Chhaava पाहिला अन् अफवा पसरली; मुघलांनी लपवलेला खजिना शोधण्यासाठी लोक कुदळ, फावडी घेऊन किल्ल्यावर पोहोचली
‘छावा’ चित्रपटाची सध्या बॉक्स ऑफिसवर हवा आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचा जीवनपट या चित्रपटातून उलगडून दाखवण्यात आला आहे. यात अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराज, अभिनेत्री रश्मिका मंदानाने राणी येसुबाई आणि अक्षय खन्नाने औरंगजेबची भूमिका साकारली असून या चित्रपटाने कोट्यवधींचा गल्ला जमवला आहे. एकीकडे या चित्रपटाची चर्चा सुरू असतानाच एक अफवा पसरली आणि मुघलांनी खजिना लपवला त्या बुऱ्हाणपूरच्या असीरगड किल्ला परिसरात लोक कुदळ, फावडी घेऊन पोहोचली. लोक टॉर्च लावून खोदकाम करत असून सोने-चांदीच्या नाण्यांचा शोध घेत आहेत. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
असीरगड किल्ला परिसरामध्ये याआधीही मुघलकालीन सोन्याची नाणी सापडलेली आहेत. याच भागात राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून मजुर खोदकाम करत आहेत. काही दिवसांपूर्वी खोदलेली माती एका शेतात टाकण्यात आली होती आणि त्यात काही कामगारांना धातुची नाणी सापडली होती. याचा संदर्भ थेट आता नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘छावा’ चित्रपटाशी लावण्यात आला.
‘छावा’ चित्रपटामध्येही बुऱ्हाणपूरचा उल्लेख आलेला आहे. मराठ्यांनी बुऱ्हाणपूर लुटल्याचे यात दाखवण्यात आले आहे. अशातच येथे नाणी सापडल्याने मुघलांनी या भागात आणखी खजिना पुरून ठेवला आहे अशी अफवा पसरली. ही अफवा वाऱ्यासारखी पसरली आणि एका रात्रीत हजारो लोक कुदळ, फावडी, मेटल डिटेक्टर आणि टॉर्च घेऊन असिगर किल्ला परिसरात दाखल झाले. लोकांनी रात्रभर किल्ल्याचा भाग आणि परिसरातील शेतीही खणून काढली. काही नागरिकांना नाणी सापडल्याचीही चर्चा आहे.
‘छावा’ पाहिला अन् अफवा पसरली; मुघलांनी लपवलेला खजिना शोधण्यासाठी लोक कुदळ, फावडी घेऊन बुऱ्हाणपूरच्या असीरगड किल्ल्यावर पोहोचली, आजूबाजूची शेतीही खणून टाकली pic.twitter.com/fGA33Bq7QP
— Saamana Online (@SaamanaOnline) March 8, 2025
दरम्यान, बुऱ्हाणपूरला ऐतिहासिक महत्त्व आहे. राज्याभिषेक झाल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांनी मुघलांचे श्रीमंत शहर बुऱ्हाणपूर लुटून उद्ध्वस्त केले होते. याच भागात असीरगड किल्ला असून जवळस सराई नावाचे गाव आहे. इथे लष्करी छावण्या आणि घोड्यांचे तबेले होते. सैनिक, सुभेदार युद्धाहून आल्यानंतर लुटलेला माल याच भागातील शेतात लपवून ठेवत होते. त्यामुळे या भागात अनेकदा शेती नांगरताना, रस्त्याचे काम सुरू असताना आणि घरासाठी पाया घेत असतानाही सोन्याची नाणी सापडली आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List