अलविदा 2024… वेलकम 2025! नववर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबईकरांनी उधळले उत्साहाचे रंग; हॉटेल, रेस्टॉरंटपासून सोसायट्यांच्या गच्चीपर्यंत ‘फुल टू सेलिब्रेशन’
नववर्षाच्या पूर्वसंध्येला शहराच्या समुद्रकिनारी मुंबईकरांनी सरत्या वर्षाला निरोप देतानाच नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त उत्साहाचे रंग उधळले. मंगळवारी सायंकाळी गेट वे ऑफ इंडिया, मरिन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी, वरळी सी फेस, वांद्रे बॅण्डस्टॅण्ड, जुहू चौपाटी, वर्सोवा, मढ, गोराई बीचवर कुटुंबीयांसह आलेल्या मुंबईकरांची तुडुंब गर्दी उसळली होती. रात्री 12 वाजता फटाक्यांच्या आतषबाजीने मुंबईचे आकाश उजळून निघाले. त्यानंतर रात्रभर हॉटेल-रेस्टॉरंटपासून सोसायटय़ांच्या गच्चीपर्यंत ‘फुल टू सेलिब्रेशन’चा माहोल होता. यादरम्यान शहरातील बहुतांश रस्त्यांवर जागोजागी वाहतूक काsंडी झाली होती.
मुंबई शहर आणि उपनगरांसह ठाणे, नवी मुंबईतही ‘थर्टी फर्स्ट’चा अमाप उत्साह होता. हॉटेल, रेस्टॉरंट, पबमध्ये तोबा गर्दी झाली होती. अनेक हॉटेल्सच्या बाहेर मोठय़ा रांगा लागल्या होत्या. ‘पार्टी फर्स्ट’ म्हणत मोठय़ा प्रमाणावर कुटुंबीय घराबाहेर पडले होते. 2024 वर्षाचा सूर्यास्त पाहण्यासाठी चौपाट्यांवर गर्दी झाली होती. त्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुंबई पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. महिलांच्या सुरक्षेची विशेष खबरदारी घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके तैनात करण्यात आली होती. याचवेळी मुंबईकरांची गैरसोय दूर करण्यासाठी बेस्ट उपक्रमाने विशेष बसगाडय़ांची सेवा दिली. तसेच विशेष लोकल रेल्वेही धावल्या. त्याचा नागरिकांना फायदा घेतला.
कित्येक सोसायटय़ांनी सरत्या वर्षातील वाईट गोष्टींचा कायमचा नायनाट व्हावा या भावनेने प्रतीकात्मक ‘बॅड मॅन’चे दहन केले. मुंबई पोलिसांनी विभागनिहाय गस्त घालून संपूर्ण सेलिब्रेशनवर जागता पहारा ठेवला. वाहतूक पोलिसांनी ‘ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह’च्या विशेष मोहिमेत वाहनचालकांची ‘ब्रेथ अॅनालायझर’ उपकरणांमार्फत तपासणी केली.
कोकणची किनारपट्टी पर्यटकांनी खुलली
नाताळ सुट्टीची संधी साधत कोकणात फिरायला गेलेल्या पर्यटकांनी मंगळवारी सायंकाळी तेथील समुद्रकिनारी गर्दी केली होती. मुंबईशेजारील अलिबागमधील सर्व बीच पर्यटकांच्या गर्दीने खुलून गेले होते. त्याचबरोबर रत्नागिरी, सिंधुदुर्गातील किनाऱ्यांवरही हजारो पर्यटकांनी हजेरी लावली.
आज देवदर्शनाने
नववर्षाचा ‘श्रीगणेशा’
‘थर्टी फर्स्ट’चा आनंद लुटल्यानंतर मुंबईकर बुधवारी देवदर्शनाच्या रांगेत दिसणार आहेत. मुंबईचे आराध्य दैवत श्री सिद्धिविनायक मंदिर, मुंबादेवी, महालक्ष्मी मंदिर, श्री स्वामी समर्थांचे मठ, साईबाबा मंदिर आदी ठिकाणी देवदर्शन करून अनेकजण नवीन वर्षाचा ‘श्री गणेशा’ करणार आहेत. सर्व मंदिर व्यवस्थापनांनी भक्तांच्या गर्दीचे नियोजन केले आहे.
जागोजागी वाहतूककोंडी
शहरातील जवळपास सर्व रस्त्यांवर जागोजागी वाहतूककोंडी झाली होती.मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-पुणे एक्स्प्रेस तसेच अलिबागकडे जाणाऱया मार्गावरही वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List