मोदींची पिलावळ देशात पुन्हा फाळणीचे बीज रोवण्याचे काम करत आहेत, संजय राऊत यांची टीका
देशात हिंदू विरुद्ध मुस्लीम दंगली घडवण्याचा कट सुरू आहे, असा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच मोदींची पिलावळ देशात पुन्हा फाळणीचे बीज रोवण्याचे काम करत आहेत असेही संजय राऊत म्हणाले.
आज दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा तोफखना प्रमुख कोण होता? महाराजांचे अंगरक्षक कोण होते? मी नावं घेत नाही. पण या बखरी चाळाव्यात वाचता येत असतील तर. इतिहास समजून घ्यावा मग त्यावर बोलावं. इतिहास बदलण्याची जी प्रक्रिया सुरु आहे, ही अत्यंत गंभीर आणि घातक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी जी पहिली लढाई केली ती औरंगजेबाविरोधात नाही केली तर चंद्रराव मोरेंविरोधात केली होती, हा इतिहास आहे. या चंद्रराव मोऱ्यांचे वंशज मंत्रिमंडळात असतील, तर माननीय फडणवीसांनी सर्व मंत्र्यांना इतिहासाचे धडे हे योग्य इतिहासतज्ज्ञांकडून द्यावे. छत्रपती शिवाजी महाराजांसोबत, छत्रपती संभाजी महाराजांसोबत सर्वधर्मीय लोक होते, म्हणून ते राज्य निर्माण करू शकले. छत्रपती शिवाजी महाराजांचे शत्रू फक्त औरंगजेब नव्हता, आदिलशाहीबरोबर लढले, निजामशाहीबरोबर लढले, पोर्तुगीजांशी लढले, सर्वांशी लढून त्यांनी स्वराज्य स्थापन केलं. पण जे शाळेत गेले नाहीत, ज्यांचा वाचनसंस्कृतीशी संबंध आला नाही, ज्यांना इतिहास ज्ञात नाही, ज्यांना फक्त मटणाचीच दुकान दिसतात, ज्यांना या देशामध्ये दंगली घडवायच्या आहेत, ज्यांना देश पुन्हा एकदा फाळणीकडे ढकलायचा आहे, अशा लोकांची ही वक्त्यवं आहेत. पंतप्रधान मोदींना मी एक पत्र लिहिणार आहे, की या लोकांना आवरा. नाहीतर तुमच्यावर दुसऱ्या फाळणीचा ठपका येईल. जसा तुम्ही पहिल्या फाळणीचा ठपका नेहरु आणि काँग्रेसवर ठेवता. तो एक वेगळा काळ होता देशाच्या स्वातंत्र्याचा. पण आता सर्वकाही स्थिरस्थावर असताना या देशात पुन्हा फाळणीचे बीज रोवण्याचे काम ही मोदींची पिलावळ करत आहे आणि इतिहासात नरेंद्र मोदींवर तो ठपका येईल असे संजय राऊत म्हणाले.
तसेच धनगर समाजात बकऱ्या मेंढ्यांना देवाचे स्थान आहे. ते स्वतःहून ते कापायला जात नाहीत. मुलासारखं जपतात. काही लोक गायीचं शेण खातात, त्यापेक्षा बकरीचे दूध अधिक पौष्टिक आहे. कुणाची इच्छा असेल त्यांनी गायीचं शेण खावं किंवा गोमुत्र प्यावं, गोमुत्रानं आंघोळ करावी, हा वेगवेगळ्या हिंदुत्वाचा प्रश्न आहे. पण वीर सारवकरांच्या हिंदुत्वात हे बसत नव्हतं. वीर सावरकर हे विज्ञानवादी होते, आधुनिक होते. त्यांचं हिंदुत्व आणि बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व हे आधुनिक विचारसरणीचं हिंदुत्व होतं. पण अजूनही कुणाला शेणात लोळायचं असेल तर त्याला आम्ही काय करणार? अशा प्रकारे हा देश पुन्हा अंधःकाराकडे, अज्ञानाकडे ढकलला जातोय. नरेंद्र मोदी यांना या देशाचं काय करायचंय अफगाणिस्तान करायचाय की हिंदू पाकिस्तान करायचाय हे त्यांनी ठरवायला पाहिजे आणि देशाला दिशा दिली पाहिजे. पंतप्रधान मोदी मॉरिशसला जलकुंभ घेऊन गंगाजल घेऊन गेले, तिथल्या पंतप्रधान, राष्ट्रपतींना भेट दिली ही चांगली बाब आहे. पण महाराष्ट्रातले लोक गंगेत डुबक्या मारून आले, तरी ते शुद्ध होत नाहीत, पवित्र होत नाही आणि त्यांना अक्कल येत नाही असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.
