धनंजय मुंडे यांचा राजीनामा होताच देवगिरी बंगल्यावर बैठक, अजितदादा गटाचे बडे नेते पोहोचले; मोठ्या घडामोडींना वेग
मोठी बातमी समोर येत आहे, आज अखेर मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे, त्यानंतर देवेंद्र फडणीस यांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितलं होतं. धनंजय मुंडे यांनी आज सकाळी आपला राजीनामा दिला. राज्यपालांकडून धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्विकारण्यात आला आहे. दरम्यान धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आता घडामोडींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निवासस्थान असलेल्या देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे.
या बैठकीला अजित पवार गटातील सर्वच प्रमुख नेत्यांची उपस्थिती आहे. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे या बैठकीला उपस्थित आहेत. मात्र धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांनी या बैठकीला दांडी मारली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळाच चर्चेला उधाण आलं आहे. धनंजय मुंडे यांची तब्येत बिघडल्यानं ते या बैठकीला उपस्थित नसल्याचं समोर आलं आहे. मात्र छगन भुजबळ हे या बैठकीला का उपस्थित नाहीत, याच कारण अद्याप समोर आलेलं नाहीये.
दरम्यान मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर आता राष्ट्रवादीमध्ये कोणाला मंत्रिपद मिळणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे मंत्रिपदासाठी भुजबळांचं नाव समोर येत आहे. मात्र आजच्या या बैठकीला भुजबळच उपस्थित नसल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.
धनंजय मुंडेंचा राजीनामा
संतोष देशमुख हत्याप्रकरणात सीआयडीनं दोन दिवसांपूर्वीच चार्ज सीट दाखल केलं होतं. वाल्मिक कराड हाच या प्रकरणातील मास्टर माईंड असल्याचं सीआयडीनं आपल्या तपासात म्हटलं होतं. संतोष देशमुख यांनी खंडणीला विरोध केल्यानं त्यांची हत्या करण्यात आली असं या चार्ज शीटमध्ये म्हटलं आहे. त्यानंतर राजीनामा देण्यासाठी धनंजय मुंडे यांच्यावरील दबाव वाढला होता. त्यातच आता सोमवारी संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनीच धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितले होते. अखेर मुंडे यांनी राजीनामा दिला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List