विरोधीपक्ष संपवण्यासाठी ज्या विषाचा भाजपने उपयोग केला, तेच त्यांना बाधतंय! उद्धव ठाकरेंनी सुनावलं
विरोधीपक्ष संपवण्यासाठी ज्या विषाचा भाजपने उपयोग केला, तेच त्यांना बाधतंय, असा हल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केला. विधान भवन आवारात उद्धव ठाकरे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही टीका केली आहे.
‘महिला पोलिसावर हात उचलणाऱ्यांचे हात छाटा’
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “मी आरएसएसला धन्यवाद देऊ इच्छतो, कारण ज्यांनी औरंगजेबाच्या थडग्याचा विषय काढला होता, त्यांनाच त्या थडग्यात गाडलं. जे राज्यात सध्या घडत आहे, त्यावर न बोलता, जुन्या कुठल्यातरी गोष्टींवर बोलत राहायचं. त्यावरून दंगली घडवायच्या, याचा आता राज्यात सगळ्यांना कंटाळा आला आहे. म्हणून मी आरएसएसला मुद्दामहून धन्यवाद देत आहे. नागपुरात दंगल जेव्हा घडली, किंवा घडवली, त्यामध्ये महिला पोलिसांवर ज्यांनी हात उचलला असेल त्याचे हात छाटले पाहिजेत. त्याचबरोबरीने ज्याने जाणीवपूर्वक दंगल भडकावली असेल, त्याला कायद्याचा इंगा दाखवायला हवा.”
‘मूठभर असलेला विरोधी पक्ष ढीगभर असलेल्या सत्ताधाऱ्यांना भारी पडतोय’
महायुती सरकारवर हल्लाबोल करत उद्धव ठाकरे म्हणाले, “सत्ताधारी ढीगभर आहेत आणि विरोधी पक्ष मूठभर आहेत. पण मूठभर असलेला विरोधी पक्ष ढीगभर असलेल्या सत्ताधाऱ्यांना भारी पडतोय. आज सर्वपक्षीय शिष्टमंडळ महामहीम राज्यपालांच्या भेटीला गेलं होतं. याचं कारण असं की, ज्या पद्धतीने कामकाज रेटलं जातंय, हे लोकशाहीच्या सगळ्या नीतिमूल्यांचं अवमूल्यन आणि पायदळी तुडवणारं आहे. ज्यावेळी राज्यपाल येतात आणि सदस्यांसमोर भाषण करतात, तेव्हा ते माझं सरकार किंवा आपलं सरकार, असं म्हणतात. याचाच अर्थ सरकारची जबाबदारी राज्यपालांची देखील आहे. जर ही राज्यपालांची जबाबदारी असेल, तर सहाजिकच आहे की, कामकाज जर व्यवस्थित चालवलं जात नसेल तर, सत्ताधारी पक्षाचा कान पकडण्याचा अधिकार राज्यपालांचा आहे, तो त्यांनी बजावला पाहिजे. हे सांगण्यासाठी आमचं शिष्टमंडळ तिथे गेलं होतं.”
‘नागपुरात ही दंगल नेमकी कोणी घडवली? हा संशोधनाचा विषय’
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “हे बहुमताचं सरकार सत्तेत आल्यानंतर सर्वांना वाटलं होतं, आता आपल्या राज्यासमोरील सगळे प्रश्न सुटतील. म्हणजेच शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होईल. लाडक्या बहिणींना ताबडतोब 2100 रुपये मिळतील. खून, बलात्कार, भ्रष्टाचार या गोष्टी थांबतील. पण तसं काही होताना दिसत नाही.” ते म्हणाले, “योगायोग असा विचित्र दिसत आहे की, बऱ्याच वर्षानंतर नागपुरात जातीय दंगल झाली. नागपूर हे आरएसएसचे मुख्यालय असून तिथे 30 तारखेला पंतप्रधान भेट देत आहेत. नागपूर गडकरींचा गड आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांची होमपीच आहे. अशा या होमपीचवर जातीय दंगल झाली. औरंगजेबाचं थडगं छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. महाराष्ट्रात कुठेही त्याचे पडसाद उमटले नाही, पण नागरपुरात हे घडलं. एकाबाजूला अधिवेशन सुरु असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट तिथे नियोजित असताना, नागपुरात ही दंगल नेमकी कोणी घडवली? हाही एक संशोधनाचा विषय आहे.”
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List