साहित्य जगत – आदान प्रदान अनुभव
>> रविप्रकाश कुलकर्णी
आपलं एक पुस्तक द्यायचं आणि प्रदर्शनात मांडलेलं एक पुस्तक घ्यायचं ही आदान-प्रदानामागची कल्पना डोंबिवलीतील पै फ्रेंड्स लायब्ररीचे पुंडलिक पै यांनी रुजवली. ही अभिनव कल्पना मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांना इतकी आवडली की त्यांनी पुणे येथे होणाऱया विश्व मराठी संमेलनात पै यांनी पुस्तक आदान प्रदान योजना पुण्यात करावी असं एकदमच जाहीर करून टाकलं! खरं तर डोंबिवलीतील ही योजना पार केल्यानंतर लगेच पुण्याला सर्व जामानिमा घेऊन जाणं अवघड होतं, घाईगडबडीचं होतं. पण पै यांनी एकदा एखादी गोष्ट करायची म्हटली की ते त्यांच्या टीमसह काय वाटेल तो आटापिटा करत कार्य तडीस नेतात. त्यामुळे पुण्यातील मराठी विश्व संमेलनातदेखील आदान प्रदान कल्पनेचा चांगलाच गाजावाजा झाला. त्यामुळे असेल किंवा ही कल्पना मनसेच्या राज ठाकरे यांच्या कानावर आधीच गेली असल्यामुळे असेल त्यांनी शिवाजी पार्क, दादर येथे मराठी भाषा दिनानिमित्ताने भरवलेल्या अभिजात पुस्तक प्रदर्शनात पै यांना आदान प्रदान प्रदर्शन भरवायला सांगितलं. आता ज्या पै यांनी पुणे सर केलं त्यांना मुंबई काबीज करणं अवघड गेलंच नाही. किंबहुना आदान प्रदान योजना यशस्वी करून दाखवावी तर ती पै यांनीच, एवढा ठसा त्यांनी उमटवलेला आहे. असो.
आदान प्रदान सोहळ्यात सामील होणं हा वेगवेगळे अनुभव घेण्याचं ठिकाण होऊ शकतं हे मी अनुभवान्ती सांगू शकतो. त्यातली काही उदाहरणं… लक्षवेधी लेखक, चित्रपट अभ्यासक-समीक्षक गणेश मतकरी भेटले. त्यांनी अनंत देशमुख संपादित र. धों. कर्वे संचातील दोन पुस्तकं घेतली होती. त्या संबंधात बोलताना ते म्हणाले, ‘आपल्याला नको असलेलं पुस्तक देऊन आपल्याला हवं असलेलं पुस्तक घेणं ही कल्पना छान आहे.’
सुप्रसिद्ध लेखक बाबू मोशाय यांनी पुस्तकांचा गठ्ठा केला होता. त्यात एक नवकोरं पुस्तक वि. दा. सावरकरांचं ‘सात सोनेरी पानं’ होतं. त्याबाबत ते म्हणाले, हे पुस्तक माझ्याकडे नक्की आहे, पण ते कपाटाच्या वर कुठेतरी ठेवलेलं आहे. ते शोधत बसण्यापेक्षा इथे सहज मिळालं. घेऊन टाकलं. उत्कृष्ट कार्यकर्ते आणि लेखक-प्रमोद बापट यांनीही बरीच पुस्तकं निवडलेली दिसली. त्यांना काय विशेष मिळालं असं विचारल्यावर ते म्हणाले, ‘मला एक दुर्मिळ पुस्तक मिळालेलं आहे. त्याची तुम्ही कल्पनादेखील करू शकणार नाही. असं पुस्तक म्हणजे आनंद साधले यांचं आत्मचरित्र ‘मातीची चूल’! खरंच होतं ते. बापट यांच्याकडच्या गठ्ठय़ात क्राऊन साइज जाडजूड पुस्तक म्हणजे ‘मातीची चूल’ हे न पाहताच मी ओळखलं. इतकं हे पुस्तक माझ्या मनात बसलेलं आहे.
मांडलेल्या पुस्तकात पु. ल. देशपांडे यांचं एक पुस्तक दिसलं. आमचे ठाण्याचे बिवलकर नावाचे मित्र आहेत. त्यांना फुटपाथवर वा रद्दीवाल्याकडे पु. ल. देशपांडे यांचं पुस्तक दिसलं की ते लगेच विकत घेतात आणि नंतर कुठल्यातरी वाचकाला देऊन टाकतात. पुलंचे पुस्तक असं दुर्लक्षित पडलेलं त्यांना सहन होत नाही. त्यावर त्यांच्यापुरता त्यांनी शोधलेला हा उपाय आहे. त्यांना देण्याकरता ते पुस्तक घेणार तोच दुसऱया एकाने ते उचललं. अर्थात हे चांगलं झालं. बघू तुम्ही घेतलेलं पुस्तक त्या वाचकाला म्हणताच त्याने ते सहज दिलं. मी पान उघडून बघितलं तर त्यावर चक्क पु. ल. देशपांडे यांची सही – स्वाक्षरी होती!
जगात असं एकही पुस्तक नाही ज्याच्या ललाटी फुटपाथ नाही, असं एक सुवचन आहे त्याचं प्रत्यंतर पुन्हा एकदा मला आलं.
एवढय़ात पलीकडून भूषण पत्की मला सांगू लागला, ‘काका, तुमचं पुस्तक इथे आहे.’ खोटं कशाला सांगा, त्या क्षणाला वाईट वाटलं. कुठल्याही पुस्तकाच्या ललाटी रद्दी-योग चुकलेला नाही असं सांगणारा मी, त्या क्षणाला हडबडून गेलो. क्षणभरच, पण असं झालं खरं… असंच पुस्तक पडण्यापेक्षा आपणच त्याचा उद्धार करावा म्हणून टेबलाला वळसा घालून ते पुस्तक घ्यायला निघालो. पण अहो आश्चर्यम! मी तिथे पोहोचताच दिसलं की ते पुस्तक तिथे नव्हतं! कुणा वाचकाने नव्हे, रसिक वाचकाने त्या पुस्तकाचा पतितोद्धारच केला म्हणायचा… बरं वाटलं!
कुठल्याही पुस्तक प्रदर्शनात फेरफटका मारणं म्हणजे बागेमध्ये फुलपाखराच्या मागे लागण्यासारखं असतं. हाताला फुलपाखरू लागेल न लागेल, पण त्या निमित्ताने रंगीबेरंगी फुलं पाहून होतात आणि त्यांचा सुवास आला तर आणखीनच आनंद. या आनंदातून परतत होतो एवय़ात मागून आवाज आला, “आपण रविप्रकाश कुलकर्णी ना?’ मी वळून पाहिलं. चेहरा अनोळखी वाटला. म्हटलं, ‘हो. बोला.’ तेव्हा त्याने त्याच्या जवळच्या पुस्तकाच्या गठ्ठय़ातून एक पुस्तक माझ्यासमोर धरलं आणि म्हटलं, ‘स्वाक्षरी देणार का?’ ते माझंच पुस्तक होतं! स्वाक्षरी न देण्याचा प्रश्नच नव्हता. फक्त त्यावर लिहिलं, ‘शिवाजी पार्क, आदान प्रदान सोहळा. त्याची ही आठवण.’ तर अशी ही आठवण माझ्या वाचकांसाठी देखील.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List