दापोलीत हाड गोठवणारी थंडी, मंगळवारी हंगामातील सर्वात निचांकी तापमानाची नोंद
मिनी महाबळेश्वर दापोलीत चालू वर्षीच्या हिवाळी हंगामात सोमवारी सायंकाळपासून मंगळवारी सकाळपर्यंत 7.8 अंश सेल्सिअस इतक्या सर्वात निचांकी तपमानाची नोंद झाली . खाली घसरलेल्या थंडीच्या पा-याने संपूर्ण तालुक्यालाच थंडीने पुरते गारठवले. त्यामुळे थंडीने गारठलेले दापोलीकर सोमवारी सांयकाळी तसेच मंगळवारी सकाळी उशीरापर्यंत शेकोट्या पेटवून शेक घेत होते.
दापोली तालुक्यात यावर्षीच्या हिवाळी हंगामात मंगळवारी 17 डिसेंबर ला 7.8 अंश सेल्सिअस इतक्या निचांकी तापमानाची डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या हवामान केंद्रात नोंद झाली आहे. दापोलीत 14 डिसेंबर रोजी 10.8 अंश सेल्सिअस, 15 डिसेंबर रोजी 10.5 अंश सेल्सिअस तर सोमवारी 16 डिसेंबर रोजी 9.0 अंश सेल्सिअस अशा प्रकारचा खाली घसरत चाललेला थंडीचा पारा मंगळवारी 17 डिसेंबर रोजी 7.8 अंश सेल्सिअस इतका खाली घसरल्याने बोचऱ्या थंडीने दापोलीकर चांगलेच गारठले. तर पर्यटनासाठी दापोलीत आलेल्या पर्यटकांना मात्र हुडहुडी भरणाऱ्या गुलाबी थंडीने एका वेगळ्याच अनुभूतीच्या आल्हाददायक वातावरणाची चांगलीच जाणीव करून दिली. त्यामुळे येथे आलेल्या पर्यटकांना ते उतरलेल्या निवासी कॅम्पस मध्ये पर्यटक व्यावसायिकांनी शेकोट्या पेटवून देत त्यांना कोकणातील आदरातिथ्य काय असते हे दाखवून दिले. तर स्थानिकांना मात्र हुडहुडी भरणाऱ्या या बोच-या थंडीने आपल्या कामांसाठी घराबाहेर पडण्यास चांगलाच ब्रेक दिला.
दापोली येथील डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या हवामान केंद्रात या आधी गुरुवारी 21 नोव्हेंबरला कमाल 10.9 अंश सेल्सिअस तपमानाची नोंद झाली होती त्या नंतर हेच तपमान पुन्हा 12 अंशावर जावून स्थिरावले असतानाच पुन्हा बुधवारी 27 नोव्हेंबर रोजी 10.5 अंश सेल्सिअस गुरूवारी 28 नोव्हेंबरला 9.9 अंश सेल्सिअस, 29 नोव्हेंबरला 9 अंश सेल्सिअस तर शनिवारी 30 नोव्हेंबर रोजी 8.8 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंद झाली होती. त्यामुळे संपूर्ण दापोली तालुका गारठला होता. मात्र त्यानंतर हवामानात मोठा बदल झाल्याने कमालीचा उष्मा वाढला होता. त्यामुळे त्याचा थेट परिणाम हा आंबा काजू मोहरण्यावर झाला होता. असे असतानाच पुन्हा सोमवारी 14 डिसेंबरपासून 10.8 अंश सेल्सिअस थंडीचा पारा खाली घसरत तो 15 डिसेंबरला 10.5 अंश सेल्सिअस तर 16 डिसेंबर ला 9.0 अंश सेल्सिअस ईतका खाली घसरून थंडीच्या पा-याने मंगळवारी आणखीनच खाली येत या हिवाळी मौसमात मंगळवारी 17 डिसेंबर रोजी 7.8 अंश सेल्सिअस एवढया खाली थंडीचा पारा घसरल्याने हाडं गोठवणारी थंडी झाली त्यामुळे दापोलीकरांना चांगलीच हुडहुडी भरली.
यंदा बऱ्यापैकी पर्यटकांनी केळशीला पसंती दिली आहे. त्यातच गुलाबी थंडीने पर्यटकांचा आनंद द्विगुणित होत आहे. दिवसा सुंदर समुद्र किनारी वॉटर स्पोर्टस्चा अनुभव घेऊन रात्री होम स्टे मध्ये शेकोटी घेत पर्यटक सुखावत आहेत.
अमित दिलीप कोठारी, भारजा इन केळशी, ता. दापोली
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List