्या व्यतिरिक्त इतर सर्व रस्ते बंद करण्यात यावेत, महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आरपीएफ व लोहमार्ग पोलिसांनी उपाययोजना कराव्यात, रेल्वे स्टेशनमधील स्टॉलधारक व फेरीवाले यांना साहित्य ठेवण्यास बंदी घालावी, पार्सल वस्तूंसाठी नियमित जागा ठरवून द्यावी, उन्हाळा असल्यामुळे प्रवाशांना स्वच्छ व थंड पाण्याची मोफत व्यवस्था करावी, आदी मागण्या शिवसेनेकडून निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी शिवसेनेकडून देण्यात आला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List