स्वारगेट प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून गुन्हेगाराला फाशी द्यावी; सुप्रिया सुळे यांची राज्य सरकारकडे मागणी
राज्यातील गुन्हेगारीत आणि महिलांवरील अत्याचारात मागील काही महिन्यांमध्ये वाढ झाली आहे. लाडकी बहिण योजना राबवणाऱ्यांकडूनच बहिणींचा अवमान करणारे वक्तव्य करण्यात येत आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. सुप्रिया सुळे यांनी सोमवारी सकाळी स्वारगेट बस स्थानकाला भेट दिली. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
त्या म्हणाल्या की, बलात्कार प्रकरणाचा निषेधच आहे, पण घटना घडल्यावर ज्यापद्धतीने ती हाताळली गेली ते चुकीचे आहे. प्रकरण दडपण्याचा पोलिसांचा प्रयत्न दिसून येतो. घटनेनंतर आलेल्या प्रतिक्रियाही असंवेदनशील होत्या. आता आरोपी अटकेत आहे. जलदगती न्यायालयात खटला चालवून पिडितेला न्याय दिला पाहिजे. असे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी स्वारगेट प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून गुन्हेगाराला भरचाैकात फाशी द्यावी अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे, असेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
याबाबत एक्सवर पोस्ट करण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की, पुण्यातील स्वारगेट बस स्थानकाला भेट देऊन तेथील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. काही दिवसापुर्वी या ठिकाणी एका तरुणीवर अत्याचार केल्याची दुर्देवी घटना घडली होती. त्यामुळे पुढील काळात अशा घटनांना आळा घालण्याबरोबरच महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस दलाशी समन्वय साधून आवश्यक त्या उपाययोजना करण्याची विनंती आगार प्रमुखांना केली. तसेच असे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी स्वारगेट प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून गुन्हेगाराला भरचौकात फाशी द्यावी, अशी मागणी राज्य सरकारकडे केली. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, स्वाती पोकळे, किशोर कांबळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते, अशी पोस्टमध्ये म्हटले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List