बीडमध्ये जनतेचा आकांत, एसपींच्या अंगावर संतप्त महिलांनी बांगड्या फेकल्या
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 33 दिवस उलटले, तरी तपासाचा खेळ सुरू आहे. कृष्णा आंधळे अजूनही सापडत नाही. मुख्य सूत्रधार वाल्मीक कराडवर ना खुनाचा गुन्हा दाखल झाला, ना त्याला मकोका लावला. तपासाबाबतही ठोस माहिती दिली जात नाही. आरोपी बाहेर आले तर ते आम्हाला मारतील, त्यापेक्षा आम्हीच जीव देतो, असे म्हणत देशमुख कुटुंबासह संपूर्ण मस्साजोग गाव आज रस्त्यावर उतरले. धनंजय देशमुख, वैभवी देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर आंदोलन केले, तर गावातील महिलांनी पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांच्यावर बांगडय़ा फेकल्या.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात तपास यंत्रणा कोणतीही माहिती देत नाही. वाल्मीक कराडवर खंडणीचा फुटकळ गुन्हा दाखल करून तपास यंत्रणांनी हात वर केले आहेत. कृष्णा आंधळे अजूनही हुलकावणी देतो आहे. पोलीस आणि सीआयडीने तपासाचे मातेरे करून टाकल्याच्या निषेधार्थ आज देशमुख कुटुंबीय आणि गावकऱयांनी आंदोलन केले.
बहिणीची प्रकृती खालावली
सगळय़ांना जीव लावणाऱया एका भावाचा घात झाला. न्याय मिळावा म्हणून दुसरा भाऊही जीव द्यायला निघाला. काळीज पिळवटून टाकणारे हे चित्र पाहून बहीण प्रियंकाची घालमेल झाली आणि तिची प्रकृतीच बिघडली. त्यांना तातडीने केजच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आले.
…तर जगणं मुश्कील करेन – जरांगे
रात्रीच मी धनंजय देशमुखांना विनंती केली होती. बाबांनो, आम्हाला तुमची गरज आहे. असे खचून जाउै नका, तरी आज धनंजयने आणि ग्रामस्थांनी आंदोलन केले. हे गाव आणि देशमुख कुटुंब भयभीत आहे. त्यांना काही झाले तर मी सरकारचे जगणे मुश्कील करेन, असा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी दिला. संपूर्ण समाज देशमुख कुटुंबाच्या पाठीशी आहे, असे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले.
आम्ही मेल्यावर डोळे उघडणार का? वैभवी देशमुख संतापल्या
अचानक धनंजय देशमुख गायब झाल्यानंतर मस्साजोगमध्ये एकच खळबळ उडाली. त्यावेळी संतोष देशमुख यांच्या कन्या वैभवी देशमुखच्या संतापाचा भडका उडाला. ‘‘पोलिसांचा खडा पहारा असताना काका कुठे गेले? पप्पांसारखेच काकांचेही झाले तर त्याला जबाबदार कोण? असा सवाल करतानाच पोलीस काय शोध घेणार, आम्ही त्यांना तपासाची माहिती मागत आहोत. तपासाची माहिती मिळणे हा आमचा अधिकार आहे. पण पोलीस मख्ख आहेत. आम्ही मेल्यावर यांचे डोळे उघडणार का?’’ अशा शब्दांत वैभवी देशमुखने संताप व्यक्त केला.
मुख्यमंत्र्यांची लगोलग बैठक
मस्साजोगमधील आंदोलनाचे पडसाद थेट मंत्रालयातही उमटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी तातडीने बैठक बोलावली. बैठकीनंतर फडणवीस यांनी सीआयडीच्या अधिकाऱयांशी संपर्क साधून एकही आरोपी सुटता कामा नये, कोणावरही दयामाया दाखवू नका, कठोर कारवाई करा, अशा सूचना दिल्या.
संतोष देशमुख यांना कराडकडून नोव्हेंबरमध्येच धमकी,अश्विनी देशमुख यांचा सीआयडीला जबाब
संतोष देशमुख यांना नोव्हेंबर महिन्यातच वाल्मीक कराड आणि विष्णू चाटे या दोघांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती, अशी धक्कादायक माहिती संतोष देशमुखांच्या पत्नी अश्विनी यांनी सीआयडीला दिली. सीआयडीने नुकताच अश्विनी यांचा जबाब घेतला. पवनचक्की प्रकरणानंतर संतोष देशमुख हे अस्वस्थ आणि भयभीत होते. त्यानंतर शनिवारी ते लातूरला गेले. ज्यांच्याशी वाद झाला आहे ते गुंड आहेत, मला मारहाण करतील असे ते म्हणाले. त्यामुळे मी त्यांना लातूरलाच थांबा असे सांगितले. रविवारीही ते लातूरलाच थांबले होते. पण त्यांना सतत कुणाचे तरी फोन येत होते. त्यामुळे वैतागून ते सोमवारी मस्साजोगला यायला निघाले आणि पुढचा प्रकार घडला, असा जबाब अश्विनी यांनी नोंदवला आहे.
n देशमुख कुटुंब पाण्याच्या टाकीवर आणि खाली मस्साजोगचे गावकरी अशा दुहेरी आंदोलनाच्या कात्रीत पोलीस सापडले. पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांना महिलांनी घेराव घातला. संतोष देशमुखांना कधी न्याय मिळणार? वाल्मीक कराडला कधी मकोका लावणार? कृष्णा आंधळेला कधी पकडणार? अशी प्रश्नांची सरबत्ती करत महिलांनी कांवत यांना धारेवर धरले. या प्रश्नावर कांवत यांना उत्तर देता आले नाही. त्यामुळे संतापलेल्या महिलांनी न्याय देता येत नसेल तर बांगडय़ा भरा, असे म्हणत कांवत यांच्यावर बांगडय़ा फेकल्या.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List