प्रासंगिक – कलाकारांची आळंदी
>> डॉ. गजानन सीताराम शेपाळ
देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबापुरीमध्ये एका मोठ्या उपक्रमाला शासन स्तरावर सुरुवात झाली आहे. या वर्षी महाराष्ट्रासाठी दोन मोठ्या दृश्य कलाकारांचा पद्म पुरस्काराने सन्मान झाला. ही बाब आनंदाची आणि गौरवाची आहे. ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत आणि अक्षर सुलेखनकार अच्युत पालव या दोन दृश्य कलाकारांना भारत सरकारने पद्म पुरस्कार देऊन सन्मानित केलं. त्यांच्या प्रमुख उपस्थितीतच पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई या जुन्या वास्तूचे नूतनीकरण करून उद्घाटन करण्यात आले. पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आता खूप देखण्या आणि अद्ययावत अशा वास्तूमध्ये रूपांतरित करण्यात आली आहे. ही घटना दृकश्राव्य कलेच्या क्षेत्राला खूपच अभिमानाची आणि महत्त्वाची वाटते. या अकादमीमध्ये एपंदर 15 प्रकारच्या सुविधा आहेत. तीन नाटय़गृहे, पाच प्रदर्शन दालने, दोन संगीत दालने, तीन अभिनय दालने, एक चित्रकला कक्ष आणि एक माती कला किंवा मूर्तिकला कक्ष, दोन वाद्य कक्ष, एक आभासी चित्रीकरण कक्ष, एक ध्वनिमुद्रण व ध्वनिरोपण कक्ष, पाच संकलन कक्ष, एक कॉन्फरन्स हॉल,एक सृजन कक्ष, एक नॅनो थिएटर, तीन नृत्य दालने, विस्तार कक्ष, खुले नाटय़गृह व कलांगण असे अद्ययावत 15 विभाग या वास्तूमध्ये सुरू झालेले आहेत.
या वास्तूच्या परिसरामध्ये एक प्रचंड मोठी घंटा आणि वाढविलेले श्रीफळ असे शुभसूचक दोन आकार प्रथमदर्शनी दिसतात. थोडंसं पुढे गेल्यावर महाराष्ट्र भूषण, ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांचा फोटो आणि त्यांचा एक पुतळा वास्तूच्या प्रमुख दर्शनी भागामध्ये दिसतो. परिसर फार सुंदर रीतीने सजवलेला आहे. नंतर एक कट्टा समोर दिसतो. त्या ठिकाणी वेगवेगळ्या गप्पा किंवा साहित्य गप्पा किंवा कलाकार कट्टा अशा अर्थाचे काही अनौपचारिक कार्यक्रम करता येऊ शकतील अशा स्वरूपाची योजना केलेली आहे. त्यानंतर कलेशी जवळीक साधणारे वातावरण निर्माण करण्याचा फार प्रभावीपणे प्रयत्न केलेला आहे आणि या सगळ्या गोष्टींचं श्रेय जातं संचालिका मीनल जोगळेकर यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना. त्यांच्याशी बोलताना त्यांनी सांगितलं की, साधारण 1000 चौरस फुटांची दोन स्वतंत्र दालनं किंवा ती जर एकत्र जोडली तर 2000 चौरस फुटांचे एक भव्य दालन, 700 चौरस फुटांची तीन अशी एपंदर पाच नवीन कला दालने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. जहांगीर कलादालन, ज्याला कलाकारांची पंढरी म्हणून ओळखले जाते, त्या ठिकाणी कला प्रदर्शनासाठी 7/8 वर्षांची प्रतीक्षा असते, परंतु आता पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये कलाकारांना प्रभावी पर्याय उपलब्ध झालेला आहे. जणू दृश्य कलाकारांची आळंदी म्हणजे या वास्तूतील प्रशस्त प्रदर्शन दालने सुरू झालेली आहेत. जसा आळंदीतूनच पंढरीच्या वारीला प्रारंभ होतो, त्याचप्रमाणे पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी नामक आळंदीतूनच दृश्य कलाकारांना त्यांच्या दृश्यकला साधनेची कला दिंडी सुरू करता येणार आहे. या दालनांसाठी प्रदर्शनांचे आयोजन सुनियोजित व्हावे यासाठी कला संयोजक म्हणून वर्षा कारळे यांची नियुक्ती केली आहे.
2 मार्चला मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत 45 कलाकारांच्या कलाकृतींचे एका भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले, जे सध्या या वास्तूमध्ये सुरू आहे. या प्रदर्शनात मांडलेल्या कलाकृती या विविध माध्यमांमध्ये, विविध शैली आणि तंत्रांमध्ये, मूर्त-अमूर्त स्वरूपात पाहायला मिळतात. या कलाकृती सर्वश्री पद्मश्री वासुदेव कामत, पद्मश्री अच्युत पालव, ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुळकर, दिलीप रानडे, प्रकाश बाळ जोशी, चंद्रमोहन कुलकर्णी, श्रीकांत जाधव, अरविंद हाटे, डग्लस जॉन, प्रकाश राजेशिर्पे, ज्योत्स्ना कदम, प्रतिभा वाघ, वसंत सोनवणी, डॉ.गणेश तरतरे, मनोज कुमार सकळे, उमाकांत कानडे, दिनकर जाधव, प्रीतम देऊळकर, राजेंद्र पाटील, सतीश वावरे, विशाखा आपटे, राजेश वानखेडे, प्रवीण मिसाळ, संजय सावंत, विजयराज बोधनकर, वैशाली पाटील, नीलेश वेदे, श्रीकांत शितोळे, मिलिंद लिंबेकर, सुरेंद्र जगताप, मीनाक्षी पाटील, राधिका कुसुरकर/वाघ, प्रशांत प्रभू, शेफाली भुजबळ, शशी त्रिपाठी, स्वीटी जोशी, देवदत्त पाडेकर, संतोष क्षीरसागर, प्रमोद कांबळे, महेश अंजरलेकर, विक्रांत मांजरेकर, प्रदीप शिंदे, सिद्धार्थ साठे आणि मी अशा 45 अनुभवी चित्रकार आणि शिल्पकारांच्या कलाकृती या प्रदर्शनामध्ये प्रदर्शित करण्यात आलेल्या आहेत. हे प्रदर्शन 15 मार्चपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे.
(लेखक ज्येष्ठ चित्रकार, रंगतज्ञ आणि दृश्यकला लेखक आहेत.)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List