फडणवीस सरकारचा हा निर्णय, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आमदार नाराज, आता थेट…
Eknath Shinde and Devendra Fadnavis: राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारचे कामकाज सुरु झाले. परंतु या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री बनलेले शिवसेना नेते एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. त्याचवेळी फडणवीस सरकारने घेतलेल्या एका निर्णयामुळे शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदारही नाराज झाले आहे. त्यांनी आपली ही नाराजी उघडपणे एकनाथ शिंदे यांच्यापुढे मांडली आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासन आपल्या आमदारांना दिले आहे.
काय घेतला निर्णय
महायुतीचे सरकार आल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या आमदार आणि मंत्र्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला. यापूर्वी वाय प्लस असलेली मंत्र्यांची सुरक्षा ही वाय दर्ज्याची करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. वाय श्रेणी ही सुरक्षेचा तिसरा स्तर आहे. यामध्ये 11 जणांचे पथक सुरक्षा देत असते. त्यात एक किंवा दोन कमांडो आणि एक पोलिस अधिकारीही असतो. मंत्र्यांची सुरक्षा कपात करताना आमदारांची सुरक्षाच काढून घेतल्याची माहिती आहे.
शिवसेना मंत्री, आमदार नाराज
17 फेब्रुवारीपासून शिवसेना आमदार, मंत्र्यांची सुरक्षा काढून घेतली. यामुळे मंत्री, आमदार नाराज झाल्याची माहिती मिळाली. शिवसेना आमदारांनी याबाबत एकनाथ शिंदे यांच्याकडे आपली आपबिती मांडली आहे. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे आमदारांना सांगितले.
कोणत्या श्रेणीत काय सुरक्षा
- झेड प्लसमध्ये सुरक्षेत 55 सुरक्षा कर्मचारी असतात. त्यात एक पोलिस अधिकाऱ्यासह दहापेक्षा जास्त एनएसजी कमांडो असतात.
- झेड श्रेणी सुरक्षेत 22 कर्मचाऱ्यांची सुरक्षा असते. यामध्ये चार किंवा पाच एनएसजी कमांडो आणि एका पोलिस अधिकारी असतो.
- वाय श्रेणीत 11 सैनिकांची सुरक्षा कर्मचारी असतात. त्यात एक किंवा दोन कमांडो आणि एक पोलिस अधिकारीही असतो.
- एक्स श्रेणीत 5 किंवा 2 सुरक्षा कर्मचारी असतात. त्यात एक सशस्त्र पोलीस अधिकारी असतो.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List