‘स्टॅच्यू मॅन’ राम सुतार यांना ‘महाराष्ट्र भूषण’; वयाच्या 100व्या वर्षी राज्याचा सर्वोच्च सन्मान

‘स्टॅच्यू मॅन’ राम सुतार यांना ‘महाराष्ट्र भूषण’; वयाच्या 100व्या वर्षी राज्याचा सर्वोच्च सन्मान

शिल्पकलेचे भीष्माचार्य, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार ‘स्टॅच्यू मॅन’ राम सुतार यांना आज ‘महाराष्ट्र भूषण’ जाहीर झाला. जगातील सर्वांत उंच पुतळा साकारणाऱ्या कलातपस्वीला वयाच्या 100 व्या वर्षी राज्याचा सर्वोच्च सन्मान मिळाला. राम सुतार यांनी केवळ अद्भुत शिल्पं साकारली नाहीत तर शिल्पांच्या माध्यमातून देशाची संस्कृती, परंपरा आणि इतिहास जगभरात पोहचवला. आजही जन्मभराची शिल्पसाधना त्यांना स्वस्थ बसू देत नाही. दिल्लीतील स्टुडिओत त्यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड काम सुरू आहे. त्यांच्या या साधनेचा गौरव ‘महाराष्ट्र भूषण’ने झाला त्यासाठी त्यांनी आभार मानले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराची घोषणा केली. 12 मार्च 2025 रोजी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड समितीच्या बैठकीत ‘महाराष्ट्र भूषण 2024’ या पुरस्कारासाठी ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांच्या नावाला मान्यता देण्यात आली, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. 25 लाख रुपये, मानपत्र, मानचिन्ह असे या पुरस्काराचे आहे. राम सुतार यांचे वय 100 वर्षे आहे. अजूनही ते शिल्प तयार करत आहेत. इंदू मिल येथे उभारण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिल्प राम सुतार हेच साकारत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली.

देश आणि देशाबाहेरील असंख्य शिल्पं घडवून स्वतःची नाममुद्रा उमटवली. हिंदुस्थानी संस्कृती, परंपरा आणि इतिहास  यांचे भव्य दर्शन घडवणाऱ्या शिल्पकृती जगभरात प्रसिद्ध आहेत. 19 फेब्रुवारी 1925 रोजी महाराष्ट्रातील धुळय़ामधील गोंडूर या  गावी एका गरीब कुटुंबात राम सुतार यांचा जन्म झाला. गुरू रामकृष्ण जोशी यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांनी मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला. छत्रपती संभाजीनगर येथील पुरातत्व विभागात मॉडेलर म्हणून काम करताना 1954 ते 1958 या काळात त्यांनी अजिंठा आणि एलोरा येथील प्राचीन लेण्यांमधील शिल्पांच्या जीर्णोद्धाराचे काम केले. राम सुतार यांनी 1960 पासून त्यांचा स्वतंत्र स्टुडिओ उभारला. आजवर कारकीर्दीत त्यांनी भव्य शिल्पं साकारली. त्यांचे प्रत्येक शिल्प अप्रतिम आणि सौंदर्याचा अद्भुत नमुना आहे. देशातच नव्हे तर जगभरात त्यांनी महात्मा गांधींचे अनेक पुतळे साकारले. कला क्षेत्रातील योगदानाबद्दल 2016 मध्ये ‘पद्मभूषण’ आणि 1999 मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांचा मुलगा अनिल सुतार हे व्यवसायाने आर्किटेक्ट, शिल्पकार आहेत. अनिल सुतार नोएडामधील वडिलांच्या स्टुडिओ आणि वर्कशॉपचे काम पाहतात.

राम सुतार वयाच्या 100 व्या वर्षी अजरामर कलाकृती साकारण्यात मग्न आहेत. अरबी समुद्रातील शिवरायांचा पुतळा, मालवण राजकोट  येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, इंदू मिल स्मारकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब यांचा पुतळा, पिंपरी–चिंचवड येथे छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा ते साकारत आहेत.

संसद परिसरात 16 पुतळे

राम सुतार यांनी चंबळच्या देवीची मूर्ती साकारली होती. ही मूर्ती पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना इतकी आवडली की, त्यांना भाक्रा नानगल धरणावर ब्राँझचा पुतळा बनवण्यास सांगितले; मात्र काही कारणामुळे हा प्रकल्प अपूर्ण राहिला. त्यानंतर सुतार यांनी संसदेच्या आवारात बसविण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, नेहरू, इंदिरा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, भगतसिंग, महात्मा फुले, अशा थोर विभूतींचे 16 पुतळे बनवले.

