निमित्त – हॉवर्डच्या शास्त्रज्ञाने केले देवावर शिक्कामोर्तब?
>> जगदिश काबरे
‘फाइन टय़ुनिंग आगुमेंट’वर भर देत हॉवर्ड विद्यापीठातील प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. विली सून यांनी ईश्वराच्या अस्तित्वाचा गणिती फॉर्मुल्याद्वारे पुरावा देण्याचा दावा केला आहे. समाजमाध्यमांवर याबाबत बरीच चर्चा रंगली आहे. मात्र डॉ. सून यांचा हा निष्कर्ष विज्ञान आणि आध्यात्मिकता यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकणारा असला तरी तो कितपत सैद्धांतिक आहे हेही पाहावे लागेल.
हॉवर्ड विद्यापीठातील प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. विली सून यांनी ईश्वराच्या अस्तित्वाचा गणिती फॉर्मुल्याद्वारे पुरावा देण्याचा दावा केला आहे. यात त्यांनी ‘फाइन टय़ुनिंग आर्ग्युमेंट’वर भर दिला आहे. ब्रह्मांडाचे नियम इतके अचूक आणि संतुलित आहेत की, त्यामुळेच जीवन अस्तित्वात आहे. गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीपासून ते पदार्थ आणि ऊर्जेचा अचूक समतोल असल्यामुळे ब्रह्मांडाचा समतोल टिकून असल्याचे ते सांगतात. ब्रह्मांडात पदार्थ आणि प्रतिपदार्थ यांच्यात समतोल टिकून राहिला नसता तर जीवन अशक्य झाले असते. या दोघांमधील असमानता एका उच्च शक्तीच्या अस्तित्वाचा पुरावा देते. डॉ. सून यांनी मांडलेले गणितीय समीकरण जर खरे ठरले तर विज्ञान आणि अध्यात्म यांना एक नवी दिशा मिळू शकते. ईश्वराच्या अस्तित्वाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. अशी बातमी गेले काही दिवस समाजमाध्यमांवर मोठय़ा प्रमाणात व्हायरल केली जात आहे. त्यामुळे देव मानणाऱया भक्तांमध्ये नास्तिकांची खाशी जिरली म्हणून जल्लोषाने आनंद व्यक्त केला जात आहे, पण ही बातमी वाचल्यावर काही प्रश्न विचारी मनात उभे राहतात.
विज्ञानामध्ये एखाद्या गोष्टीचे गृहितक स्वीकारून ती गोष्ट अस्तित्वात असल्याचा दावा करणे म्हणजे ती गोष्ट सिद्ध झाली आहे असे मानले जात नाही. दावा करणाऱयाला त्यासाठी वेगवेगळे पुरावे द्यावे लागतात आणि प्रयोगाने ते सिद्ध करावे लागतात. या बातमीमध्ये शास्त्रज्ञ डॉ. सून यांच्या प्रयोगाच्या संबंधित ‘जर-तर’ची भाषा वापरली गेलेली आहे. याचा अर्थ निश्चित असे काही नाही. असे असे घडले तर तसे तसे घडेल, असा त्याचा अर्थ होतो. त्यांच्या गृहितकाला सिद्ध करण्यासाठी त्यांनी गणितीय सूत्र दिलेले आहे असे ते म्हणतात, पण बातमीतच ‘हा फॉर्मुला खरा ठरला तर?’ असे प्रश्नचिन्ह घातलेले आहे. यावरून त्यांनी मांडलेला सिद्धांत हा अजून सिद्ध झालेला नाही. तेव्हा आस्तिकांनी आनंदाने हुरळून जाण्याचे कारण नाही. भक्तांच्या जगात ‘संकल्पालाच सिद्धी’ समजणे योग्य वाटणारे असले तरी विज्ञानात त्याला स्थान नाही.
मागच्या शतकात 70 च्या दशकात खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर आणि फ्रेड हॉईल यांनी विश्वाच्या उत्पत्ती संबंधित स्थिरस्थितीचा सिद्धांत मांडला होता. गणिती सूत्राद्वारे तो सिद्धांत बरोबर आहे असा त्यांनी दावाही केला होता, पण कालांतराने तो नाकारला गेला. जयंत नारळीकर आणि फ्रेड हॉईल यांनी मांडलेला स्थिरस्थिती सिद्धांत (Steady State Theory) विश्वाच्या उत्पत्ती आणि विकासाबद्दल बिगबँग सिद्धांताला पर्यायी सिद्धांत होता. हा सिद्धांत वैज्ञानिक समुदायाने नाकारला, याची मुख्य कारणे पुढीलप्रमाणे होती ः
? 1965 मध्ये आर्नो पेंझियास आणि रॉबर्ट विल्सन यांनी शोधलेला हा किरणोत्सर्ग बिगबँग सिद्धांताने अचूकपणे भाकीत केला होता. हा अवशिष्ट किरणोत्सर्ग विश्वाच्या सुरुवातीच्या अत्यंत उष्ण स्थितीचा पुरावा मानला जातो. स्थिरस्थिती सिद्धांत या किरणोत्सर्गाचे समाधानकारक स्पष्टीकरण देऊ शकत नव्हता.
