आम्हाला धनंजय मुंडे यांचा राजीनामा नको; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
खासदार सुप्रिया सुळे यांनी मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची आज बीड येथे जाऊन भेट घेतली. खासदार सु्प्रिया सुळे यांनी वैभवी देशमुख हिच्याशी बातचीत केली आणि तिला आधार देत आम्ही तुमच्या सोबत आहोत असे आश्वस्थ केले. यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की मी आश्वासन देण्यासाठी नाही, तर आधार साथ देण्यासाठी इथे आले आहे. माणुसकीच्या नात्याने आम्ही या कुटुंबात सोबत उभे आहोत. महाराष्ट्रात कुठल्याही कुटुंबावर अन्याय झाला तरी याच ताकदीने त्यांच्याबरोबर आम्ही उभे राहू. या हत्या प्रकरणाची पारदर्शकपणे निष्पक्ष पातळीवर चौकशी झाली पाहिजे अशी मागणी सुळे यांनी केली.
सुळे पुढे म्हणाल्या की पहिला मुद्दा म्हणजे सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, याची सुनावणी ‘फास्ट ट्रॅक’ कोर्टाद्वारे झाली पाहिजे. ज्याने खंडणी मागितली किंवा ज्यांनी त्यांना मदत केली अशा सर्वांची चौकशी करून त्यांच्यामागे ईडी, सीबीआय लावले पाहिजे. सर्वांचे सीडीआर बाहेर आले पाहिजेत, महाराष्ट्रासमोर सत्य आले पाहिजे असेही सुळे यावेळी म्हणाल्या.फरार असलेले कृष्णा आंधळे सापडलेच पाहिजेत.माणूस असा कसा गायब होऊ शकतो असा सवाल देखील त्यांनी केला आहे.
शिवसेना नाराज आहे…
शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचा महादजी शिंदे पुरस्कार देऊन दिल्लीत सत्कार केला यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की मला याच्यातले काही माहिती नाही. आपण देशमुख हत्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटीसाठी कालच विनंती केली आहे. वेळ मिळाली की त्यांच्याशी बोलेल असेही त्या म्हणाल्या.
संवाद असलाच पाहिजे
धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला हवा का असा सवाल केला असता सुळे म्हणाल्या की आम्हाला राजीनामा नाही पाहिजे, त्या न्याय प्रक्रियेत कोणी कोणाला लपवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या माणसाला दूर केले पाहिजे हा आमचा आग्रह आहे असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. जयंत पाटील आणि नितीन गडकरी यांची भेट झाली त्यावर बोलताना त्या म्हणाल्या की परवा मी पण गडकरी साहेबांकडे गेले होते. त्याआधी मी अश्विनी वैष्णव यांना तीन वेळा भेटले होते, त्याच्यानंतर मी भूपेंद्र यादव यांना देखील भेटून आले.आम्ही जबाबदार लोकप्रतिनिधी आहोत,सशक्त लोकशाहीमध्ये संवाद असलाच पाहिजे असे उत्तर त्यांनी गडकरी आणि पाटील यांच्या भेटीवर दिले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List