।। सीतास्वरुपा ।। – आंतरिक शक्ती
>> वृषाली साठे
डेना मेरियम त्यांच्या `अनटोल्ड स्टोरी ऑफ सीता’ या पुस्तकातून काही अद्भुत व आपण कधी न ऐकलेल्या गोष्टी त्या आपल्याला सांगतात. डेना मेरियम, ज्या पूर्वजन्मी सीतेची दासी, मीनाक्षी होत्या. तार्किक दृष्टीने पाहिले तर खऱया वाटणाऱया या गोष्टी आणि त्याचे सीतामाईच्या दृष्टीतून झालेले निरूपण ऐकण्याजोगेच…
मदत करण्यात तर सीतामाई सदैव तत्पर असायच्या. शेतात जाऊन नांगरदेखील त्या उचलायच्या तेव्हा सुनयना माता जनक बाबांकडे पार करायच्या की, “माझी एवढी नाजूक मुलगी! तिला तुम्ही अशी कामं करायला सांगता?” जनक बाबा सांगायचे की, “तिची भौतिक शक्ती बघू नकोस, तिची आंतरिक शक्ती बघ. मी शिकवलेल्या यौगिक क्रियांनी व तिने केलेल्या ध्यानाने तिची आंतरिक शक्ती खूप वाढली आहे. हे काम तर ती सहज करेल.”
एकदा सीतामाई जंगलात ध्यानाला त्यांच्या आवडत्या ठिकाणी गेल्या. खूप वेळ होतो, त्या ध्यानातून बाहेर येत नाहीत. मीनाक्षी व सोमा धावत जनक बाबांना येऊन सांगतात की, खूप तास होऊन गेले, पण सीतामाई ध्यानातून बाहेर नाही आल्या. जनक बाबा म्हणाले की, “मला याचीच भीती होती. जर सीतामाई नारायणी तत्त्वाशी एकरूप झाली तर मी तिला पुन्हा कसं आपल्यात आणू?” ते स्वत ध्यानाला बसले. ध्यानात सीतामाईंशी संपर्क साधायचा प्रयत्न केला, पण ते संपर्क करू शकत नव्हते. काही वेळाने त्यांनी आनंदाने डोळे उघडले आणि म्हणाले की, सीतामाई ध्यानातून बाहेर येत आहेत. सीतामाई जेव्हा खरोखर ध्यानातून बाहेर आल्या तेव्हा जनक बाबांनी त्यांना विचारले, “असं काय झालं की, तू ध्यानातून बाहेर येऊ शकलीस?”
सीतामाई सांगितले की, कुठली तरी प्रेमाची शक्ती माझ्या जवळ आली आणि त्या प्रेमाच्या शक्तीने मला ध्यानातून बाहेर आणले. जनक बाबा समजून गेले की, आता कन्येच्या स्वयंवराची वेळ आली आहे. पण सीतामाईने निश्चय केला होता की, त्यांना जाणवलेली प्रेमाची शक्ती ज्या राजकुमाराकडे आहे, त्याच्याशीच विवाह करेन.
जनक बाबांनी स्वयंवराची घोषणा केली आणि त्यासाठी एक पण ठेवला होता. जनक बाबांकडे जे महादेवाचे धनुष्य होते, ते जो कोणी उचलून त्याला प्रत्यंचा लावेल त्याच्याशी सीतामाई विवाह करतील. ते धनुष्य परशुरामाचे होते. ते केवळ पिढीजात सांभाळण्यासाठी होते आणि ते धनुष्य जनक बाबांकडे होते. लहानपणी एकदा सीतामाई खेळत असताना त्यांचा चेंडू धनुष्याजवळ पडला होता. तेव्हा सीतामाईने एका हाताने धनुष्य उचलून त्याच्या खालचा चेंडू काढून घेतला होता. ते पाहून जनक बाबा आणि सुनयना माता खूप आश्चर्यचकित झाले होते. आंतरिक शक्तीच्या जोरावर कितीतरी भौतिक शक्तीची कामे केली जातात.
