आरओ प्लांटसाठी पालिकेकडून नियमावली, पाण्याची वारंवार तपासणी करणे बंधनकारक
पुणे शहरात गुलियन बॅरी सिंड्रोमचे (जीबीएस) रुग्ण आढळून आल्यानंतर खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाकडून आता ‘आरओ’ प्लांटसाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. या नियमावलीनुसार ‘आरओ’ प्लांटमधील पाण्याची वारंवार तपासणी करण्याचे बंधन चालकांवर असणार आहे.
सिंहगड रस्ता परिसरातील किरकटवाडी, नांदोशी, नांदेड या भागात सर्वाधिक जीबीएसचे रुग्ण आढळून आले आहेत. दूषित पाण्यामुळे हा आजार उद्भवत असल्याचे तपासातून स्पष्ट झाले होते. महापालिकेच्या आरोग्य विभागाने या परिसरातील महापालिकेचा पाणीपुरवठा, खासगी टँकर, आरओ प्लांटमधून पुरवठा होणाऱ्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. तपासणी अहवालामध्ये टँकर आणि आरओ प्लांटमधील पाण्यात जीबीएस आजाराला कारणीभूत ठरणारे घटक आढळून आले होते. त्यामुळे महापालिकेने बाधित भागातील 30 खासगी ‘आरओ’ प्लांट सीलबंद केले होते. मात्र, महापालिकेच्या कारवाईनंतरही काही प्लांट छुप्या पद्धतीने सुरू झाल्याची चर्चाही रंगली होती.
सध्या किरकटवाडी, नांदोशी, खडकवासला भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पुणे महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रामार्फत पाणीपुरवठा करण्यात येत नाही. नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी गुणात्मकदृष्ट्या योग्य दर्जाचे पाणी देणाऱ्या आणि विहित निकषांची पूर्तता करणारे खासगी आरओ प्लांटस पुन्हा सुरू करण्यासाठी परवानगी देणे आवश्यक असल्याने त्यासाठी स्वतंत्रपणे नियमावली तयार करण्याचा निर्णय महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने घेतला आहे. या निर्णयाला प्रशासनाने मान्यता दिली असून, नियमावलींची पूर्तता करणाऱ्या आरओ प्लांटस चालकांना पुन्हा प्लांट सुरू करण्याची परवानगी दिली जाणार आहे.
महापालिकेच्या नियमावलीनुसार आरओ प्लांट्सची महापालिकेकडे नोंदणी करणे आवश्यक आहे, आरओ प्लांटसच्या मूळ उत्पादक कंपनीकडून किंवा प्लांट दुरुस्ती करणाऱ्या संस्थेकडून योग्यतेचा दाखला सादर करावा किंवा देखभाल दुरुस्तीचे प्रत्यक्ष काम सुरू असतानाचे तारीख, वेळ व जीओ टॅगसह फोटो काढावेत, मुख्य उत्पादक कंपनी किंवा प्लांट दुरुस्त करणाऱ्या संस्थेकडून प्लांटच्या आऊटलेटचे पाणी शुद्धीकरण करण्यासाठी प्लांट योग्यप्रकारे कार्यान्वित असल्याचा दाखला सादर करावा, राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, पुणे महापालिका प्रयोगशाळेकडून आरओ प्लांट्सचे पाणी पिण्यास योग्य आहे का याची वारंवार तपासणी करून अहवाल सादर करावा, बिगर घरगुती दराने मीटरवर सदर पाण्याचे बिल जमा करावे, संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडील आरोग्य निरीक्षकांनी आरओ प्लांट्सचे वेळोवेळी नमुने घेऊन त्यांची तपासणी करावी व पाणी पिण्यास अयोग्य आढळल्यास सदर प्लांट बंद करण्यात येईल.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List