‘त्या‘ युक्रेनियन नागरिकांचा शोध घ्यायचाय, आरोपींची सुटका नको; सत्र न्यायालयात पोलिसांचा युक्तिवाद
गुंतवणुकीवर जास्त पैशांचे आमिष दाखवून सवा लाख नागरिकांना कोटय़वधींचा गंडा घालणाऱ्या टोरेस कंपनीच्या मुळाशी पोहोचणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने तपास सुरू असून फसवणूक करणाऱ्या युक्रेनियन नागरिकांचा शोध घ्यायचाय. त्यामुळे आरोपींची सुटका करू नये, असा जोरदार युक्तिवाद राज्य सरकारच्या वतीने आज सत्र न्यायालयात करण्यात आला. न्यायालयाने या युक्तिवादाची दखल घेत तिघा आरोपींच्या कोठडीत शनिवार 18 जानेवारीपर्यंत वाढ केली.
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गेल्या आठवडय़ात टोरेस ज्वेलरी ब्रँड चालवणाऱ्या प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेडशी संबंधित तानिया क्साटोवा ऊर्फ ताझागुल क्साटोवा (52), सर्वेश सुर्वे (30) आणि व्हॅलेंटिना कुमार (44) यांना आज सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. अतिरिक्त न्यायाधीश एन.पी. मेहता यांच्यासमोर झालेल्या सुनावणीवेळी अतिरिक्त सरकारी वकील जे. एन. सूर्यवंशी यांनी युक्तिवाद केला. त्यांनी न्यायालयाला सांगितले की, फसवणुकीची पाळेमुळे खोलवर रुजली असून या आरोपींनी युक्रेनियन नागरिक असलेल्या इतर आरोपींशी कसा संवाद साधला याचा शोध घेतला जात आहे. त्यासाठी तिघांच्या वेबसाइट्स आणि मोबाईल फोनची तपासणी करणे आवश्यक असल्याने आरोपींची कोठडी वाढवण्यात यावी तसेच आरोपींनी यासंबंधित युक्रेनमधील 11 जणांना व पळून गेलेल्या टोरेसच्या माजी संचालिका व्हिक्टोरिया कोव्हालेंको यांना ओळखले असून त्यांची कोठडी वाढवण्याची मागणी केली. आरोपी व्हॅलेंटिना व सुरेश यांच्या वतीने ऍड. रवी जाधव यांनी युक्तिवाद केला. ते कंपनीत फक्त पगारदार कर्मचारी असल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले.
तक्रारदारांची संख्या वाढली
अतिरिक्त सरकारी वकील जे. एन. सूर्यवंशी यांनी न्यायालयाला माहिती देताना सांगितले की, आरोपींच्या मालकीच्या जंगम मालमत्तेसह पैशांचा शोध घेण्यासाठी पोलिसांना आरोपीच्या आणखी कोठडीची आवश्यकता आहे. गुंतवणूक करणाऱ्या तक्रारदारांची संख्या वाढली असून गुह्याची व्याप्ती वाढली आहे.
इतर आरोपी
तौफिक रियाज ऊर्फ जॉन कार्टर, व्हिक्टोरिया कोव्हालेंको, ओलेना स्टोव्हन, इम्रान जावेद, मुस्तफा काराकोक, ओलेक्झांडर बोरॉव्हाईक, ओलेक्झांडर झापीचेंको, ओलेक्झांड्रा ब्रून्स्कीव्हका, ओलेक्झांड्रा ट्रेडोखीब, आरतेम ओलीफेरचुक, इयुरचेंको इगोर.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List