गर्भपातानंतर अभिनेत्री रडली ढसाढसा; सासूने सावरलं, सुनेला पाहून सासरेही भावूक!

गर्भपातानंतर अभिनेत्री रडली ढसाढसा; सासूने सावरलं, सुनेला पाहून सासरेही भावूक!

भोजपुरी स्टार संभावना सेठ सध्या तिच्या खासगी आयुष्यात अत्यंत कठीण काळाचा सामना करतेय. तीन महिन्यांच्या प्रेग्नंसीनंतर तिचा गर्भपात झाला. काही दिवसांपूर्वी आपल्या युट्यूब चॅनलवर तिने आणि तिचा पती अविनाश द्विवेदी यांनी याबद्दलची माहिती चाहत्यांना दिली होती. गर्भपातानंतर शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खचल्याचं तिने म्हटलं होतं. त्यानंतर आता तिचे सासू-सासरे दिल्लीहून मुंबईला तिला भेटायला आणि तिचं सांत्वन करायला पोहोचले आहेत. यावेळी सासूला पाहताच संभावना भावूक झाली. आधी तिने त्यांचा आशीर्वाद घेतला आणि त्यानंतर त्यांना मिठी मारत ती ढसाढसा रडली. संभावनाला रडताना पाहून तिची सासूसुद्धा भावूक झाली. त्यांनी तिला सावरण्याचा प्रयत्न केला. यावेळी संभावनाचे सासरेसुद्धा भावूक झाले.

युट्यूब चॅनलवर पोस्ट केलेल्या व्हिडीओत संभावनाच्या पतीने गर्भपाताविषयी सांगितलं, “आमच्यासोबत गेल्या बऱ्याच काळापासून हेच होतंय. आता पुन्हा एकदा तेच झालं. आज गरोदरपणातील तिचे तीन महिने पूर्ण झाले होते. डॉक्टरांच्या तपासानंतर आम्ही आज सर्वांना गुड न्यूज सांगणार होतो. सर्वकाही ठीक सुरू होतं. पण नुकत्याच केलेल्या स्कॅनमध्ये बाळाचं हृदय धडधडत नव्हतं.”

गेल्या तीन महिन्यात जवळपास 65 इंजेक्शन्स घेतल्याचा खुलासा संभावनाने या व्हिडीओत केला. “65 पेक्षा कमी नाही, त्यापेक्षा जास्तच इंजेक्शन्स घेतले असतील. हे खूप वेदनादायी असतं”, असं ती म्हणाली. आई होण्यासाठी संभावनाला बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागतोय. तिने IVF द्वारे आई होण्याचा प्रयत्न केला. मात्र यात चार वेळा तिला अपयश आलं. पाचव्यांदा ती गरोदर राहिली होती. मात्र तीन महिन्यांतच तिला बाळाला गमवावं लागलं.

याआधी प्रसिद्ध अभिनेत्री माही विजनेही तिचा प्रेग्नंसीचा अनुभव सांगितला होता. “माझे IVF चे तीन सायकल फेल झाले होते आणि चौथ्या प्रयत्नात मी जुळ्या मुलांची आई बनली. त्यातही पहिले तीन महिने मी पूर्णपणे बेड रेस्टवर होती. मी फक्त सोनोग्राफीसाठी रुग्णालयात जायची. आम्ही दोघं आईवडील होणार म्हणून खूप खुश होतो. पण एके दिवशी डॉक्टरांनी सांगितलं की माझ्या दोन्ही मुलांचा जीव जाऊ शकतो. या IVF प्रक्रियेदरम्यान मला जवळपास 100 इंजेक्शन्स देण्यात आले होते. अखेर ताराचा जन्म प्रीमॅच्युअर झाला. यामुळे तिला शंभर दिवसांपर्यंत NICU मध्ये ठेवण्यात आलं होतं. जुळ्यांपैकी दुसऱ्या बाळाचा जन्म होऊ शकला नाही”, असं तिने सांगितलं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List