पाकिस्तानी राजदूताला अमेरिकेत प्रवेश नाकारला; विमानतळावरूनच परत पाठवलं
आधीच कंगालीच्या मार्गावर असणाऱ्या पाकिस्तानला मोठ्या लाजिरवाण्या गोष्टीला सामोरं जावं लागलं आहे. पाकिस्तानच्या एका वरिष्ठ राजदूताला वैध व्हिसा ( VISA ) आणि आवश्यक कागदपत्रे असूनही अमेरिकेत प्रवेश नाकारण्यात आला. पाकिस्तानच्या ‘द न्यूज’ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. तुर्कमेनिस्तानमधील पाकिस्तानचे राजदूत के. के. वागन यांना लॉस एंजेलिसमध्ये पोहोचताच अमेरिकन इमिग्रेशनने रोखलं आणि तिथूनच हद्दपार केलं.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयातील एका अधिकाऱ्याच्या हवाल्यानं हे वृत्त प्रसिद्ध करण्यात आलं आहे. यात म्हटलं आहे की राजदूतावर ‘इमिग्रेशन आक्षेप’ होता.
वागन हे बरेच अनुभवी राजदूत आहेत आणि ते लॉस एंजेलिसमध्ये वैयक्तिक कामासाठी गेले होते. वृत्तात म्हटलं आहे की त्यांच्याकडे वैध अमेरिकन व्हिसा आणि इतर प्रवास कागदपत्रे आहेत.
लॉस एंजेलिसमध्ये पोहोचल्यानंतर इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी वागन यांना थांबवलं आणि अधिकाऱ्यांनी राजदूतांच्या प्रोटोकॉलबद्दल चिंता व्यक्त केली. अमेरिकन अधिकाऱ्यांनी वागन यांच्या व्हिसामधील काही मुद्द्यांना आक्षेप घेतला. मात्र कोणत्या गोष्टींमुळे त्यांना अमेरिकेत प्रवेश नाकारण्यात आला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही, असं राजदूत सूत्रांच्या हवाल्यानं वृत्तात म्हटल आहे. त्यानंतर त्यांना लॉस एंजेलिसमधून परतण्यास सांगण्यात आलं.
या वृत्तानुसार, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार आणि इतर उच्च अधिकाऱ्यांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली आहे. या घटनेचे स्पष्टीकरण देण्यासाठी वागन यांना इस्लामाबादला बोलावले जाण्याची शक्यता आहे.
जिओटीव्ही या पाकिस्तानी वृत्तवाहिनीने सांगितले की, त्यांच्या परराष्ट्र कार्यालयाने वागन हे लॉस एंजेलिसच्या खासगी दौऱ्यावर होते आणि या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे. दरम्यान या वृत्ताची पुष्टी करण्यात आली आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प लवकरच पाकिस्तानवर प्रवास बंदी लादण्याच्या तयारीत आहेत, ज्यामुळे पाकिस्तानी नागरिकांना अमेरिकेत प्रवेश करण्यास प्रभावीपणे प्रतिबंधित केले जाईल.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List