बटरफ्लाय पुलाच्या ठेकेदाराला दिवसाला 10 हजारांचा दंड; देयकामधून करणार वसुली; मार्चअखेर काम पूर्ण होणे अपेक्षित
चिंचवडगावातून थेरगावाच्या दिशेने मोठ्या वाहनांना जाण्यासाठी महापालिकेने हाती घेतलेल्या पवना नदीवरील ‘बटरफ्लाय’ आकारातील पुलाचे काम मुदत संपल्यानंतरही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे संबंधित ठेकेदाराला 7 सप्टेंबर 2024 पासून दिवसाला 10 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे. आत्तापर्यंत 18 लाख रुपयांचा दंड झाला असून, ही रक्कम ठेकेदाराच्या देयकामधून वसूल करण्यात येणार आहे. तसेच मार्चअखेर पुलाचे काम पूर्ण होण्याचा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
थेरगाव येथील प्रसूनधाम हाऊसिंग सोसायटीशेजारी 18 मीटर विकास आराखड्यातील रस्त्यावर थेरगाव चिंचवड हा बटरफ्लाय पूल बांधण्याचे काम महापालिकेने 2017 मध्ये हाती घेतले. हा पूल थेरगाव आणि चिंचवड अशा दोन गावांना जोडणारा आहे. निविदा खर्च 25 कोटी 19 लाख रुपये अपेक्षित धरण्यात आला होता. त्यामध्ये ‘धनेश्वर कन्स्ट्रक्शन’ यांनी 14 टक्के म्हणजेच 28 कोटी 71 लाख रुपये असा जादा दर सादर केला. इतर दोन ठेकेदारांपेक्षा त्यांचा दर कमी असल्याने त्यांना या पुलाचे बांधकाम देण्यात आले होते. पुलाची 107मीटर लांबी, तर 18 मीटर रुंदी आहे. या पुलासाठी नदीपात्रामध्ये कोणताही खांब टाकलेला नाही. त्यामुळे पवना नदीचा प्रवाह सुरळीत वाहू शकणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. 18 महिन्यांच्या मुदतीत पुलाचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे कामास 31 ऑक्टोबर 2022पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.
या कामात मुख्य पुलाचे काम, तसेच पोहोच रस्त्याच्या कामाचा अंतर्भाव करण्यात आला होता. तथापि, या कामासाठी जलसंपदा विभागाच्या तरतुदीनुसार पुलाच्या उंचीचे नियोजन करून मुख्य पुलाचे ‘डिझाइन’ करण्यात आले. या डिझाइननुसार पुलाच्या उंचीत वाढ करावी लागली. त्यामुळे मूळ कामाच्या परिमाणात वाढ झाल्याने मूळ निविदा रकमेमध्ये पुलाचे काम पूर्ण करणे शक्य नसल्याचे सांगत उर्वरित काम करण्याकरिता नवीन अंदाजपत्रक तयार केले. बटरफ्लाय पुलासाठी थेरगाव बाजूकडील पोहोच रस्त्यास भिंत बांधणे, मुरूम भराव करणे, रस्त्याचे ‘सबग्रेड’चे काम, डांबरीकरण, तसेच चिंचवड बाजूकडील रस्त्याचे सबग्रेडचे काम, डांबरीकरण आणि दिशादर्शक फलक अशी कामे पूर्ण करण्यासाठी निविदाप्रक्रिया राबविली. 11 कोटी तीन लाख रुपयांचे काम एस. सी. कटारिया या ठेकेदाराला देण्यात आले. ऑगस्ट 2023मध्ये कार्यारंभ आदेश देण्यात आला. कामाची मुदत सप्टेंबर 2024 पर्यंत होती. या मुदतीत काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे 7 सप्टेंबर 2024 पासून प्रतिदिवस 10 हजार रुपयांची दंड आकारणी सुरू केली आहे. 26 जानेवारी 2025 पर्यंत काम पूर्ण करण्याच्या सूचना ठेकेदाराला दिल्या होत्या; परंतु या कालावधीतही काम पूर्ण झाले नाही. सद्यः स्थितीत हे काम सुरूच आहे. मार्चअखेरपर्यंत उर्वरित काम पूर्ण होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. पुलाच्या कामांवर तब्बल 39 कोटी 74 लाख रुपये खर्च होऊनही नागरिकांना पुलाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
वाहतुकीवरील ताण कमी होणार
थेरगाव आणि चिंचवडला जोडणारे दोन पूल सध्या पवना नदीवर आहेत. बिर्ला रुग्णालयाशेजारी मोठा, तर धनेश्वर मंदिराजवळ छोटा पूल आहे. हा छोटा पूल अरुंद असल्याने येथून अवजड वाहनांची वाहतूक होत नाही. नव्याने उभारण्यात येत असलेला पूल वाहतुकीसाठी फायदेशीर ठरणार आहे. या पुलाने थेरगाव येथील चिंचवड आणि तेथून पिंपरीत सहजतेने ये-जा करणे वाहनचालकांना शक्य होणार आहे.
मुदतीत काम पूर्ण न झाल्यामुळे एस. सी. कटारिया या ठेकेदाराला दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. 7 सप्टेंबर 2024 पासून एका दिवसाला 10 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे. दंडाची रक्कम देयकामधून वसूल केली जाईल. मार्चअखेर काम पूर्ण होईल.
किरण अंधुरे, कार्यकारी अभियंता, पिंपरी-चिंचवड
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List