भारताच्या सैन्यात मुस्लिन सैनिक आहेत, भारताच्या पोलीस दलात मुस्लीम आहेत आणि ते अधिक कडवट आहेत. आणि भारताच्या संरक्षण दलात डॉ. कुरुलकरसुद्धा आहेत. जेव्हा लोक अशा प्रकाराची भूमिका मांडतात त्यांनी परत एकदा अभ्यास केला पाहिजे. कश्मीरमध्ये शहीद होणारे जास्तीत जास्त मुस्लीम आहेत. जे अतिरेक्यांशी लढतात, महाराष्ट्रात असतील, कारगीलच्या युद्धभूमीवर असतील. मुस्लिमांनी प्राणाचे बलिदान देऊन या देशाचे संरक्षण केलं आहे. हा इतिहास आणि वर्तमान तुम्हाला बदलता येणार नाही. हे काही लोकांना डबक्यातच रहायचं आहे, हिंदुत्वाच्या नावाने डराव डराव करायचं आहे करुद्या. या देशाची जनता शहाणी आहे असेही संजय राऊत म्हणाले.
देशात हिंदु वि. मुस्लीम दंगली घडवण्याचा कट सुरू आहे. भारत वि. न्युझीलंड मॅच झाली आणि त्यात भारताचा विजय झाला. काही लोकांनी विजयी मेळावे काढले आणि विशिष्ट भागात जाऊन दंगल केली. सामना भारत आणि न्युझीलंडचा आहे, विजयी जल्लोष आपापल्या पद्धतीने साजरा करतो. पण त्यालाही धार्मिक रंग देण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला. हे करणारे विशिष्ट राजकीय विचारसरणीचे लोक आहेत. भारत जिंकला त्याच उत्सव साजरा करा, कोण हरलं त्यापेक्षा आम्ही जिंकलो त्यासाठी तुम्हाला मशीदीसमोर वाद्य वाजवणं, दंगली घडवणं मुस्लिमांना शिव्या देणं या गोष्टी करण्याची गरज काय. हे विशिष्ट हेतूने केलं जात आहे, काही करून दंगली भडकावल्या पाहिजे. आणि पुढची जी निवडणूक आहे, त्यांना कुठलाही अजेंडा नसल्यामुळे चार वर्ष दंगलीचा धूर बिहार निवडणूक पश्चिम बंगालच्या निवडणुकांना सामोरं जायचं हे त्यांच धोरण आहे.
शिवाजी महाराजांनी जे राज्य आणलं ते सर्वाचं होतं. बाळासाहेब ठाकरे यांनी सरकार आणलं ते शिवशाही राज्य होतं. आताच्या लोकांना वाटतं की हे सरकार सगळ्यांचं नाही, काही विशिष्ट धर्माचं आणि गटाचं राज्य आहे. आफ्रिकेत जसं टोळीयुद्ध होतं, तसं हे लोक इथे टोळी युद्ध सुरू करतील. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना या देशातून काय घडवायचं आहे हे अजूनही कळत नाहिये. अशांने त्यांनाही या देशात राज्य करता येणार नाही असेही संजय राऊत म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List