खाऊगल्ली – बकलावा, अफलातून, बकबौसा, कनाफे…!
>> संजीव साबडे
रमजान हा मुस्लिमांचा अत्यंत पवित्र महिना. हिंदूंच्या श्रावणासारखाच. फरक इतकाच की श्रावणात अनेक जण मांसाहार बंद करतात, तर रमजानच्या महिन्यात काय खावं याचं बंधन नसतं. बंधन असतं कधी खाऊ नये याचं. हे कडक रोजे सुटताना इफ्तार पाटर्य़ां आणि खाऊगल्लीमध्ये कमाल खवय्येगिरी करता येते. अशा चवीधवीच्या रमजानची ही सैर.
मुस्लिम धर्मीय लोकांचा सध्या रमजानचा महिना स्रू आहे. दिवसभर उपवास आणि चंद्र दिसल्यानंतरच खायचे असे रमजानचे रोजे असतात. साधारणपणे 30 मार्चला ईद असेल. म्हणजे आदल्या रात्री चंद्र दिसला तर. कधी कधी त्यात एखाद् दुसऱया दिवसाचा फरक होतो.
रमजान थंडी वा पावसाळ्याच्या दरम्यान आला तर तो किंचित सुसह्य असतो. पण उन्हाळ्यात दिवसा पाणीही प्यायचे नाही, हे खूप अवघड. दिवसा अनेकांचे रोजे म्हणजे उपवास असल्याने रात्रीपर्यंत भूक लागलेली असते. त्यामुळे खजूर किंवा ताजी फळं खाऊन रोजे सोडले जातात आणि मग लोक आवडीप्रमाणे शाकाहारी वा मांसाहारी पदार्थांवर ताव मारतात. सर्वांनाच महिनाभर रोजा ठेवणे शक्य नसते. वय, आजारपण किंवा मेहनतीचे काम यामुळे काही जण रोजा ठेवूच शकत नाही. ते आठवडय़ातून एकदा वा महिन्यात तीन चारदा रोजा ठेवतात
संध्याकाळी रोजे सोडताना मुस्लिमांच्या घरातील सदस्य किंवा मित्रमंडळी एकत्र भोजन करतात. मुस्लिम वस्त्यात किंवा घरांमध्ये गेलात तर हे चित्र हमखास दिसेल. त्याला इफ्तार म्हणतात. इफ्तार म्हणजे संध्याकाळचे स्नेहभोजन. त्यात बंधुत्वाची भावना असते. त्यामुळे रमजान महिन्यात अनेक सामाजिक संस्था, संघटना आणि राजकीय पक्ष इफ्तार पाटर्य़ा आयोजित करत असतात. रमजान महिन्यातील रात्री महंमद अली रोड, भेंडी बाजार, भायखळा, माहीम, वांद्रे, कुर्ला, अंधेरी, जोगेश्वरी या भागातील रस्त्यांवरील खाऊगल्ल्या म्हणजे कमाल असते. एरवीच्या खाऊगल्लीपेक्षा इथे अनेक वेगळे प्रकार असतात. मटण बिर्याणी आणि विविध प्रकारचे कबाब तर असतातच, पण अनेक शाकाहारी पदार्थही असतात. तिथे कुल्फी, फालुदा, आइपीम, वेगवेगळी रंगीबेरंगी ज्यूस, सरबते, ताजी फळेही असतात आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे या काळात तिथे मिळणारी खास मिठाई आणि नानखटाईसारखे असंख्य बेकरी पदार्थ.
आपण बिर्याणी, कबाब इतर ठिकाणीही खाऊ शकतो. पण अफलातून खावा इथूनच. उत्तम बकलावाही मिळेल तिथेच. कनाफे, बकबौसा फिरनी असो वा शीर कुर्मा, मालपुवा असो. तो खावा जिथे रोजे सोडण्यासाठी गर्दी होते अशा भेंडी बाजार, महंमद अली रोड वा माहीम, वांद्रे व अंधेरीतच. मालपुवा खाण्यासाठी महंमद अली रोडच्या सुलेमान उस्मान स्वीट, तवक्कल स्वीट, शब्बीर तवक्कल यांच्याकडे रात्री जी काय गर्दी उसळते, तीही पाहता येईल. आपल्या मालपुवाचे वेगवेगळे प्रकार असतात आणि रबडी किंवा जिलबी, गुलाब जामबरोबर खाताना येणारी मजा तिथेच समजू शकेल. मालपुवा ही भारतातील सर्वात जुनी मिठाई म्हणून ओळखली जाते. आता अंडय़ाविना व विगन मालपुवाही मिळतो.
