5 लाखांत करणार होते बालकाची विक्री, सौदा फिसकटल्याने झाले गजाआड
रस्त्यावर आई सोबत झोपलेल्या 38 दिवसांच्या मुलाचे अपहरण करून त्याची विक्री करणाऱ्या टोळीला वनराई पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. राजू मोरे, मंगल मोरे, फातिमा शेख आणि मोहंमद उमर खान अशी त्यांची नावे आहेत. त्या चौघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. सुरेश हे पत्नी आणि 38 दिवसांच्या मुलासोबत वसई परिसरात राहतात. त्यांचा चादर विक्रीचा व्यवसाय आहे. अकरा दिवसांपूर्वी ते पत्नी आणि मुलासोबत चादर विक्रीसाठी गोरेगाव परिसरात आले. रात्री उशीर झाल्याने ते घरी न जाता पश्चिम द्रुतगती महामार्गानजीकच्या एका फुटपाथवर झोपले होते. रात्री अज्ञात व्यक्तीने त्याच्या मुलाचे अपहरण केले. हा प्रकार सुरेश याच्या लक्षात आला. त्याने वनराई पोलीस ठाण्यात धाव घेतली. वनराई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला. परिमंडळ 12 मधील अधिकाऱ्याचे एक पथक तयार केले. पथकाने सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तसेच काही रिक्षाचालकांची देखील चौकशी केली.
तपासा दरम्यान पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी राजू, मंगल, फातिमा, मोहंमदला ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यावर त्यांनी मुलाचे अपहरण केल्याची कबुली दिली. त्यांच्या तावडीतून मुलाची सुटका केली. 5 लाख रुपयांत त्या मुलाची विक्री केली जाणार होती. मात्र खरेदीचा सौदा फिसकटल्याने त्या चौघांना गजाआड व्हावे लागले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List