‘हनीट्रॅप ‘मध्ये अडकवून सेंट्रिंग कामगाराकडून तीन लाख लुटले, साताऱ्यात महिलेसह पाचजणांवर गुन्हा दाखल
व्हॉट्सअॅपवर ओळख झालेल्या एका महिलेने ओळख वाढवून एका सेंट्रिंग कामगाराला ‘हनीट्रॅप’मध्ये ओढले. चार साथीदारांच्या मदतीने अपहरण करून कामगाराला तिने डांबून ठेवले. त्या ठिकाणी 15 लाखांची खंडणी मागून तीन लाख रुपये उकळले. हा धक्कादायक प्रकार 10 फेब्रुवारी रोजी सातारा शहर व परिसरात घडला. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात एका महिलेसह पाच तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साताऱ्यातील शाहूपुरी परिसरातील मतकर कॉलनीमध्ये 38 वर्षीय सेंट्रिंग कामगार वास्तव्यास आहे. एके दिवशी त्याची व्हॉट्सअॅपवर एका महिलेशी ओळख झाली. संबंधित महिलेने सतत फोन करून त्याच्याशी आणखी ओळख वाढविली. ‘तुम्हाला सेंट्रिंगचे काम देते,’ असे सांगून तिने कामगाराला 10 फेब्रुवारी रोजी बोलावून घेतले. पेट्री (ता. सातारा) गावच्या हद्दीत घेऊन जाऊन त्या कामगाराला सेंट्रिंगचे काम तिने दाखविले. त्यानंतर ‘कासला जाऊ,’ असे म्हणून त्याला एकीव परिसरातील एका लॉजवर नेले. तेथे दोघांच्या संमतीने त्यांनी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तेथून घरी साताऱ्याकडे येताना पेट्री गावाजवळ आल्यानंतर चौघांनी त्यांना अडविले. कारमध्ये बसवून मारहाण करून वेचले (ता. सातारा) गावच्या हद्दीत त्याला नेण्यात आले. या ठिकाणी एका खोलीत डांबून ठेवून सेंट्रिंग कामगाराचे सर्व कपडे काढून त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. यावेळी मारहाण करणारे संशयित त्याला, ‘माझ्या बहिणीला लॉजवर घेऊन जाण्याची तुझी हिंमत कशी झाली?’ असे म्हणू लागले. तसेच ‘तू आम्हाला पैसे दे; नाहीतर आम्ही तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करू,’ असे ती महिला म्हणाल्यावर या सर्वांनी एकत्र येऊन कट रचल्याची त्याला खात्री पटली. ‘तुला यातून वाचायचे असेल, तर आताच्या आता 15 लाख रुपये कोणाला तरी घेऊन येण्यास सांग,’ अशी धमकी दिली. त्यावेळी कामगाराने घाबरून पत्नीला पैसे घेऊन येण्यास सांगितले. त्याच्या पत्नीने घराच्या शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीकडून तीन लाख रुपयांची रोकड घेऊन ती वेचले येथे गेली. तेथील पुलावर चार तरुण आले. त्या तरुणांनी ते पैसे घेतले. ‘उद्या आणखी दोन लाख रुपये दिले नाहीत तर तुझा व्हिडीओ व्हायरल करू,’ अशी धमकी देऊन तेथून ते निघून गेले. काही वेळातच सेंट्रिंग कामगाराचीही त्यांनी सुटका केली. या प्रकारानंतर कामगाराने पत्नीसह थेट सातारा तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रसंग पोलिसांसमोर कथन केला. पोलीस उपनिरीक्षक आशीष गुरव तपास करीत आहेत.
‘ती’ महिला ताब्यात
■ या प्रकरणानंतर सातारा तालुका पोलिसांनी तातडीने दखल घेऊन संबंधित महिलेला ताब्यात घेतले असून, तिचे साथीदार मात्र फरार आहेत. त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List