स्वयंवराचा दिवस उजाडला त्या दिवशीदेखील सीतामाई शेतात गेल्या. जमिनीवरची माती हातात घेऊन मीनाक्षीला म्हणाल्या की, ही धरती माता किती आपल्यावर प्रेम करते… बोलता बोलता सीतामाई अचानक थांबल्या. त्यांना ध्यानात जाणवलेली प्रेमाची शक्ती आसपासच कुठेतरी असल्याचा भास झाला. शेतात दूरवर एक रथ उभा होता. त्यातून दोन राजकुमार खाली उतरले. सीतामाईने शेतकऱयाला विचारले, “कोण आहेत हे?” शेतकरी म्हणाला की, हे अयोध्येचे राजकुमार आहेत. अशा रीतीने कथेत राम आणि लक्ष्मण यांचा प्रवेश होतो.
स्वयंवरासाठी संपूर्ण मिथिला नगरी सज्ज होत होती. सीतामाई मीनाक्षी आणि सोमाबरोबर पार्वती मातेच्या मंदिरात गेल्या. त्या वेळेस त्यांच्याबरोबर त्यांची धाकटी बहीण उर्मिला आणि अजून दोन दासी होत्या. त्या दोन दासी म्हणजे उषा आणि रोहणा. तिथे गेल्यानंतर पूजा करत असताना सीतामाईंना तीच प्रेमाची शक्ती पुन्हा जाणवली. त्या मंदिरात राम-लक्ष्मण दोघेही आलेले होते. सगळ्याजणी मागे वळून रामजीकडे बघतात. ते भव्य रूप, दैदिप्यमान कांती यामुळे कोणालाही त्यांना पाहता आले नाही. फक्त सीतामाई ते रूप बघू शकत होत्या. सोमाच्या मनात आले की, मी हे का बघू शकत नाही? सोमाच्या मनातली प्रत्येक गोष्ट सीतामाईंना न सांगता कळत असे. त्या सोमाला म्हणाल्या, “सोमा, कांतीच्या पलीकडे बघायचा प्रयत्न कर.” त्यानंतर सोमा रामजींकडे थोडेफार बघू शकली. रामजी पण सीतामाईंना पाहून हीच नारायणी शक्ती आहे, जिच्याशी एकरूप व्हायची वेळ आली असल्याचे समजून गेले.
त्यानंतर घडेलेली सीता-स्वयंवराची गोष्ट सगळय़ांना माहीत आहे. राम स्वयंवराचा पण जिंकतात.
जेव्हा रामजी आणि सीतामाईंचा विवाह निश्चित होतो, तेव्हा जनक बाबा रामजींना जवळ बसवून मिथिलेतील स्वशासनाची माहिती देतात. अयोध्या भौतिक दृष्टीने खूपच समृद्ध आहे, पण मिथिला आंतरिक ज्ञानाने परिपूर्ण आहे हे ते रामजींना सांगतात. हा केवळ रामजी आणि सीतामाईंचा विवाह नाही, तर हा अयोध्या आणि मिथिला यांचा विवाह आहे. म्हणजेच शक्ती आणि आंतरिक शक्ती यांचे मीलन आहे. ही एक काळाची गरज आहे की, अयोध्येत आता मिथिलेतील ज्ञानाचा वापर व्हावा.
बघा, आजच्या काळातदेखील आपण कितीही ज्ञानी आणि शक्तिमान असलो, सर्व प्रकारच्या कामात अव्वल असलो तरी जोपर्यंत आपण आपल्या आंतरिक शक्तीशी परिचित होत नाही तोपर्यंत खऱया दृष्टीने विजय मिळवू शकत नाही. काम व ाढाsधरूपी रावण आपल्याला छळतच राहतात …आणि सीतामाई आपल्याला शिकवतात की, आंतरिक शक्ती ध्यानाने वाढवता येते.
जनक बाबांना हेही माहीत होते की, संपूर्ण मानवाच्या कल्याणासाठी राम आणि सीतामाईंचा विवाह होणे खूप गरजेचे आहे. जनक बाबांकडे जेवढे ज्ञान होते ते सर्व त्यांनी सीतामाईंना दिले होते. ते राम यांना सांगतात की, तुम्हा दोघांना प्रेमाचा खरा धर्म या जगात प्रस्थापित करायचा आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List