उन्हाळ्यात रात्रीही खूप उकडत असते. अशा वेळी सात ते आठ प्रकारच्या व चवीच्या फिरनी शांतपणे व हळूहळू खाण्याची मजाच आगळी. वाटल्यास तिथे खाल्ल्यावर घरी येताना मातीच्या भांडय़ातली फिरनी फ्रिजमध्ये ठेवायची आणि ती अधिक थंड झाली की दुसऱया, तिसऱया दिवशी संपवायची. शिवाय भेंडी बाजारच्या बोहरी मोहल्ल्यातील प्रख्यात ताज आइपीम आणि महंमद अली रोडवरील ताजमहाल आइपीम सेन्टर यांना भेट दिली नाहीत तर तुम्हा मित्रमैत्रिणींची इफ्तारी अर्धवट राहील. असेच मस्त आइपीम व कुल्फी रमजान महिन्याच्या रात्री अनेक खाऊगल्ल्यांत मिळते.
मुस्लिम संस्कृती आणि फालुदा यांचे घट्ट नाते आहे. या काळात 25-30 प्रकारचे फालुदा तुम्हाला मुस्लिम वस्ती असलेल्या भागात मिळतील. फालुदा हा छान रंगीबिरंगी प्रकार ग्लासातून संपूच नये, असे वाटत राहते. याखेरीज विविध फळांच्या चवीची लस्सी, मिल्क शेक आणि 20-25 प्रकारचे ज्यूस आपल्याला खुणावत असतात. शिवाय मसाला दूध, बासुंदी आणि चिकू, मँगो, पायनॅपल, सफरचंद, ड्राय फ्रुट, रोज म्हणजे गुलाब, फणस यांची चव देणारी रबडी तर अतिशय अप्रतिम. खजूर असलेली ड्राय फ्रुट मिठाई खावी तर इथलीच.
अफलातून, बकलावा आणि बकबौसा या मिठायांची नावे अनेकांनी ऐकलीही नसतील, मग ते खाणे दूरच. बकलावा आणि बकबौसा या दोन्ही मिठाया मध्य पूर्वेतून, तुर्कस्तानातून आलेल्या आहेत आणि त्यांचा इतिहास 800 ते 1000 वर्षांचा आहे. मूळच्या ऑटोमन सम्राज्यातील या मिठाया आता जगभरात खाल्ल्या जातात. अफलातून ही म्हणाल तर आपल्या बर्फीसारखीच. पण खूपच छान मिठाई. ही मिठाई विशेषत बोहरी मुस्लिमांची असल्याचे मानले जाते. मुंबईतील सर्वात उत्तम अफलातून मिठाई सुलेमान उस्मान, रॉयल स्वीट्स आणि माहीमच्या लूकमानजी स्वीट्स इथे मिळते. अर्थात आता इतरही बनवू लागले आहेत. ही मिठाई काहीशी महाग, पण स्वर्गीय सुख देणारी आहे. आता तिथे आणि झमझम बेकरीमध्ये अफलातून बिस्किटंही तयार केली जातात. तीही मस्त आहेत.
झमझम म्हटले की आठवते तेथील नानखटाई. मुंबईत नानखटाई मिळणाऱया शेकडो बेकऱया असतील, पण झमझमची नानखटाई आणि अफलातून बिस्किटे चवीला खूप म्हणजे खूपच छान. बकलावा आणि बकबौसा या मिठाया महंमद अली रोड, भेंडी बाजार, भायखळा तसेच वांद्रे येथील काही बेकरी व मिठाईच्या दुकानात मिळतात. अगदी डी. दामोदर, चंदू हलवाई आणि सुलेमान उस्मान, तवक्कल, रॉयल स्वीट्स, लूकमानजी अन्य मुस्लिम मिठाई दुकानांत मिळणारी बकलावा आणि बकबौसा मिठाई बरीच महाग आहे.
बकलावा करणे अवघड आणि ती कशी करायची हे सांगणे अवघड. म्हटले तर प्रकार पेस्ट्रीचा. पण त्यात ब्रेडचाही संबंध आहे. समोरून पाहिले की ब्रेडमध्ये गोड पदार्थ व ड्राय फ्रुट घातली आहेत, असे वाटते. चव तर भन्नाट. तेच बकबौसा या मिठाईचे. कनाफे मिठाईत चीज आणि साखरेचा पाक आहे. ती दिसते बर्फी वा केकसारखी. आतमधील चीज आणि वरील गोड भाग यांचे जे काही मिश्रण असते, ते फारच छान असते. इथे थोडय़ाच मिठायांचा उल्लेख आहे. पण प्रत्यक्षात तिथे गेलात तर मिठाईचे भांडारच तुमच्यासाठी खुले होईल.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List