धक्कादायक… बांगलादेशींकडे हिंदुस्थानचे जन्म दाखले, हायकोर्टाने घेतली गंभीर दखल; बोगस कागदपत्रांच्या आधारे घेताहेत मतदान कार्ड
बांगलादेशींकडे हिंदुस्थानातील जन्म दाखले असल्याची धक्कादायक माहिती उच्च न्यायालयात सादर झाली. न्यायालयाने याची गंभीर दखल घेतली. बोगस कागदपत्रांच्या आधारे बांगलादेशी मतदान कार्डसाठी अर्ज करत आहेत, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
12 बांगलादेशींना मालेगावात अटक झाली. या बांगलादेशींना हिंदुस्थानातील जन्म दाखला मिळवून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोन आरोपींनी अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. हे प्रकरण गंभीर असल्याचे नमूद करत न्या. राजेश पाटील यांच्या एकल पीठाने या आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.
जन्म दाखल्यावर महापालिकेची मोहोर
बांगलादेशींकडे असलेल्या जन्म दाखल्यावर मालेगाव महापालिकेची मोहोर आहे. त्यामुळे आरोपींची चौकशी होणे आवश्यक आहे, असेही न्या. पाटील यांनी अटकपूर्व जामिनाची याचिका फेटाळताना स्पष्ट केले.
वकिलाने केली मदत
खालीद अख्तर मोहम्मद युसूफ व निवृत्ती बागूल यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. युसूफ वकिली करतो. त्याने बांगलादेशींना जन्म दाखला मिळवून देण्यासाठी अर्ज केले. त्यावर स्वतःच स्वाक्षरी केली, असा पोलिसांचा आरोप आहे. मात्र मी कनिष्ठ वकील आहे. मी गुन्हा केलेला नाही, असा दावा युसूफने केला. हा दावा न्यायालयाने फेटाळून लावला. बागूल मालेगावातील स्थानिक वर्तमानपत्राचा संपादक आहे. बांगलादेशींची नोटीस संबंधित वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली होती. या नोटीसशी माझा संबंध नाही, असा युक्तिवाद बागूलने केला. तो न्यायालयाने मान्य केला नाही.
मोठा कट
बोगस कागदपत्रांच्या आधारे अनेक बांगलादेशी हिंदुस्थानात वास्तव्य करत आहेत. हा एक मोठा कट आहे. यासाठी युसूफ व बागूलची चौकशी होणे आवश्यक आहे. या दोघांना अटकपूर्व जामीन देऊ नये, असे राज्य शासनाने न्यायालयाला सांगितले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List