वाल्मीक कराड आणि देवेंद्र फडणवीस यांचं नेमकं नातं काय? संजय राऊत यांचा सवाल
वाल्मीक कराडला पाठीशी का घालत आहेत हा एक रहस्याचा विषय आहे असा टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी लगावला. तसेच वाल्मीक कराड आणि देवेंद्र फडणवीस यांचं नेमकं नातं काय आहे? असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला.
आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की कुणालाही सोडणार नाही. म्हणजे कराड सोडून सर्वांना मी अटक करून कारवाई करीन. वाल्मीक कराड आणि देवेंद्र फडणवीस यांचं नेमकं काय नातं आहे, याच्यावर एखादी एसआयटी नेमावी लागेल. आणि कुणासाठी देवेंद्रजी हे करत आहेत, वाल्मीक कराडला पाठीशी का घालत आहेत हा एक रहस्याचा विषय आहे. कुणाला वाचवत आहेत अजित पवार की धनंजय मुंडे? फडणवीसांनी एक एसआयटी नेमली होती, ती बरखास्त करून नवीन एसआयटी नेमली आहे.
तसेच इंडिया आघाडी ही लोकसभा निवडणुकीसाठीच तयार करण्यात आली होती. पण ती कायम ठेवणं ही देशाची आणि लोकशाहीची गरज आहे. दिल्लीत आप आणि काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत एकही जागा मिळाली नव्हती. दिल्लीत आप आणि काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवत आहेत, पण दोघांनी बसून चर्चा केली असती आणि मार्ग निघाला असता तर आनंद झाला असता. महानगरपालिकेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. इथे आघाडी करणं कठीण असतं. पण विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी आमची आघाडी कायम असणार, यात कुठलेही दुमत नाही. पण इंडिया आघाडी तुटली, महाविकास आघाडी फुटली अशा बातम्या चालवल्या, पण तसे नाहिये. आमचे पक्ष वेगवेगळे आहेत पण लोकशाहीसाठी आणि संविधानासाठी आम्ही एकत्र येतो. तर सर्वांना काहीना काही तडजोड करावी लागते. एनडीएमध्ये भाजप मोठा पक्ष होता, त्यामुळे सर्वांना पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी ही भाजपची होती. तसेच आमच्या पक्षात काँग्रेस मोठा पक्ष आहे. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असून, नेतृत्वाची जबाबदारी काँग्रेसचीच आहे. हे आमचे मत आहे आणि आघाडीच्या पक्षात नेहमीच चर्चा असायला हवी. जर संवाद नसेल तर कुठलीही आघाडी, युती टिकत नाही.
याला भागवत स्वातंत्र्य म्हणतात का?
रामलल्ला हा काही संघाने आणलेला नाही. प्राणप्रतिष्ठेला आम्ही पोस्टर पाहिले की मोदी लहान रामाला घेऊन मंदिरात घेऊन चालले आहेत. याला भागवत स्वातंत्र्य म्हणतात का? स्वतः राम पारतंत्र्यात आहे. या देशाचे स्वातंत्र्य कशात आहे हे जर आमच्या प्रिय सरसंघचालकांना समजून घेता येत नसेल तर ते त्या संघटनेचं दुर्दैवं म्हणावं लागेल. आज देशाचा कोंडवाडा झालेला आहे. प्रभू श्रीराम यांचं मंदिर उभारून सर्वांनी मोठं कार्य केलेलं आहे. हे मंदिर बांधणारं फक्त एक पक्ष आणि एक संघटना नाही, यासाठी अनेकांनी रक्त आणि बलिदान दिले आहे. सरसंघचालक हे आदरणीय व्यक्ती आहेत. पण त्यांनी संविधान नाही लिहिलंय. या देशाचा कायदा त्यांनी नाही लिहिला आणि ते हे कायदे नाही बदलू शकत. राम मंदिर ही देशासाठी गर्वाची बाब आहे. भागवत म्हणाले राम मंदिरामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले हे चुकीचे आहे. राम हे या देशात हजारो वर्षांपासून आहे. राम मंदिरासाठी आम्ही आंदोलन केलं होतं. पण तुम्ही रामावरून राजकारण करू नका, तरच देश खऱ्या अर्थाने स्वतंत्र होईल असेही संजय राऊत म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List