न्यायपालिका स्वतंत्र असल्याशिवाय लोकशाही बळकट होणार नाही; सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींचे महत्वपूर्ण मत
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उज्जल भुयान यांनी न्यायपालिकेच्या स्वातंत्र्याविषयी महत्वपूर्ण मत व्यक्त केले आहे. न्यायपालिका स्वतंत्र असल्याशिवाय लोकशाही बळकट होणार नाही. न्यायपालिकेच्या स्वातंत्र्याविषयी कुठलीही तडजोड करता कामा नये, असे मत न्यायमूर्ती उज्जल भुयान यांनी शनिवारी पुण्यात व्यक्त केले. न्यायपालिकेचे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी वकिलांनी आपली भूमिका चोख बजावली पाहिजे, असेही न्यायमूर्ती भुयान यांनी म्हटले आहे.
देशातील अनेक महत्त्वाच्या प्रकरणांत झालेल्या न्यायनिवाड्यांवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. न्यायपालिकेच्या स्वातंत्र्यावर गदा आणली जात असल्याचा आरोप होऊ लागला. त्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायमूर्ती उज्जल भुयान यांनी आपले परखड मत मांडले आहे. न्यायपालिकेवर कोणताही दबाव असता कामा नये. किंबहुना, न्यायपालिकेच्या कामकाजात कुणाचा हस्तक्षेप असता कामा नये. न्यायपालिकेचे स्वातंत्र्य अतूट आहे, असे न्यायमूर्ती भुयान यांनी म्हटले आहे.
न्यायपालिका कुणापुढेही झुकता कामा नये हे सांगतानाच न्यायमूर्ती भुयान यांनी प्राध्यापक उपेंद्र बक्षी यांचे उदाहरण दिले. न्यायाधीशात फक्त एकच गुण असावा… “पाठीचा कणा, पाठीचा कणा आणि फक्त पाठीचा कणा”. असे प्राध्यापक बक्षी यांनी म्हटले आहे, असेही न्यायमूर्ती भुयान म्हणाले. पुणे बार असोसिएशनतर्फे शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.
वकिलांनी, विशेषतः तरुण वकिलांनी आपली भूमिका केवळ कोर्टरूमपुरता मर्यादित ठेवू नये, तर त्यांनी संविधानाच्या मूल्यांचे रक्षण आणि पालन करण्यासाठी सदैव तत्पर असले पाहिजे, असे न्यायमूर्ती भुयान म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List