आणखी एक बॉम्ब, नवं कारण देत धनंजय मुंडेंचा मागितला राजीनामा, दमानियांचा मोठा गौप्यस्फोट
आज पुन्हा एकदा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मंत्रिमंडळातील निर्णय असल्याचं खोटं सांगून मुंडे पत्र पाठवतात. मंत्रिमंडळात निर्णय झाल्याचे सांगून मुंडेंनी भ्रष्टाचार केला. विधानसभेचा खर्च काढण्यासाठी खोटा जीआर काढण्यात आला. आयएफएफसीओमध्ये घोटाळा झाला असा आरोप त्यांनी केला आहे. तसेच त्यांनी यावेळी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे.
नेमकं काय म्हणाल्या दमानिया?
‘अनेक लोकांना, काही काही पक्षांच्या प्रवक्त्यांना असं वाटतंय की मी जे जे मांडत आहे, मग ते ऑफिस ऑफ प्रॉफिट असो, कृषी घोटाळा असो हे सर्व मांडण्याची गरज काय? धनंजय मुंडे यांचा आणि संतोष देशमुख यांच्या हत्येचा संबंध काय? आणि संतोष देशमुखांची जी हत्या झाली, त्याबद्दल सर्वांना जो आक्रोश आहे, आणि या प्रकरणात आतापर्यंत आपल्याला नीट कारवाई होताना दिसत नाहीये. अपेक्षित कारवाई होताना दिसत नाहीये, म्हणूनच मला वाटत आहे की, जोपर्यंत धनंजय मुंडे हे मंत्रिमंडळातून बाहेर पडत नाहीत, तोपर्यंत या हत्येच्या शोधाला नीट दिशा मिळणार नाही.
म्हणूनच मी आधी कराड आणि धनंजय मुंडे यांचे संबंध कसे आहेत ते दाखवले. मग कराड आणि धनंजय मुंडे हे एकत्र कंपन्यात कसे ते दाखवलं. त्यांचे आर्थिक व्यवहार असो कंपन्या असो, दहशत असो, नफा असो हे सगंळ मी दाखवलं. एका राज्य मंत्र्याला राज्यातील कंपनीकडून थेट नफा मिळतोय. त्या बॅलन्ससिटवर धनंजय मुंडेंची सही आहे, मात्र तरीही काही झालं नाही. त्यानंतर चार दिवस थांबून मी कृषी घोटाळा काढला. त्यात नॅनो युरीयाचा घोटाळा कसा झाला हे मी समोर आणलं. त्याच्यानंतर मी नॅनो युरीया आणि नॅनो डीएपीच्या बॉटल देखील मागवल्या. मागवलेल्या बॉटलचा इनव्हाईस मी ट्विट केला. मात्र एवढं सगळं घडून देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे धनंजय मुंडेंचा राजीनामा घेत नसतील तर कमाल आहे, असं दमानिया यांनी म्हटलं आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List