‘रंग माझा वेगळा’ फेम आशुतोष गोखले ‘या’ मालिकेत खलनायकाच्या भूमिकेत
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला कार्तिक इनामदार अर्थात अभिनेता आशुतोष गोखले लवकरच ‘तू ही रे माझा मितवा’ या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने आशुतोष पहिल्यांदा खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. राकेश भोसले असं त्याच्या व्यक्तिरेखेचं नाव असून अतिशय विक्षिप्त स्वभावाचं हे पात्र आहे. ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत आशुतोषने साकारलेल्या कार्तिक इनामदार या पात्राला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं. या मालिकेत आदर्श पती आणि आदर्श मुलगा साकारल्यानंतर आशुतोषने नवा प्रयोग करण्याचं ठरवलं आहे आणि त्यासाठीच त्याने ही आव्हानात्मक भूमिका स्वीकारली आहे.
या नव्या भूमिकेविषयी सांगताना आशुतोष म्हणाला, “याआधी बऱ्याचदा मला खलनायक साकारण्यासाठी विचारणा झाली. ‘तू ही रे माझा मितवा’ या मालिकेतून मी पहिल्यांदा खलनायकाची भूमिका साकारणार आहे. खरंतर थोडं दडपण आहे. ‘रंग माझा वेगळा’मध्ये सकारात्मक भूमिका मी साकारली. मात्र मालिकेच्या शेवटच्या टप्प्यात कार्तिक हे पात्र खलनायकी झालं होतं. त्यामुळे अभिनयाचे वेगवेगळे रंग प्रेक्षकांनी याआधीही अनुभवले आहेत. राकेश या पात्राला कसा प्रतिसाद मिळतोय याची प्रचंड उत्सुकता आहे.” ‘तू ही रे माझा मितवा’ ही मालिका येत्या 23 डिसेंबरपासून रात्री 10.30 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या मालिकेत अर्णव आणि ईश्वरीच्या प्रेमाची गोष्ट दाखवण्यात येणार आहे. या दोघांची प्रेम कहाणी थोडी हटके आहे. एकमेकांच्या प्रेमात ते जितके बुडाले आहेत तितकेच ते एकमेकांचा तिरस्कारही करतात. म्हटलं तर एकमेकांशिवाय जगता येत नाही आणि म्हटलं तर एकमेकांसोबत राहताही येत नाही. थोडक्यात प्रेम करुन कात्रीत सापडलेल्या अर्णव आणि ईश्वरीची हटके लव्हस्टोरी म्हणजे ‘तू ही रे माझा मितवा’ ही मालिका. कुन्या राजाची गं तू रानी मालिकेतून घराघरात पोहोचलेली गुंजा म्हणजेच अभिनेत्री शर्वरी जोग आणि अभिनेता अभिजीत आमकर या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List