तालमीत व्यायाम करताना कुमार पैलवानाचा मृत्यू; माण तालुक्यातील मल्ल जय कुंभार हरपला
पैलवान म्हटलं की तालीम आलीच. मात्र तालमीत व्यायाम करताना एका पैलवानाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हृदयाविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मलवडी (ता. माण) येथील पैलवान जय दीपक कुंभार (15 वर्षे ) असे मृत झालेल्या पैलवानाचे नाव आहे. या आकस्मित घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे कुस्तीक्षेत्रावर पुन्हा एकदा शोककळा पसरली.
माण तालुक्याच्या क्रीडा क्षेत्रावर दुःखाचा डोंगर कोसळावा अशी अतिशय दुःखद घटना घडली. जय याचे पार्थिव आल्यावर कुटुंबीयांना हा धक्का पचविणे जड जात होते. जयच्या आईचा टाहो उपस्थितांचे काळीज पिळवटून टाकत होता. या घटनेने मलवडी पंचक्रोशीसह माण तालुका हळहळला. मलवडी येथील हॉटेल व्यावसायिक दीपक कुंभार यांनी आपल्या एकुलत्या एका मुलाला म्हणजेच जयला पैलवान बनवायचे या ध्येयाने लहानपणापासून घडवले. 5 ऑगस्ट 2010 रोजी जन्मलेल्या जयने मलवडी, आंधळी येथे सराव करताना कुस्तीत चुणूक दाखवली. त्यानंतर त्याला झिरपवाडी व तिथून पुढे पुणे येथील जाणता राजा कुस्ती संकुल येथे सराव व प्रशिक्षणासाठी ठेवले.
जयनेसुद्धा वडिलांच्या कष्टाचे चीज करत नावलौकिक मिळवला. शालेय कुस्ती स्पर्धेत सलग दोन वर्षे त्याने 14 वर्षे वयोगटात राज्यपातळीवर तिसरा क्रमांक मिळवला. या वर्षी 17 वर्षे वयोगटात 62 किलो वजनी गटात विभाग पातळीवर तिसरा क्रमांक मिळवला. नुकत्याच झालेल्या श्री खंडोबा यात्रेनिमित्त आयोजित मलवडीच्या कुस्ती मैदानात नेत्रदीपक कुस्ती करत प्रेक्षकांची वाहवा मिळवली.
‘महाराष्ट्र केसरी’सह ऑलिम्पिक पदक मिळवायचे हे ध्येय घेऊन वाटचाल करत असलेल्या जयसह दीपक कुंभार यांचे स्वप्न आज भंगले. आज सकाळी सराव केल्यानंतर आकस्मिक जय याचे निधन झाले. या घटनेनंतर पुण्यासह माण तालुक्यातील जय याच्या चाहत्यांनी व पैलवानांनी मलवडीकडे धाव घेतली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List