राज्यात तीन वर्षांत रस्ते अपघातांत 46 हजार जणांचा मृत्यू, ड्रग्ज सेवनाची चाचणी करण्यासाठी उपकरणे
मुंबईसह मोठय़ा शहरात मद्यपान आणि ड्रग्जचे सेवन करून वाहने चालवण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी ड्रंक अॅण्ड ड्राईव्हच्या केसेस वाढत आहेत. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी ड्रायव्हरची अल्कोहोल चाचणी करण्यात येते. पण आता ड्रग्ज सेवनाची चाचणी करण्यासाठी पुढील तीन महिन्यांत परिवहन विभागाच्या वतीने खास उपकरणे घेण्यात येणार आहेत, अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधानसभेत दिली. दरम्यान राज्यात मागील तीन वर्षांत रस्ते अपघतात 45 हजार 925 जणांचा मृत्यू झाल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. राज्यातील रस्ते अपघातांबाबत आमदार काशीनाथ दाते यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
ऑटोमेटिक टेस्ट ट्रकचा उपयोग
यावेळी चर्चेला उत्तर देताना प्रताप सरनाईक म्हणाले की, वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी परिवहन विभागाने 263 इंटरसेप्टर वाहनांची खरेदी केली आहे. चालक परवान्यांमध्ये अधिक कडक नियमावली अमलात आणण्यात येत आहे. राज्यात 38 ठिकाणी स्वयंचलित वाहनचालक चाचणी सुरू आहे. यामध्ये 70 टक्के परवानाधारक अपात्र ठरले आहेत. यापुढे चालक परवान्यांमध्ये अचूकता येण्यासाठी ऑटोमेटिक टेस्ट ट्रकचा उपयोग करण्यात येणार आहे. वाहतूक नियमांच्या उल्लंघनप्रकरणी दंड करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचाही (एआय) उपयोग करण्यात येईल, असेही सरनाईक यांनी सांगितले.
राज्यातील 2022 ते 2024 मधील रस्ते अपघात आणि मृत्यू
वर्ष 2022 2023 2024
अपघात 33,383 35,243 36,084
मृत्यू 15,224 15,366 15, 335
कायद्याचा धाक नाही
शिवसेना नेते व शिवसेना विधान मंडळ पक्षनेते आदित्य ठाकरे यांनीही या चर्चेत भाग घेतला. ते म्हणाले की, रस्त्यावर सीसीटीव्ही, पोलीस असतात. कायद्याचा धाक उरलेला नाही. कोस्टल रोड किंवा मरीन ड्राईव्हचा रस्ता असो, अनेक वाहनचालक विरुद्ध दिशेने वाहने आणतात. त्यामुळे रस्त्यावर पोलिसांची संख्या वाढवण्याची आणि दंडाची रक्कम वाढवण्याची सूचना केली. दंडाची रक्कम वाढवली तर धाक निर्माण होईल, असे ते म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List