Women’s Day 2025 – माडकरीण! महिलांच्या साहस आणि धाडसाला कल्पवृक्षाची उंची देणारी रत्नागिरीची नेहा पालेकर
<<< दुर्गेश आखाडे >>>
माडावर चढून नारळ काढणे यामध्ये पुरुषांचीच मक्तेदारी होती. नारळ काढणाऱ्यांना लोक माडकरी असेही म्हणत. गावात अशी माडकरी मंडळी मोजकीच असत. दिवसेंदिवस माडकरी मंडळींची संख्या घटत चालली आहे. आता माडावर चढण्यासाठीसुध्दा प्रशिक्षण देण्याची वेळ आली आहे. अशा माडकरी मंडळींची वानवा असताना रत्नागिरी तालुक्यातील मावळंगे येथील 22 वर्षीय तरुणी माडकरीण बनली आहे. ही तरुणी माडाच्या झाडावर चढून नारळ काढण्यात पारंगत आहे. महिलांमधल्या साहसाला आणि धाडसाला तिने एक उंची मिळवून दिली आहे.
मावळंगे सारख्या ग्रामीण भागात राहणारी नेहा पालेकर या तरुणीने पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. लहानपणापासूनच नेहा झाडामाडात वाढली होती. त्यामुळे झाडामाडांशी तिची दोस्ती झाली. तीने झाडावर चढायला सुरुवात केली. त्यावेळी तिच्या आजीने तिला माडाच्या झाडावर चढण्याचे प्रोत्साहन दिले. नारळाच्या झाडावर आपल्याला शास्त्रीयदृष्ट्या चढून नारळ काढता यावेत याकरीता नेहाने भाट्ये नारळ संशोधन केंद्रात प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तीने 20 माडांवर चढण्याचा सराव सुरु केला. नेहा माडावरील नारळ पाडू लागली. माड साफ करु लागली. माडांवर किटकांचा प्रभाव पडू नये याकरीता औषधोपचारही करु लागली.
आता गावातील लोक तिला नारळ काढण्यासाठी बोलावतात. त्याचबरोबर नारळाच्या झाडावर औषध फवारणी करण्याची जबाबदारीही तिच्यावर सोपवतात. आता नेहाने नारळावर उद्भवणाऱ्या रोगांचा अभ्यास करून त्यावर औषधोपचार करण्याचे तंत्र आत्मसात केले आहे. माडावर चढण्यासाठी ती कोकोनट क्लायंबर या शिडीचा उपयोग करते. ती 30 ते 50 फूट उंची असलेल्या माडांवर न डगमगता चढते. सुरक्षेचा उपाय म्हणून ती सेफ्टीबेल्टही वापरते. नारळासंदर्भात अधिक माहितीचा प्रसार करण्यासाठी तीन कोकोनट फ्रेण्डस नावाचा व्हॉटसअप ग्रुप तयार केला आहे. नेहा ही एका खासगी बँकेत नोकरी करते. विशेष म्हणजे तीने नोकरी करून नारळ काढण्याचा छंद जोपासला आहे. तिचे हे माडावर चढण्याचे कसब पाहून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List