जसा त्यांचा नेता तसेच त्यांच्या खालचे टपोरी चिल्लर; रक्षा खडसेंच्या मुलीच्या प्रकरणावरून संजय राऊत यांची टीका
जळगावात मिंधे गटाच्या टवाळखोर कार्यकर्त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी समोर आला. या घटनेवरून पुन्हा एकदा राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मिंध्यांना फटकारले आहे.
”केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीचा विनयभंग झाला. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राजकारणातून त्यांना वेळच मिळत नाही. पोलीस खातं, राज्यातील कायदा सुव्यवस्था, जनतेचे प्रश्न पाहायला वेळ नाहीए त्यांना”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
”रक्षा खडसे यांच्या मुलीचा विनयभंग करणारे हे सामाजिक कार्यकर्तेच आहेत ना. वाल्मिक कराड, कृष्णा आंधळे, धनंजय मुंडे यांच्यासारखे. पक्षाचं मोठं काम यांनी केलेलं आहे. मोठं सामाजिक काम यांनी महाराष्ट्रात उभं केलं आहे. तुम्ही ज्या सामाजिक कार्यकर्त्यांबाबत बोलताय त्याचा फोटो आम्ही दैनिक सामनाच्या पहिल्या पानावर छापलाय. महाराष्ट्रात तुम्ही सत्तेच्या जोरावर काय पेरताय? जिथे सत्ता तिथे बलात्कार खुनी व्याभिचारी जातायत. काल ठाण्यात गेलो तर आमच्या गाड्या अडवायचा प्रयत्न केला. आमच्यावर हल्ला करायचा प्रयत्न करत होते. आम्ही माननीय दिघे साहेबांनी हार व शाल अर्पण केलं. आमची पाठ वळताच ती शाल व हार या गुंड्यांनी रस्त्यावर फेकले. हा दिघे साहेबांचा अपमान नाही का? दिघे साहेबांच्या गळ्यातील हार पायाखाली तुडवता हे राज्यातील जनतेने पाहिलं. ही तिच प्रवृत्ती आहे जिने केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीचा विनयभंग केला. तोच पक्ष, तिच प्रवृत्ती आणि त्याच महान पक्षाचे हे महान सामाजिक कार्यकर्ते. हे महाराष्ट्र घडवणार आहेत. हे बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार आहेत. जसा त्यांचा नेता तशी त्यांची ही खालची पोरं बाळं, टपोरी चिल्लर. त्यांचा फडणवीसांनी बंदोबस्त केला पाहिजे”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
”तुमच्या केंद्रीय मंत्र्यांची मुलगी सुरक्षित नसेल तर सामान्य कुटुंबातील लेकींची काय परिस्थिती असेल. लाडक्या बहिणी, लाडक्या बहिणी असा खुळखुळा वाजवून फार काळ तुम्हाला इथे राहता येणार नाही. रोज- लाडक्या बहिणीचा विनयभंग होतोय. काय करताय तुम्ही. काय केलं तुम्ही बीडमध्ये. ज्यांचा खून झाला त्या मुंडेंची पत्नी मुलगी पुन्हा आंदोलनाला बसतायत. त्या तुमच्या लाडक्या बहिणी नाही का?, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List