झेडपीच्या शिक्षकाने विद्यार्थ्यांना खाऊ घातल्या हिरव्या मिरच्या, बदलीसाठी गुरुजींचे आक्रित; आंबेगावमधील प्रकार
शैक्षणिक वर्तुळात बदलीसाठी अधिकारी-पदाधिकाऱ्यांची मिन्नतवारी किंवा टेबलाखालून चिरीमिरी देण्याचा प्रकार सर्वश्रुत आहे. पण यावरही कडी करत जिल्हा परिषदेच्या शाळेतील एका शिक्षकाने बदलीसाठी चक्क लहानग्या विद्यार्थ्यांना जबरदस्तीने हिरव्या मिरच्या खाऊ घातल्याचा प्रकार समोर आला आहे. आंबेगाव तालुक्यातील माळीण येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत हा प्रकार घडला. संबंधित शिक्षक शाळेत अनेकदा दारू पिऊन येत असल्याची धक्कादायक बाबही पुढे आली आहे.
माळीण येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक राहुल हिरवे यांनी आपली बदली व्हावी, यासाठी लहान मुलांना हिरव्या मिरच्या खाऊ घातल्या. हे शिक्षक मारहाण करतात, दारू पिऊन येतात, अशी तक्रार विद्यार्थ्यांनी पालकांकडे केली. संबंधित शिक्षकाच्या वर्तवणुकीमुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे विद्यार्थी शाळेत जाण्यास टाळाटाळ करतात. या शिक्षकावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
माळीण येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये पहिली ते सातवीपर्यंत वर्ग आहे. शाळेत एकूण 55 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेत सध्या चार शिक्षक कार्यरत असून माळीण, आमडे, वचपे, अडिवरे, पांचाळे, कोंढरे या दुर्गम भागातील विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत.
दरम्यान, मागील एक वर्षापासून शिक्षक राहुल हिरवे यांच्याविरुद्ध ग्रामपंचायतीत ठराव करून गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आली. तरीही त्यांच्याविरुद्ध कारवाई होत नसल्याची खंत ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत संबंधित शिक्षकाकडे घडलेल्या घटनेबाबत लेखी खुलासा मागितला असून पुढील योग्य ती कारवाई सुरू करण्यात आली असल्याचे, गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज यांनी सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List