राहुरी फॅक्टरी येथील बस स्थानकाची चोरी; पोलीस, महामंडळ, बांधकाम खात्याला लागेना शोध
नगर-मनमाड महामार्गावरील राहुरी फॅक्टरी येथील बस स्थानक गॅस पाइपलाइनच्या खोदकामाचा बळी ठरले आहे. हे बस स्थानक शोधूनही सापडत नसल्याने चोरीस गेले की काय? अशी शंका प्रवाशांमध्ये निर्माण झाली आहे. एसटी महामंडळ, पोलीस, बांधकाम विभाग यांनाही बस स्थानकाचा शोध लागेना. चोरीस गेलेल्या बस स्थानकाचा शोध पोलीस घेणार का? तसेच बस स्थानक ‘गायब’ करणाऱ्या ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करणार का? असा प्रश्न प्रवाशांनी केला आहे.
नगर-मनमाड महामार्गावरील राहुरी फॅक्टरी येथे पक्के बस स्थानक उभारलेले होते. काही दिवसांपूर्वी ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने बस स्थानकात ट्रक घुसल्याने पक्क्या बस स्थानकाची तोडफोड झाली होती. त्यानंतर महामंडळ व बांधकाम विभागाने या बस स्थानकाकडे ढुंकूनही पाहिले नव्हते. खराब झालेले बस स्थानक काढण्याचा निर्णय घेत लोखंडी बस स्थानक तयार करून येथे बसविण्यात आले होते. मात्र, या बस स्थानकासही साडेसाती लागल्याप्रमाणे पुन्हा गॅस पाइपलाइनचे खोदकाम करताना फटका बसला. खोदकाम करणाऱ्या ठेकेदाराने हे बस स्थानक पाडून त्या जागेवरून गॅस पाइपलाइन टाकली. गेल्या एक-दोन वर्षांपासून येथे बस स्थानक नसल्याने बस स्थानक चोरीस गेले की काय? असा प्रश्न प्रवाशांना पडत आहे.
प्रवाशांना उन्हाच्या झळा
सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. प्रवाशांना बसची वाट पाहण्यासाठी भरउन्हात उभे राहावे लागत आहे. वृद्ध, विद्यार्थी प्रवासी उन्हात थांबत असल्याने अनेक प्रवाशांना उन्हाचा चटका बसत आहे. राहुरी फॅक्टरी येथे बस स्थानक नसल्याने या मार्गावरील अनेक बसेस येथे थांबत नाहीत. त्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. राहुरी फॅक्टरी येथील ‘चोरी’स गेलेल्या बस स्थानकाचा ‘शोध’ घ्यावा. बस स्थानक पाडणाऱ्या ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी प्रवाशांसह सामाजिक संघटनांनी केली आहे.
आमचा संबंध नाही: राहुरी पोलीस
चोरीस गेलेल्या बस स्थानकाबाबत राहुरी पोलीस ठाण्यात महामंडळ व सार्वजनिक बांधकाम खात्याने कोणतीही फिर्याद दाखल केलेली नाही. राहुरी पोलीस ठाण्यात चोरीची फिर्याद दाखल नसल्याने चोरीचा शोध घेण्याचा संबंधच नाही, असे राहुरी पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार सांगतात.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List