आले तुफान किती..; आमिर खानच्या लेकीचा जावयाकडून सत्कार; क्रांती रेडकरसह नेटकऱ्यांनाही हसू अनावर
बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ अर्थात अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खानने गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात लग्न केलं. आयराने जिम ट्रेनर नुपूर शिखरेशी लग्नगाठ बांधली. या दोघांचा लग्नसोहळा सोशल मीडियावर विविध कारणांमुळे चर्चेत होता. त्यानंतर आता नुकतंच नुपूरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधलंय. या व्हिडीओमध्ये नुपूर चक्क शाल-श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन पत्नी आयाराचा सत्कार करताना दिसतोय. या सत्कारामागचं कारण त्याने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये सांगितलंय. हे कारण वाचून तुम्हालाही हसू अनावर होईल.
नुपूरकडून होणाऱ्या आयराच्या या सत्काराच्या व्हिडीओमध्ये ‘आले तुफान किती, जिद्द ना सोडली’ हे मराठी गाणं ऐकायला मिळतंय. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलं, ‘माझ्यासोबत लग्न करायचं धाडस दाखवण्यासाठी आणि एक अख्खं वर्ष यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल, मी माझी मिसेस, सौ. आयरा खान हिचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन इथे सत्कार करतो.’ या भन्नाट व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. काहींनी तर कमेंट बॉक्समध्ये आयराला एक उखाणं घेण्याचीही विनंती केली आहे.
आयरा खानचा पती नुपूर शिखरे हा सेलिब्रिटी फिटनेस कोच आणि कन्सल्टंट आहे. बॉलिवूडमधील बरेच सेलिब्रिटी नुपूरचे क्लाएंट आहेत. यात आमिर खान आणि सुष्मिता सेन यांचाही समावेश आहे. 2020 मध्ये लॉकडाऊनदरम्यान आयरा तिच्या वडिलांसोबत राहत होती. त्यावेळी तिची पहिल्यांदा ओळख नुपूरशी झाली. सुरुवातीला ही ओळख आयराच्या फिटनेससाठीच झाली होती. हळहळू या ओळखीचं रुपांतर मैत्रीत आणि त्यानंतर प्रेमात झालं. 2021 मध्ये आयराने सोशल मीडियावर प्रेमाची जाहीर कबुली दिली. सप्टेंबर 2021 मध्ये नुपूरने आयराला लग्नासाठी प्रपोज केलं. त्याच्या दोन महिन्यांनंतर दोघांनी साखरपुडा जाहीर केला.
आयरा आणि नुपूरच्या लग्नाला आमिर खानच्या दोन्ही पूर्वी पत्नी उपस्थित होत्या. आयरा ही आमिर आणि त्याची पहिली पत्नी रिना दत्ता यांची मुलगी आहे. पहिल्या पत्नीपासून आमिरला जुनैद हा मुलगासुद्धा आहे. तोसुद्धा बहिणीच्या अत्यंत खास दिवशी त्याठिकाणी उपस्थित होता. याशिवाय आमिरची दुसरी पत्नी मुलगा आझादला घेऊन लग्नाला पोहोचली होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List