मध्य प्रदेशातून विक्रीसाठी आणलेला 29 लाखांचा गांजा जप्त, नगर स्थानिक गुन्हे शाखा व शेवगाव पोलिसांची कारवाई
मध्य प्रदेशातून अहिल्यानगर जिल्ह्यात गांजा विक्रीसाठी घेऊन आलेल्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले. त्यांच्याकडून 29 लाख 64 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात बापलेकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
अनिल बाबासाहेब बडे (वय – 34), बाबासाहेब धनाजी वडे (वय – 70, दोघे रा. हातगाव, ता. शेवगाव) अशी या पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी ढाकणे यांनी याबाबत फिर्याद दिली.
पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना दिलेले आहेत. त्यानुसार त्यांनी पथक नेमले. पथक शेवगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे करणाऱ्या इसमांची माहिती काढत असताना पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव यांना बाबासाहेब बडे व अनिल बडे यांनी दोन कारमधून मोठ्या प्रमाणात गांजा विक्रीसाठी आणला असून, तो जनावरांच्या गोठ्यात लपवला असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदरची माहिती शेवगावचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांना दिली. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी पाटील यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखा व शेवगाव पोलिसांच्या पथकाने बोधेगाव ते हातगाव जाणाऱ्या रोडवर बाबासाहेब बडे यांच्या घरी जाऊन जनावरांच्या गोठ्यात जाऊन पाहणी केली असता तिथे वरील दोघे आढळून आले.
तसेच गोठ्यातील खोली व घरासमोरील दोन कारची झडती घेत तेथून 66.710 किलो वजनाचा गांजा, दोन मोबाईल, एक मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट कार (क्र. एमएच-11-बीडी-5754) व एक मारुती सुझुकी कंपनीची इटिंगा कार (क्र. एमएच-43-बीवाय-7784) असा एकूण 29 लाख 64 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी अनिल बडे याने चौकशीदरम्यान, हा गांजा मध्य प्रदेशातील मोतीराम (पूर्ण नाव समजू शकले नाही) याच्याकडून विक्रीकरिता आणला आहे. हा गांजा तो व त्याचे वडील बाबासाहेब बडे असे दोघे मिळून परिसरात विकत असल्याचे सांगितले.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, विप्पा करमल, संतोष खैरे, विशाल तनपुरे व शिवाजी ढाकणे यांच्यासह शेवगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे, सहायक पोलीस निरीक्षक अशोक काटे, पोलीस उपनिरीक्षक महाले, पोलीस अंमलदार कृष्णा मोरे, अर्जुन मुंढे, आदिनाथ शिरसाठ, मारोती पाखरे, किशोर काळे, पाथरकर, संभाजी घायतडक व पांडुरंग मनाळ यांच्या पथकाने संयुक्तरीत्या केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List