महत्त्वाची शिल्पे

संसद भवनाच्या आवारातील मौलाना आझाद (18 फूट), इंदिरा गांधी (17 फूट), राजीव गांधी (12 फूट), गोविंदवल्लभ पंत (10 फूट) आणि जगजीवनराम (9 फूट) असे अनेक पुतळे राम सुतार यांनी घडविले आहेत.

समस्त कलावंतांसाठी अभिमानाचा क्षण

ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर होणं ही आम्ही समस्त शिल्पकार, कलावंत परिवारासाठी अत्यंत  अभिमानाची गोष्ट आहे. कारण कलावंतांच्या वाटय़ाला असे सर्वेच्च सन्मान तसे कमी येतात. कलेसाठी  पद्मभूषण, पद्मश्री असे उच्च सन्मान अन्य क्षेत्रांच्या तुलनेत कमी मिळालेत. कारण कला नेहमीच दुर्लक्षित राहिलेली आहे. त्यामुळे राम सुतार सरांना मिळालेल्या सन्मानाबद्दल खूप आनंद वाटतोय. दोन महिन्यांपूर्वी ते  मुंबईत आले  होते. गीतकार गुलजार यांच्यासोबत त्यांची भेट झाली होती. तेव्हा त्या भेटीत माझा विषय निघाला होता. गुलजार साहेबांनी माझी काही शिल्पं त्यांना दाखवली होती. त्या भेटीनंतर राम सुतार यांनी मला फोन केला. त्यांच्याशी बोलणं झालं.  इतक्या मोठय़ा व्यक्तीने आठवणीने फोन केल्याबद्दल खूप आनंद वाटला.

नुकतीच त्यांनी वयाची शंभरी पार केली. ते भाग्यवान आहेत त्यांची तब्बेत साथ देतेय. मी ऐकून आहे की आजही ते कलेची साधना करताहेत. त्यांनी आजवर बरंच काम केलंय. बऱ्याचदा त्यांच्याशी शिल्पकलेविषयी बोलणं होतं. परस्परांच्या कामाविषयी चर्चा होते. राम सुतार यांनी विधानभवनातील महात्मा गांधीजींचा पुतळा साकारला आहे. हा पुतळा माझा अत्यंत आवडता आहे. या पुतळ्याचा पोत  खूप छान आहे. त्यांनी तरुणपणी केलेले ते काम आहे. कलाक्षेत्रात नव्याने येणाऱ्या कलावंतांसाठी त्यांचे काम प्रेरणादायी आहे. – भगवान रामपुरे, ज्येष्ठ शिल्पकार

जगातील सर्वात उंच पुतळा साकारणारे हात

जगातील सर्वात उंच पुतळा साकारणारे हात राम सुतार यांचे आहेत. त्यांनी गुजरातमध्ये लोहपुरुष दिवंगत सरदार वल्लभभाई पटेल यांचा 182 मीटर (597 फूट) उंच पुतळा साकारला आहे. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ या नावाने ही कलाकृती ओळखली जाते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अणुशक्ती विभाग स्थानीय लोकाधिकार समितीतर्फे शिवजयंती उत्साहात, छत्रपती शिवरायांचा जयघोष, बाईक रॅली, पोवाडे अणुशक्ती विभाग स्थानीय लोकाधिकार समितीतर्फे शिवजयंती उत्साहात, छत्रपती शिवरायांचा जयघोष, बाईक रॅली, पोवाडे
अणुशक्ती विभाग स्थानीय लोकाधिकार समिती बीएआरसी तारापूरतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवामध्ये सुमारे दोन हजार शिवभक्तांची...
चढ-उतारानंतर शेअर बाजार सावरला
जम्मू-काश्मीरमधील कठुआमध्ये चकमक; 3 दहशतवादी ठार तर, 3 जवानही शहीद
IPL 2025 – मिचेल मार्श आणि निकोलस पुरनचा वादळी धमाका, लखनऊचा हैदराबादवर 5 विकेटने विजय
मंत्रालयात प्रवेशासाठी अत्याधुनिक प्रणाली, आता मंत्रालयात जाताना अवलंबन करावी लागणार ही पद्धत
‘…तर आदित्य ठाकरे यांची देखील नार्को टेस्ट करायला पाहिजे’; दिशा सालियन प्रकरणात कदमांची मोठी मागणी
India Tour Of England- इंग्लंड दौऱ्यातून रोहित शर्मा आऊट? विराट कोहलीही मुकण्याची शक्यता