प्रार्थना स्थळांवरील रात्रीचे भोंगे बंद, न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणार

प्रार्थना स्थळांवरील रात्रीचे भोंगे बंद, न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणार

प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिला. प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांना यापुढे सरसकट परवानगी दिली जाणार नाही, तसेच ध्वनिमर्यादा ओलांडणाऱ्या प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांची परवानगी रद्द केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांमुळे ध्वनिप्रदूषण होत असल्याचा मुद्दा भारतीय जनता पक्षाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे मांडला होता. फरांदे यांनी मशिदींचा उल्लेख प्रामुख्याने करत मशिदींमध्ये जाऊन अजाण म्हणणे हा अधिकार असला तरी भोंग्यांवर अजाण म्हणण्यास न्यायालयाने विरोध केला होता आणि भोंगा हा कुठल्याही धर्माशी निगडित नाही, असेही स्पष्ट केले आहे. तरीही प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांवर कारवाई होत नाही, असे फरांदे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या लक्षवेधीला उत्तर दिले. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कुठल्याही प्रार्थनास्थळावर भोंगे लावण्याआधी परवानगी घेतली पाहिजे. रात्री 10 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत भोंगे बंद असले पाहिजेत. सकाळी 6 ते रात्री 10 वाजण्याच्या कालावधीत दिवसा 55 डेसिबल्स आणि रात्री 44 डेसिबल्स इतकी ध्वनिमर्यादा असली पाहिजे. कायद्यानुसार अधिक डेसिबल्सने भोंगे वाजत असतील तर त्यावर कारवाई करण्याचे अधिकार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला केंद्रीय कायद्याने दिले आहेत. पोलिसांनी खातरजमा करून त्यासंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाला कळवावे अशी तरतूद या कायद्यात आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

नियमात बदल करणार

भोंग्यावर कारवाईचे अधिकार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला आहेत. त्यामुळे नियमांमध्येही काही प्रमाणात बदल करणे अपेक्षित आहे. हे बदल झाल्यास भोंग्यावर अधिक प्रभावी कारवाई करता येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून नियमांमध्ये बदल करण्यास सुचविले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

नियमांचे उल्लंघन झाल्यास पोलिसांवरही कारवाई

भोंग्यांसंदर्भातील नियमांचे पालन होतेय की नाही हे पाहण्याची जबाबदारी संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकाची असेल. पोलीस निरीक्षकाने प्रत्येक प्रार्थनास्थळात जाऊन भोंग्याची परवानगी घेतली आहे की नाही? याची तपासणी केली पाहिजे. भोंग्याचे डेसिबल मोजून आवाजाची मर्यादा ओलांडली गेली असेल तर पहिल्या टप्प्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाला सांगणे आणि दुसऱ्या टप्प्यात पुन्हा परवानग्या न देण्याचा मार्ग अवलंबला पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच त्याचे पालन झाले नाही तर त्या पोलीस निरीक्षकावरही कारवाई केली जाईल, असाही इशारा त्यांनी दिला.

यापुढे भोंग्यांना परवानगी नाही

यापुढे कुणालाही सरसकट भोंग्यांची परवानगी देण्यात येणार नाही. निश्चित कालावधीकरताच भोंगे लावता येतील. त्यानंतर पुन्हा भोंगे लावायचे असल्यास संबंधितांनी पुन्हा पोलिसांकडून परवानगी घ्यावी, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ज्या ठिकाणी आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन होईल त्यांना पुन्हा परवानगी दिली जाणार नाही आणि भोंगे जप्त केले जातील, असेही त्यांनी सांगितले. उत्तर प्रदेश सरकारने ज्याप्रकारे भोंग्यांवर कारवाई केली आहे त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारही कारवाई करणार का? असा प्रश्नही त्यांनी विचारला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

विकी कौशल ‘या’ गंभीर आजारातून बाहेर आलाय; हातपाय उचलणे देखील झाले होते बंद विकी कौशल ‘या’ गंभीर आजारातून बाहेर आलाय; हातपाय उचलणे देखील झाले होते बंद
बॉलीवूडमध्ये सध्या कोणत्या अभिनेत्याची हवा असेल तर तो अभिनेता विकी कौशल आहे. विकी कौशलने त्याच्या ‘छावा’ चित्रपटामुळे सर्वांच्या मनात स्वत:ची...
‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत दोन सख्ख्या भावांची गोष्ट; कुटुंबातील नाजूक नात्यावर भाष्य
हे किती अश्लील..; केतिका शर्माचा डान्स पाहून गाण्यावर बंदीची मागणी
Amrish Puri च्या लेकीला पाहिलंय? तिच्यापुढे अभिनेत्रींचा बोल्डनेस फेल, ‘या’ क्षेत्रात ‘मोगॅम्बो’च्या लेकीचं मोठं नाव
काजोलने मुंबईतील सर्वात पॉश एरियात खरेदी केली कोट्यवधींची प्रॉपर्टी, किंमत जाणून थक्क व्हाल
शक्तिपीठ महामार्गग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची ग्वाही
Teeth Care Tips- स्वच्छ सुंदर मोत्यांसारख्या दातांसाठी या घरगुती टिप्स ठरतील खूप परिणामकारक