डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील उपोषणाच्या आखाड्यात, आता कुणाला चितपट करणार? या मागण्यांसाठी पुकारला एल्गार
डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हा आता उपोषणाच्या आखाड्यात उतरला आहे. त्याने यापूर्वी नुकत्याच झालेल्या केसरी स्पर्धेतील पंचगिरीबाबत शड्डू ठोकून वातावरण तापावलं होतं. आता त्याने मोठी मागणी केली आहे. कुस्ती खेळासाठी त्याची आग्रही मागणी मान्य व्हावी अशी अनेकांची इच्छा आहे. एक पैलवानाने न्याय मागणीसाठी सविनय आंदोलन छेडल्याने महाराष्ट्रातील तमाम कुस्तीपटूंना त्याचे नवल आणि अभिमान वाटत आहे. तर त्याच्या गांधीगिरीची राज्यभरात चर्चा होत आहे.
काय आहे मागणी?
महाराष्ट्र केसरी ही कुस्ती क्षेत्रातील सर्वात मानाची स्पर्धा आहे. या स्पर्धेचा दर्जा उंचावण्यासाठी या स्पर्धेतील राजकारण दूर करण्याची मागणी चंद्रहार पाटील यांनी केला आहे. महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा वर्षातून एकदाच व्हायला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. या मागणीसाठी ते सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार आहेत. त्यांच्या या गांधीगिरीची सध्या राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे.
या स्पर्धेचा लावला खेळ
कुस्ती ही आपली जुनी संस्कृती आहे. पण एकाच वर्षाच चार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होत असताना शासन त्याकडे का लक्ष्य देत नाही? असा सवाल चंद्रहार पाटील यांनी विचारला आहे. 2025 मध्ये फेब्रुवारी महिन्यात एक स्पर्धा झाली. तर दुसरी आता मार्च महिन्यात होत आहे. तर इतर दोन स्पर्धा या वर्षाअखेरीस डिसेंबर महिन्यात होईल. म्हणजे एका वर्षात चार महाराष्ट्रा केसरी स्पर्धा होत आहे. हा तर या स्पर्धेचा खेळ लावला आहे, असा आरोप पाटील यांनी केला.
संघटनात्मक राजकारण दूर करा
एका वर्षात चार चार महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत आहे. यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेनंतर झालेला वाद अद्याप संपलेला नाही. तर डिसेंबर महिन्यात पुन्हा महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्याचे नियोजन सुरू आहे. त्यामुळे दोन -दोन महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेणे हे चुकीचे आहे. संघटनात्मक राजकारण दूर करून या स्पर्धेचे होत असलेले अवमूल्यन कमी करण्याचे आवाहन पाटील यांनी केले आहे.
तर मग मुंबईत मोर्चा
एकच महाराष्ट्र केसरी हवा, अशी आग्रही मागणी चंद्रहार पाटील यांनी केली आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी त्यांनी उपोषणाचा एल्गार पुकारला आहे. आता पृथ्वीराज मोहोळ याला विजेता मानून पुढील तयारी सुरू करावी. यात राजकारण करू नये. पंचगिरीत पुन्हा दोष होता कामा नये. सध्या कुस्ती क्षेत्रात जे सुरू आहे, ते चुकीचे आहे, असे रोखठोक मत पाटील याने मांडले. या मागणीसाठी लाक्षणिक उपोषण करणार असल्याचे ते म्हणाले. जर मागणी मान्य झाली नाही तर मुंबईत मोर्चा काढण्याचा इशारा चंद्रहार पाटील यांनी दिला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List