परीक्षण – समकालीन संघर्षाची दखल
>> प्रसाद मिरासदार
सध्याचे महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा सचिव किरण कुलकर्णी लिखित ‘अनामिकाची विचारधून’ ही कादंबरी समकालीन समस्यांबद्दल भाष्य करणारी म्हणून तर वाचायलाच हवी, पण मराठी भाषेतल्या या एका वेगळ्या प्रयोगाची दखलही घ्यायला हवी. ‘अनामिकाची विचारधून’मध्ये सत्तेची, व्यवस्थेची, सर्वसामान्य माणसांच्या जगण्याच्या धडपडीची आणि व्यवस्थेविरुद्धच्या संघर्षाची कहाणी येते आणि ती कल्पनाही करता येणार नाही अशी कादंबरीच्या रचनेतून येते.
गेल्या काही वर्षांत भारतात वैचारिक मन्वंतर मोठय़ा प्रमाणावर घडले आहे. सर्वसामान्य लोकांना वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवर तुम्ही कोणत्या विचाराचे आहात याला महत्त्व आले आहे. आपल्याच मित्रांत, नातेवाईकात वितुष्ट आणणारी ही विभागणी कशी झाली याबद्दल आश्चर्य वाटते. अनामिकाची विचारधून वाचताना नकळत आपण या प्रश्नांचा विचार करू लागतो.
‘अनामिकाची विचारधून’ ही कादंबरी अन्योक्ती पध्दतीने लिहिली आहे. म्हणजे थेट भाष्य कुठेही नाही, कोणतेही पात्र ओळखीचे नाही. ही कादंबरी कुठे घडते याचे बाह्य वर्णनही नाही तरीही ही कादंबरी आपल्या मनात घडत राहते. कादंबरीचा काळ हा वर्तमानातला नाही तर भविष्यात काय घडेल याची चाहूल देणारा आहे. इंटरनेटचा सध्याचा माहितीच्या महाजालाचा काळ संपून ज्ञानाचे महाजाल तयार झाल्याचा हा काळ असल्याने येथील बहुंताशी व्यवहार हे भौतिक नसून मानवी मनाच्या अंतरंगाचा वेध घेणारे आणि माणूस म्हणजे माणसांचे मानसविश्व असे मानणारा हा काळ आहे.
अशा या काळात कुणीतरी 1 आणि प्रॉडक्ट व्यक्तीची ही कथा आहे. कोणकोण, कोणीही, कोणीतरी, विशिष्ट, चतुर आणि महाचतुर असे इथे गट आहेत. या सर्वांचे सेल्फ टॉक्स जाणून घेणे हा कुणीतरी 1 चा छंद आहे. पण तो दिलेल्या प्रिस्क्रिप्शनशिवाय कधीही काहीही वागत नाही किंवा बोलत नाही. या देशातील प्रतिष्ठेची समाज रचना सर्वांनाच मान्य आहे. अशा या देशात विचार बदलाच्या प्रकल्पाचे काम चालू आहे. यामध्ये चतुष्पाद हे माणूस नसलेले पात्रही आहे. अशा अगदीच वेगळ्या प्रतलावर घडणारी ही कादंबरी वाचताना तुम्ही नकळत विचारांच्या जगात शिरता व नंतर सर्व प्रकारच्या विचारांची मांडणी करत, विचारांचे संघर्ष होतात. विचारजग कसे बदलते आणि त्यावर प्रभाव पाडणाऱया किती गोष्टी असतात याची जाणीव व्हायला लागते. मन नकळत अंतर्मुख होते व भौतिकदृष्टय़ा स्वतंत्र भासणाऱया जगातले वैचारिक पारतंत्र्य जाणवायला लागते. प्रॉडक्ट व्यक्तीचा विचारांवर प्रचंड प्रभाव टाकून आपल्याला हवा तसा बदल घडवणाऱया व्यवस्थेचा संघर्ष आपल्याला व्यथित करतो. यावर उपाय काय म्हणून शेवटपर्यंत तुम्ही कादंबरी वाचत जाता आणि आपल्याच विचार विश्वामधल्या आंतरिक संघर्षामध्ये अडकून पडता. या कादंबरीतल्या वैचारिक मांडणीतून उत्तर शोधण्याचा प्रयत्न सुरू होतो.
‘अनामिकाची विचारधून’ कादंबरीची रचनाही विलक्षण आहे. कोणतीही ठरावीक मांडणी ही कादंबरी तयार करत नाही. या कादंबरीत मध्येच निवेदन येते, तर कधी मध्येच नाटकासारखे संवाद येतात, कधी नुसतीच कविता येते तर कधी मोठमोठी भाषणे येतात. पण हे सर्व वाचत असताना कथानकाचे सूत्र मात्र बांधून ठेवते. एखाद्या कसलेल्या चित्रकाराने रंग, रेषांवर प्रभुत्व प्राप्त केल्यानंतर आपल्या चिंतनाला आणि स्वैर विचारांना साकारण्यासाठी एखादे अमूर्त चित्र किंवा कसलेल्या गायकाने आपल्या स्वरांनी आपले आतले चिंतन खयालातून अमूर्त रूपात मांडावे तसा आपल्या विचारातून, चिंतनातून निर्माण झालेली वैचारिक अमूर्त जाणीव मांडण्याचा प्रयत्न या कादंबरीतून किरण कुलकर्णी यांनी केला आहे.
मराठीत अशा स्वरूपाचा कदाचित पहिलाच प्रयोग असावा. आपण कादंबरी वाचताना ज्या मानसविश्वातून वाचू त्याप्रमाणे त्याचा अर्थ लागत जातो आणि सातत्याने सत्याचा आग्रह धरणारे मन नकळत अनाग्रही बनत या अमूर्त लेखनाचा स्वीकार करते ही या कादंबरीची ताकद आहे. या अनुभवातून वाचकाने एकदा तरी नक्कीच जायला हवे!
अनामिकाची विचारधून
लेखक ः डॉ. किरण कुलकर्णी, आयएएस
मराठी भाषा सचिव, महाराष्ट्र शासन
संपादक ः प्रज्ञा जांभेकर
प्रकाशक ः सदामंगल पब्लिकेशन
पाने ः 208 किंमत ः 300 रु.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List