थर्टी फर्स्टला स्थानकातील गर्दी टाळण्यासाठी रेल्वेचा मोठा निर्णय, मध्य रेल्वेच्या या मुख्य टर्मिनसवरील प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद
नवीन वर्षाचे स्वागत तोंडावर आले असताना मध्य रेल्वेने रेल्वेस्थानकातील गर्दी कमी करण्यासाठी लांबपल्ल्याच्या गाड्या सुटणाऱ्या प्रमुख टर्मिनसवरील प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरती बंद घालण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वेच्या वांद्रे टर्मिनसवर पहाटेची गोरखपूरची ट्रेन पकडताना अपघात होऊन २७ ऑक्टोबर रोजी नऊ जण जखमी झाले होते. या प्रकारानंतर देखील मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने लांबपल्ल्याच्या गाड्या सुटणाऱ्या टर्मिनसवरील प्लॅटफॉर्म विक्री थांबविली होती. आता पुन्हा नवीन वर्षाच्या अखेरीस गाड्यांना होणारी गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुख्य स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरते बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
नवीन वर्षाच्या सुरुवात करताना अनेक जण फिरायला निघतात, काही जण वर्षांची सुरुवात धार्मिक स्थळापासून करतात, तसेच सलग सुट्ट्या असल्याने सहलीला देखील अनेक जण जात असतात, त्यामुळे रेल्वे स्थानकांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर मध्य रेल्वेने तात्पुरती बंदी घातली आहे. फलाटावर मेल-एक्सप्रेस पकडताना अनेकदा प्रवास करणारे कमी परंतू त्याला सोडविण्यासाठी आलेल्यांची गर्दी अधिक असते. अशा प्रकारचे अनावश्यक गर्दी होऊ नये यासाठी मध्य रेल्वेने महत्वाच्या टर्मिनसवरील प्लॅटफॉर्मवरील तिकीट विक्री थांबविण्याचा निर्णय घेतला आहे.
कधी असणार फलाट तिकीट विक्री बंद
मध्य रेल्वेने लांबपल्ल्याच्या टर्मिनसवर प्लॅटफॉर्मवर तिकीट विक्रीवर बंदी घातली आहे. ही बंदी २९ डिसेंबर २०२४ ते ०२ जानेवारी २०२५ च्या मध्यरात्री १२.०० वाजेपर्यंत लागू असणार आहे. त्यामुळे ज्यांना प्रवास करायचा आहे, अशाच प्रवाशांची गर्दी होऊन काऊड मॅनेजमेंट करणे सोपे होईल असे मध्य रेल्वेचे म्हणणे आहे.
खालील १४ स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
दादर
लोकमान्य टिळक टर्मिनस
ठाणे
कल्याण
पनवेल
पुणे
नागपूर
नाशिक रोड
भुसावळ
अकोला
सोलापूर
कलबुर्गी
लातूर
विशेष सवलत : या बंदीतून काही जणांना वगळण्यात आले आहे. वयोवृद्ध व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती, लहान मुले, निरक्षर व्यक्ती आणि महिला प्रवासी ज्यांना एकट्याने प्रवास करता येत नाही अशांना हा नियम लागू होणार नाही. त्यांचा प्रवास सुलभ व्हावा या हेतूने या निर्बंधांमधून या घटकांना सूट देण्यात आली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List