प्लेलिस्ट – दिग्गजांच्या मांदियाळीत…
>> हर्षवर्धन दातार
भारतीय चित्रपटसृष्टीत आणि विशेषत सोनेरी युगात अनेक दिग्गज गायक-गायिका होऊन गेले. त्या मापदंडापर्यंत कदाचित कोणीही आणि कधीच पोहोचू शकणार नाही. 1960-70 च्या दशकात नवीन उमेदीचे काही पार्श्वगायक-गायिकांनी प्रयत्न केला. त्यातील शैलेंद्र सिंग आणि मनहर उधास या दोन गायक कलाकारांचा घेतलेला वेध.
अनेकदा नवीन तरुण-तरुणी चित्रपटसृष्टीत पडद्यामागे राहण्यापेक्षा पडद्यावर झळकण्याची उमेद बाळगून येतात. 19 वर्षांचा एक तरुण कॉलेज शिक्षण सोडून पुण्याच्या फिल्म इन्स्टिटय़ूटमध्ये अभिनयाचे शिक्षण घ्यायला जातो आणि पुढे पार्श्वगायनात यश मिळवतो. 1960-70 दशकातील नव्या उमेदीचा हा तरुण. अर्थात याला घरची चित्रपट क्षेत्रातली पार्श्वभूमी थोडीफार कारणीभूत आहे. या तरुणाचे वडील व्ही.शांताराम यांचे सहायक आणि पुढे राजश्री पिक्चर्समध्ये प्रसिद्धी विभाग प्रमुख होते. शैलेंद्र सिंग हा तो तरुण!
सत्तरच्या दशकात सुरुवातीलाच ‘मेरा नाम जोकर’च्या अपयशानंतर राज कपूर हे आपल्या मुलाला ऋषी कपूरला चित्रपटसृष्टीत नायक म्हणून प्रस्तुत करू पाहत होते आणि त्याच्यासाठी एका नवीन आवाजाच्या शोधात होते. शैलेंद्र सिंगमध्ये त्यांना हवा तसा आवाज मिळाला.
‘बॉबी’ (1973) मधील ‘मै शायर तो नही’ या गाण्यातून शैलेंद्र सिंग यांनी पदार्पण केले आणि सरळ लोकप्रियतेच्या शिखरावर गेले. या पहिल्याच चित्रपटात त्यांना लताजींबरोबर ‘हम तुम एक कमरे मे बंद हो’, ‘न मांगू सोना चांदी’ आणि ‘मुझे कुछ कहना है’ ही युगलगीत गाण्याची संधी मिळाली. ऋषी कपूरचा आवाज म्हणून शैलेंद्र सिंग प्रस्थापित झाले होते. याचप्रमाणे म्हणजे ‘झहरीला इन्सान’ (1974)- ‘मेरे दिल से ये नैन’, खेल खेल में (1975)- ‘हमने तुमको देखा’, रफूचक्कर (1975)- ‘किसी पे दिल अगर आ जाये तो’ आणि अमर अकबर अँथनी (1977) – शीर्षक गीत ‘जमाने को दिखाना है’ (1981)- ‘होगा तुमसे प्यारा कौन’ आणि सागर (1985)- ‘जाने दो ना’ या सर्व गाण्यात शैलेंद्र सिंग हे ऋषी कपूर यांचा आवाज होते. चाचा भतीजा (1977) यात त्यांनी रणधीर कपूर याना तर परवरीश (1977)- ‘हम प्रेमी प्रेम करना जाने’मध्ये त्यांनी शम्मी कपूर यांना आपला आवाज दिला.
अर्जुन (1985) राहुल देव बर्मनचे संगीत असलेले शैलेंद्र सिंग यांचे ‘ममय्या केरो मामा’ हे अतिशय लोकप्रिय झाले. गंमत म्हणजे बॉबी चित्रपटातील पदार्पणाकरिता झालेल्या आवाज परीक्षेत त्यांनी संगीत दिग्दर्शक लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासमोर चक्क राहुल देव बर्मन यांचे ‘देखा ना हाये रे सोचा ना’ हे गाणे म्हटले होते. अभिनय या आपल्या मूळ आवडीला किंवा महत्त्वाकांक्षेला प्रयत्न म्हणून त्यांनी दो जासूस (1975), आग्रीमेंट (1980) यात नायकाची आणि जनता हवालदार (1979) यात पाहुण्या कलाकारांची भूमिका केली. अजसरा धोंनोबाद (1976) एका बंगाली चित्रपटात अपर्णा सेनसमवेतही ते दिसले. पण आपल्या मर्यादा ओळखून त्यांनी गायकीला प्राधान्य दिले. बप्पी लाहिरी, राजेश रोशन, राम-लक्ष्मण यांनीही त्यांच्याकडून गाणी गाऊन घेतली. मात्र राहुल देव बर्मन आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे ते नवोदितांमध्ये आवडते गायक होते. दिग्गज गायकांच्या मांदियाळीत एक नवीन आणि तरुण वेगळा आवाज म्हणून शैलेंद्र सिंगना बऱयापैकी यश मिळाले.
