कॉ. कृष्णा मेणसे यांचे निधन, सीमा प्रश्नाच्या चळवळीतील ज्येष्ठ नेता हरपला
ज्येष्ठ कामगार नेते, स्वातंत्र्यसैनिक, सीमा लढय़ातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉ. कृष्णा मेणसे (97) यांचे सोमवारी दुपारी राहत्या घरी निधन झाले. सीमा लढय़ाचा चालता-बोलता इतिहास तसेच अन्यायाविरुद्ध आवाज उठविणारा कामगार नेता, अशी त्यांची ओळख होती.
कॉ. कृष्णा मेणसे हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर उपचारही सुरू होते. रात्री उशिरा त्यांच्यावर सदाशिव नगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यामागे मुलगे प्रा. आनंद मेणसे, अॅड. संजय मेणसे, कन्या लता पावशे, नीता पाटील व नातवंडे असा मोठा परिवार आहे.
प्रखर कम्युनिस्ट, उत्तम वक्ते, सीमा लढय़ातील सत्याग्रही, लेखक, संपादक असे त्यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. बेळगावसह मराठी भाषिक सीमा भाग महाराष्ट्रात विलीन व्हावा यासाठी त्यांनी अनेकदा तुरुंगवास भोगला. गोवा मुक्ती आंदोलनातही त्यांचा सहभाग होता.
कष्टकऱयांसाठी उभारलेली आंदोलने, अंधश्रद्धा निर्मूलन, भ्रष्टाचार निर्मूलन आणि सीमा लढा यांत त्यांनी झोकून देऊन कार्य केले होते. आठ दशकांहून अधिक काळ श्रमिक, कष्टकरी, कामगार, शेतमजूर यांच्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावर संघर्ष करणारे आणि बेळगाव, बिदर, भालकी, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, यासाठी आपले आयुष्य वेचणारे कॉ. कृष्णा मेणसे यांना काही दिवसांपूर्वी ‘राष्ट्रवीरकार’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते.कार्यकर्ता, पत्रकार म्हणून काम करीत असताना त्यांनी उत्तम वैचारिक साहित्यही जन्माला घालून प्रबोधनाच्या चळवळीला गती देण्याचे काम केले आहे. ‘हो ची मिन्ह यांचे चरित्र’, ‘बसवेश्वर ते ज्ञानेश्वर’, ‘अशा तोडल्या बेडय़ा’, ‘असा लढलो, असा घडलो’, ‘गोठलेली धरती, पेटलेली मने’, ‘गोवा मुक्ती आंदोलन’, ‘डॉ. आंबेडकर आणि बुद्ध धर्म’ यांबरोबर ‘वीरगाथा’ या ‘कन्नड पुस्तकाचा अनुवाद’, ‘परिक्रमा प्रवास वर्णन’, ‘वीरराणी कित्तूर चन्नमा’ इतके विपुल लेखन त्यांनी केले आहे. त्यांच्या जाण्याने सीमा प्रश्न चळवळ, साहित्यविश्व, पत्रकारिता आणि कामगारांच्या आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List