हंपीमध्ये इस्रायली महिला पर्यटकासह घर मालकिणीवर सामूहिक बलात्कार, 3 मित्रांना मारहाण करत तळ्यात फेकलं, एकाचा मृत्यू
कर्नाटकमधील जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ हंपीमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इस्रायलहून हिंदुस्थान फिरायला आलेल्या एका महिला पर्यटकासह घर मालकिणीवर तीन अज्ञात नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या तीन पुरुष मित्रांनाही आरोपींनी मारहाण केली आणि त्यांना तळ्यात फेकून दिले. यातील एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी रात्री अकरा ते साडे अकराच्या सुमारास सनापूर तळ्याजवळ घडली. आरोपींनी इस्रायली महिला पर्यटकासह 29 वर्षीय घर मालकिणीवर (होम स्टे ओनर) सामूहिक अत्याचार केला. या महिलांसोबत येथे अन्य तीन पर्यटकही उपस्थित होते. यातील एक अमेरिकेचा, दुसरा ओडिशाचा तर तिसरा महाराष्ट्रातील होता. आरोपींनी या तिघांनाही बेदम मारहाण करत त्यांना तळ्यामध्ये फेकून दिले. बेदम मारहाणीमुळे गलितगात्र झालेल्या ओडिशाच्या पर्यटकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर दोघांनी पोहून किनारा गाठला आणि जीव वाचवला. याप्रकरणी गंगावती ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे.
नेमकं काय घडलं?
घर मालकिणीने पोलिसांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ती आणि चार पर्यटक रात्री उशीरा जेवणानंतर सनापूर तळ्याजवळ आकाशातील ग्रह, तारे पहायला गेले होते. त्याचवेळी तीन आरोपी दुचाकीने तिथे पोहोचले. पेट्रोल कुठे मिळेल असे विचारत आरोपींनी इस्रायली महिलेकडे 100 रुपयांची मागणी केली. मात्र तिने पैसे देण्यास नकार दिला. याचा राग आल्याने आरोपींनी इस्रायली महिला पर्यटकासह तिथे उपस्थित सगळ्यांना शिवीगाळ आणि मारहाण सुरू केली. आरोपींनी तीनही पुरुष पर्यटकांना बेदम मारहाण करत तळ्यात फेकले. ते तिघे बाहेर येण्याचा प्रयत्न असतानाच आरोपींनी इस्रायली महिला पर्यटकासह घर मालकिणीवर सामूहिक बलात्कार केला आणि तिथून फरार झाले. आरोपी कन्नड आणि तेलुगु भाषेमध्ये बोलत होते, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
आरोपींचा शोध सुरू
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच डीएसपी सिद्धलिंगनागौडा पाटील, सीपीआय सोमशेखर जुट्टल आणि इतर पोलिसांनी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना घटनास्थळी एक दुचाकी आणि हँडबॅग सापडली. बॅगमध्ये कॅमेरा, पॉवर बँक, पेन, तुटलेली गिटार, हँडग्लोअज, सिगारेट आणि रक्ताने माखलेले कपडे आढळून आले. पोलिसांनी तात्काळ डॉक स्क्वॉडला पाचारण करत आरोपींचा शोध सुरू केला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List