? एडविन हबल यांनी शोधलेले
गॅलेक्सीजचे रेडशिफ्ट (Redshift) निरीक्षण दर्शवते की, विश्व सतत विस्तारत आहे. बिगबँग सिद्धांत याचे स्पष्टीकरण देते, तर स्थिरस्थिती सिद्धांत यासाठी ‘निरंतर निर्मिती’ (Continuous Creation) नावाचा तर्क मांडतो, जो वैज्ञानिक निरीक्षणांशी जुळत नाही.
? आधुनिक दुर्बिणींनी घेतलेल्या प्रतिमांमध्ये असे दिसते की, जुन्या आकाशगंगा आणि तारकासमूहांची रचना भूतकाळात वेगळी होती. ही घटना विश्व परिवर्तनशील दर्शवणारी आहे. स्थिरस्थिती सिद्धांतानुसार, विश्व कधीही बदलत नाही म्हणजे ते प्रत्यक्षातील निरीक्षणांशी विसंगत आहे.
? बिगबँग न्यूक्लिओसिंथेसिस (Big Bang Nucleosynthesis) सिद्धांताने विश्वात आढळणाऱया हायड्रोजन आणि हिलियमच्या प्रमाणाचे अचूक भाकीत केले आहे. स्थिरस्थिती सिद्धांत या प्रमाणाचे समाधानकारक स्पष्टीकरण देऊ शकत नाही.
थोडक्यात काय तर स्थिरस्थिती सिद्धांताची कल्पना कितीही आकर्षक वाटत असली तरी प्रत्यक्ष निरीक्षणे आणि पुराव्यांच्या आधारे वैज्ञानिकांनी बिगबँग सिद्धांताला अधिक विश्वसनीय मानले व त्यामुळे स्थिरस्थिती सिद्धांत हळूहळू नाकारला गेला.
तसेच देवाचे अस्तित्व दाखवणारा इंटेलिजंट डिझाइन (Intelligent Design) हा काही शास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञांनी मांडलेला विचार आहे, पण तो वैज्ञानिक दृष्टिकोनातून मान्य नाही. कारण ‘इंटेलिजंट डिझाइन’ हा अनुभवसिद्ध (empirical) पुराव्यांवर आधारित नाही. म्हणून तो विज्ञानातील सिद्धांत मानला जात नाही. खरे वैज्ञानिक सिद्धांत निरीक्षणांवर आधारित असतात आणि त्यांची चाचणी करून त्यांना चुकीचे ठरवता (falsifiable) येते. पण ‘एका बुद्धिमान सृष्टीकर्त्याने विश्व आणि जीवसृष्टी निर्माण केली’ ही संकल्पना तपासता किंवा चुकीची ठरवता येत नाही. त्यामुळे ती विज्ञानात बसत नाही.
क्रिएशनिझम (Creationism) म्हणजे बायबल किंवा इतर धार्मिक ग्रंथांमध्ये सांगितल्याप्रमाणे देवाने सृष्टी निर्माण केली या दाव्याला 2005 साली अमेरिकन न्यायालयीन खटल्यात फेटाळताना असा निवाडा देण्यात आला की, ‘इंटेलिजंट डिझाइन’ हा धार्मिक विचार असून तो विज्ञानाच्या नावाखाली शिकवता येणार नाही. ‘इंटेलिजंट डिझाइन’च्या समर्थकांचा मुख्य तर्क असा आहे की, काही गोष्टींचे स्पष्टीकरण वैज्ञानिक दृष्टिकोनातून देता येत नाही म्हणून त्यामागे एखादा बुद्धिमान निर्माता असावा. पण हा तर्क विज्ञानात टिकत नाही. कारण इतिहासात अनेक वेळा अशा गोष्टींची वैज्ञानिक स्पष्टीकरणे सापडली आहेत. पूर्वी लोकांना वीज, रोग आणि भूकंप यांचे कारण माहीत नव्हते. त्यामुळे ते देवाशी जोडले जात होते, पण विज्ञानाने त्यांची कारणे उलगडल्यानंतर त्याचा देवाशी काहीही संबंध नाही हे लक्षात आले. भारतात तर मरीआई देवीच्या कोपामुळे ‘देवी’ हा रोग होतो असा समज होता, पण विज्ञानाने देवीच्या रोगाची लस शोधल्यानंतर देवीच्या रोगाचे जगातून पूर्णपणे उच्चाटन झाले आहे. यावरून ‘इंटेलिजंट डिझाइन’ ही एक अवैज्ञानिक कल्पना आहे हे सिद्ध होते. कारण ती निरीक्षणांवर आधारित नाही आणि चाचणीद्वारे पडताळता येत नाही. म्हणूनच वैज्ञानिक समुदायाने हा सिद्धांतही मान्य केला नाही.
