रुपया लुडकला! महागाईचा भडका उडणार
रुपयाने आज गेल्या दोन वर्षांतील नीचांकी तळ गाठला. सलग चौथ्या दिवशी रुपया लुडकला. आज अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया तब्बल 58 पैशांनी घसरून 86.62 वर स्थिरावला. ही आतापर्यंतची ऐतिहासिक घसरण आहे. अमेरिकन डॉलर मजबूत झाल्यामुळे आणि क्रूड तेलाच्या किमती गगनाला भिडल्यामुळे रुपया रसातळाला गेला असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महागाईचा भडका उडणार असून नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांच्या खिशाला चाट पडणार आहे. किचनचे बजेटही कोलमडणार आहे.
शेअर बाजार कोसळला
शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स तब्बल 800 अंकांनी गडगडला. 30 शेअर्सपैकी 29 शेअर्समध्ये मोठी घसरण दिसली. निफ्टीही 225 अंकांच्या घसरणीसह उघडला.
आयात महागणार
रुपयाची ही ऐतिहासिक घसरण असल्याने आणि रुपया नीचांकी पातळीवर स्थिरावल्याने हिंदुस्थानसाठी आयात महागणार आहे. परदेशात फिरणे आणि शिक्षण घेणेही महाग होणार आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य 50 होते तेव्हा अमेरिकेतील हिंदुस्थानी विद्यार्थ्यांना 50 रुपयांना 1 डॉलर मिळू शकतो. आता 1 डॉलरसाठी विद्यार्थ्यांना 86.31 रुपये खर्च करावे लागतील. त्यामुळे शिक्षण शुल्कापासून ते निवास, भोजन आणि इतर गोष्टी महाग होणार आहेत.
n क्रूड तेलाच्या किमती 1.12 टक्क्यांनी वाढल्या असून प्रति बॅरल 80.65 अमेरिकन डॉलरवर पोहोचल्या आहेत. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही वाढ होण्याची भीती आहे. इंधन दर वाढल्यास वाहतूक खर्च वाढेल. पर्यायाने उत्पादन खर्च वाढेल आणि महागाईचा भडका उडेल असे तज्ञ सांगतात.
परकीय गंगाजळीत 10 महिन्यांचा नीचांक
देशाच्या परकीय गंगाजळीतही घसरण झाली असून हा गेल्या 10 महिन्यांतील नीचांक असल्याचे समोर आले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार 3 जानेवारीपर्यंतचा परकीय चलनसाठा 634 अब्ज डॉलरपर्यंत खाली गेला आहे. सप्टेंबरमध्ये हा आकडा 704.89 अब्ज डॉलर होता. गेल्या तीन महिन्यांत त्यात तब्बल 70 अब्ज डॉलरची मोठी घट झाल्याने चिंता व्यक्त होत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List