दिशाभूल करू नका खोट्याचा नायटा कराल तर बूमरँग होईल! उद्धव ठाकरे यांचा इशारा

दिशा सालियनबाबत आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसून केवळ दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे, असे नमूद करताना लोकांची दिशाभूल करू नका. खोट्याचा नायटा कराल तर बूमरँग होईल, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज महायुतीला दिला.
हा विषय कोर्टात आहे तर जे काय असेल ते कोर्टात द्या, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. ठाकरे घराण्याच्या सहा-सात पिढय़ा जनतेसमोर आहेत. या प्रकरणाशी आदित्य ठाकरे यांचा दुरान्वयानेही संबंध नाही, असे स्पष्टपणे सांगतानाच यावेळी उद्धव ठाकरे यांनी महायुतीलाही बजावले. जर का राजकारण वाईट बाजूला न्यायचे असेल तर सगळय़ांचीच पंचाईत होईल. खोट्याचा नायटा करणार असाल तर तुमच्यावरच बूमरँग होईल, असा इशारा त्यांनी दिला.
उद्धव ठाकरे म्हणाले की, गेल्या एक-दोन अधिवेशनात हा मुद्दा कसा आला नाही याचे आश्चर्य वाटतेय. दर अधिवेशनात हा मुद्दा काढला जातो, यात नवीन काय? असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. शेतकऱ्यांच्या ज्या चिता पेटत आहेत त्याला जबाबदार कोण आहे? त्यांच्या माता-भगिनी टाहो फोडत आहेत, त्यांच्या मुलीबाळी सांगत आहेत की, आमच्या वडिलांची आत्महत्या झाली आहे, आमच्या वडिलांची हत्या झाली आहे, त्यांच्या चौकशीचे काय? संतोष देशमुखांची मुलगी बोलते की, माझ्या वडिलांच्या हत्येचं काय? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी सरकारला केला.
…तेच विष भाजपला मारतेय
मंत्र्यांनी भडकाऊ भाषणे करू नये असेही फडणवीस त्या मुलाखतीत म्हणाले होते. त्याबाबत उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘त्याचे आपण स्वागत करतो, पण भाजपमध्ये त्यांनी काही आगलावे लोक घेतले आहेत. दुर्दैवाने विरोधी पक्ष संपवायला ज्या विषाचा फडणवीस यांनी वापर करण्याचा प्रयत्न केला तेच विष आता भाजपला मारतेय.’
सरकारच्या कारभाराचे धिंडवडे दिवसागणिक सर्वांसमोर येत आहेत आणि वेळ मारून न्यायची म्हणून सगळय़ांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. थडगी उकरायची, आणखी काय काढायचे या सर्व गोष्टी थांबवून जनतेने खरंच बहुमत दिले असेल तर ते सत्कारणी लावा, संधी मिळालीय त्याचे सोने करा, चिखल करू नका, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारला लगावला.
बहुमताचे सरकार सत्तेत आल्यानंतर राज्यासमोरचे प्रश्न सुटतील, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होईल, लाडक्या बहिणी ताबडतोब 2100 रुपये मिळायला लागतील असे वाटले होते, परंतु तसे काहीच होताना दिसत नाही. बलात्कार, भ्रष्टाचार थांबतील असे काहीच दिसत नाही, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.
तुम्ही दुसरा घरोबा केला हाय काय?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर या दोन्ही नेत्यांचा काही भरवसा नाही, असे उत्तर दिले होते. त्याबाबत पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांना विचारले असता ते म्हणाले की, ‘ते गाणे होते ना, सोनू तुला माझ्यावर भरोसा नाय काय? तसे विचारा त्यांना. त्या गायिकेचा सत्कारही देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असतानाच वर्षा बंगल्यावर केला होता. म्हणून त्यांनी हा दुसरा घरोबा केला हाय काय,’ असा मिश्कील टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
न्यायालयातच बोलेन ः आदित्य ठाकरे
सालियन विषयासंदर्भातही माध्यमांनी आदित्य ठाकरे यांना विचारले असता, गेली पाच वर्षे त्या प्रकरणावरून माझ्या बदनामीचा प्रयत्न झाला. न्यायालयात याचिका दाखल झाल्याने न्यायालयातच त्याबाबत बोलेन, असे ते म्हणाले.
नागपूरमध्ये दंगल घडते त्याच कालावधीत अधिवेशनात भाजपचे आमदार नगरविकास खाते आणि ठाणे पालिकेतला भ्रष्टाचाराचा कारभार चव्हाट्यावर आणताहेत म्हणजे नेमकं हे भांडण किंवा दंगल आहे तरी कुणाची… नेमका हा काय योगायोग आहे.
विधिमंडळात लोकशाहीच्या नीतिमूल्यांचे अवमूल्यन
सत्ताधारी ढीगभर आहेत आणि विरोधी पक्ष मूठभर, पण तोच मूठभर विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांना भारी पडतोय. त्यामुळे ज्या पद्धतीने सभागृहाचे कामकाज रेटले जातेय ते लोकशाहीच्या नीतिमूल्यांचे अवमूल्यन करणारे आहे. राज्यपालांनी सत्ताधाऱ्यांचे कान पकडून जाब विचारला पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News

Comment List