विश्वास (1969) चित्रपटाची निर्मिती सुरू होती. संगीतकारद्वयी कल्याणजी आनंदजीना त्यांच्या कामात एक तरुण सहाय्यक म्हणून काम करत होता. मुकेश यांच्या आवाजात एक गाणे ध्वनिमुद्रित होणार होते. मात्र काही कारणांमुळे मुकेश येऊ शकले नाहीत. तेव्हा असे ठरले की, या सहाय्यकाच्या आवाजात गाणे ध्वनिमुद्रित करायचे आणि नंतर मुकेश उपलब्ध झाले की त्यांच्या आवाजात डब करायचे. मुकेश यांना ते मूळ रेकॉर्डिंग इतके आवडल्sढ की त्यांनी डब करायला नम्रपणे नकार दिला आणि गाणे मूळ आवाजातच चित्रपटात आहे. गाणे होते ‘आपसे हम को बिछडे हुए…’ गाणे अतिशय लोकप्रिय झाले आणि तरुण गायक मनहर उधास यांचा चित्रपटसृष्टीत दिमाखदार प्रवेश झाला. नामवंत गजल गायक पंकज उधास हे त्यांचे ज्येष्ठ बंधू.
सत्तरच्या दशकात ‘विविध भारती विशेष’ मानलेले ‘हर जनम में हमारा मिलन’ हे कागज की नाव (1978) यातील गाणे नियमित वाजायचे. त्यात आशा भोसले यांच्याबरोबर आहेत मनहर उधास. पुढे संगीतकार सचिन देव बर्मन यांनी कथानक डोळ्यासमोर ठेवून अभिमान (1974) यात नायक अमिताभ बच्चनला किशोर कुमार, रफी असे वेगवेगळे पार्श्वगायक दिले. त्यात अजून एक मनहर उधास यांनीसुद्धा आपली हजेरी लावली. ‘लुटे कोई मन का नगर’ गाण्यातून. गुजराती, हिंदी, पंजाबी आणि बंगाली अशा अनेक भाषांतून 300 च्या वर चित्रपटातून गाणी आणि 30 हून अधिक भक्तीसंगीत आणि गजल अल्बम्स ही मनहर उधास यांची आतापर्यंतची सांगितिक कारकीर्द! गुजराती भाषिक मनहर यांनी बंधू पंकज उधासबरोबर तसेच अनेक वाद्यवृंदातून देशात आणि परदेशात कार्यक्रम केले.
शांत सौम्य संथ आवाज आणि प्रति-मुकेश ही त्यांची ओळख. इतके की त्यांचे ‘आप से हम को बिछडे हुए’ हे गाणे अनेकांना आजही मुकेशचेच वाटते. मनोज कुमारच्या पूरब और पश्चिम (1970) ‘पूर्वा सुहानी आयी रे’ नंतर त्यांची तीन गाणी अतिशय प्रसिद्ध झाली. ‘आप तो ऐसे न थे’ (1980) या प्रेमत्रिकोण कथानकात ‘तू इस तरह से मेरी जिंदगी में शामिल है’ हे एकच गाणे तिघांनी गायले आहे. रफी यांची द्रुत आवृत्ती तर हेमलता आणि मनहर उधास यांच संथ आणि शांत संस्करण. कुर्बानी (1981)- ‘हम तुम्हे चाहते है ऐसे’ आणि लास्ट बट मोस्ट पॉप्युलर हिरो (1983)- तू मेरा जानू है… यात अजून एक युगल गीत ‘प्यार करनेवाले कभी डरते नहीं’ हेसुद्धा अफाट गाजले. हिरो चित्रपटाच्या यशात संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या दिलखेचक संगीताबरोबर नवोदित जॅकी श्रॉफला मिळालेला मनहर उधासचा आवाज याचा मोठा सहभाग आहे. याच जॅकी श्रॉफला राम-लखन (1989) ‘तेरा नाम लिया’ गाण्यात पुन्हा एकदा मनहर उधास यांचा प्लेबॅक आहे. सुभाष घई यांच्या महत्त्वाकांक्षी चित्रपट सौदागर (1991) मध्ये नवोदित कोवळ्या विवेक मुशरनला ‘इलू इलू’तून पुन्हा एकदा आवाज आहे मनहर उधास यांचाच.
सुरुवातीला शांत सौम्य संथ आवाज ही जशी मनहर यांची जमेची बाजू मानली गेली. कदाचित चित्रपटसृष्टीच्या बदलत्या वातावरणात साचेबद्ध गायकी हीच बाब त्यांची मर्यादाही ठरली. म्हणून पुढे त्यांनी आपल्या आवाजाला साजेसे भजन आणि गजल गायकीवर लक्ष केंद्रित केले. इतका सुंदर आवाज आणि गायकी असूनही मनहर यांची चित्रपट पार्श्वगायन कारकीर्द तशी माफकच यशस्वी ठरली.
z [email protected]
(लेखक संगीत अभ्यासक आहेत.)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List