वरील विवेचनावरून आपल्या लक्षात येते की, विज्ञान हा परस्परसुसंगत आणि प्रतिक्षणी वाढणारा वैश्विक ज्ञानाचा संचय आहे व ती ज्ञानसंपादनाची एक पद्धतही आहे. विज्ञान हा सृष्टीतील रहस्यांचा शोध घेण्याचा व तिच्यातील विविध घटना, प्रक्रिया यांचा अर्थ लावण्याचा एक मार्ग आहे. सृष्टीतील रहस्य उलगडणे म्हणजे सत्याचा शोध घेणे. विज्ञान घेत असलेला सत्याचा शोध हा निरंतर आहे. म्हणजेच ‘काल’चे सत्य हे आजच्या नव्या ज्ञानाच्या निकषावर जुने ठरू शकते व त्याची जागा ‘आज’चे सत्य घेते. अर्थात त्यामुळे कालचे सत्य हे असत्य ठरत नाही, तर सत्याचे एक पाऊल पुढे पडलेले असते. विज्ञानाने शोधलेले सत्य हे व्यक्ती, स्थळ, काळ, परिस्थिती-निरपेक्ष असते. ते कोणालाही कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही काळात योग्य ती साधने वापरून तपासून पाहता येते. आपल्या शरीरात, मनात, आसमंतात, त्यापलीकडे जे काही घडते ते तसे का घडते त्याचा अर्थ शोधणे, इतर घटना, प्रक्रिया यांच्याशी त्याचे नाते शोधणे याचेच नाव विज्ञान आणि ते सत्य शोधून काढण्याच्या पद्धतीचे नाव वैज्ञानिक पद्धत. ही पद्धती अवलंबल्यामुळेच आजवर माणसाची प्रगती झालेली आहे.
जगात अनेक लोक वैयक्तिक पातळीवर अनेक संशोधने करत असतात, पण जोपर्यंत ते संशोधन तज्ञाच्या देखरेखीखाली तावून सुलाखून बाहेर पडत नाही, तोपर्यंत ते वैज्ञानिक जगतात स्वीकारले जात नाही. म्हणून या विषयावरचे संशोधन डॉ. सून यांनी कुठल्या वैज्ञानिक मासिकात प्रसिद्ध केले होते काय? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण विज्ञानातील सिद्धांत ‘नेचर’सारख्या वैज्ञानिक मासिकात आधी प्रसिद्ध करावा लागतो. मग ‘रॉयल सोसायटी ऑफ सायन्स’ या जागतिक संस्थेत जगन्मान्य नोबेल पात्र वैज्ञानिकांसमोर प्रश्नोत्तरांना सामोरे जाऊन आपला दावा खरा कसा आहे, हे सिद्ध करावे लागते. नंतर जगात इतरत्र अनेक वैज्ञानिक त्यावर प्रयोग करतात. त्यात जर तो सिद्धांत खरा ठरला तरच त्या संशोधनावर स्वीकृतीची मोहोर उठते आणि मगच तो सिद्धांत वैज्ञानिक जगात स्वीकारला जातो.
थोडक्यात काय तर विज्ञान ही एक सत्याचा शोध घेण्याची पद्धत वा प्रक्रिया आहे. वैज्ञानिक सत्य हे सर्वांनाच एकसारखे लागू पडते. अमुक एक या धर्माचा, वर्णाचा, गटाचा, पंथाचा म्हणून त्याच्यासाठी हे वैज्ञानिक सत्य आणि तमुक एक त्या धर्माचा, वर्णाचा, पंथाचा म्हणून त्याच्यासाठी वेगळे वैज्ञानिक सत्य असे घडत नसते. म्हणून विज्ञानाने शोधलेले सत्य हे कोणीही नाकारू शकत नाही. कारण ते कोणालाही पडताळून पाहता येते. त्यासाठी आपण आपले जगणे, राहणे, वावरणे या सत्याच्या प्रकाशातच पारखून घ्यायला पाहिजे. आपले जीवन वैज्ञानिक सत्याशी सुसंगत ठेवले पाहिजे. म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोनाने जगण्याची सवय अंगी बाळगली पाहिजे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List