उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का, शिवसेनेच्या बैठकीत एकमताने ठराव मंजूर, बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या अध्यक्षपदावरुन हकालपट्टी होणार?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची आज मुंबईतील रंगशारदा सभागृहात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत एक ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. हा ठराव माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का देणारा आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरे यांची हकालपट्टी करावी, असा ठराव शिवसेनेच्या आजच्या बैठकीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबतची विनंती करण्याचं निश्चित करण्यात आलं. शिवसेनेचा हा निर्णय उद्धव ठाकरे यांना धक्का देणारा आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांनी नुकतंच बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं कामकाज कुठपर्यंत झालं हे पाहण्यासाठी त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिली होती. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यानंतर आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना आक्रमक झालेली बघायला मिळत आहे.
बैठकीत नेमकं काय ठरलं?
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली. “बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण होत आहे. शिवसेनेच्या विचारधारेला काळीमा फासण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं. आम्ही 45 वर्ष मातोश्री जवळून पाहिली. ज्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या विचाराला हरताळ फासलं, लाचारी पत्कारून उद्धव ठाकरे काँग्रेस सोबत गेले. त्या उद्धव ठाकरे यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदी आणि भाषणाचा अजिबात अधिकार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ शासन म्हणून उद्धव ठाकरे यांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी करावी, असा ठराव आम्ही आज बैठकीत मंजूर केला आहे”, अशी महत्त्वाची माहिती रामदास कदम यांनी दिली.
“लवकरच आम्ही मुख्यमंत्र्यांना ठराव अहवाल देऊ. उद्धव ठाकरेंना आता पंतप्रधानांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. आता कितीही भीक मागितली तरीही उपयोग नाही. उद्धव ठाकरे असतील किंवा त्यांचा पिल्लू असेल त्यांच्या हातात ही जागा गेली नाही पाहिजे. खर्च शासनाचा, सर्व शासनाचं आणि आयत्या बिळावर नागोबा जसे ते त्या गादीवर बसले, ती आम्हाला भीती आहे. म्हणून त्यांची अध्यक्ष पदावरून ताबडतोब हकालपट्टी व्हावी ही आमची मागणी आहे”, असं रामदास कदम म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List